राणी एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण, बकिंगहॅम पॅलेसची माहिती
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (21:07 IST)
राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती बकिंगहॅम पॅलेसनं दिली आहे.
95 वर्षीय राणी एलिझाबेथ यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत, मात्र त्यांचं दैनंदिन काम सुरू राहील, असंही पॅलेसनं स्पष्ट केलं आहे.
वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राणी एलिझाबेथ यांच्यावर उपचार सुरू आहेत. राणी एलिझाबेथ कोरोनासंदर्भातील नियमावलीचं पालन करतील, असं बकिंहॅम पॅलेसने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
राणी एलिझाबेथ यांची त्यांचे पुत्र आणि वंशज द प्रिन्स ऑफ वेल्स यांच्याशी भेट झाली होती. प्रिन्स ऑफ वेल्स यांना गेल्या आठवड्यात कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
6 फेब्रुवारी रोजी राणी एलिझाबेथ यांनी युकेच्या सर्वाधिक काळ राजघराण्याच्या सर्वोच्चस्थानी विराजमान होऊन 70 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी राणी एलिझाबेथ यांनी सँड्रिघम हाऊस इथे चॅरिटी वर्कर्सची भेट घेतली होती.