हल्लेखोर मुस्लीम असल्याची अफवा पसरली आणि युकेमध्ये हिंसाचार उफाळून आला

शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (12:30 IST)
युकेच्या अनेक भागात दंगली उसळल्या आहेत. गेल्या आठवड्यात इंग्लंडच्या उत्तर- पश्चिम भागात चाकूहल्ला झाला होता, त्यात तीन तरुण मुलींचा मृत्यू झाला होता.
साऊथपोर्ट मधील या किनारी गावात या तिघी मुलींच्या मृत्यूबद्दल दुखवटा पाळण्यात आला होता. कडव्या उजव्या विचारांच्या लोकांना आपली विचारसरणी पुढे नेण्याची उत्तम संधी मिळाली आणि त्यांनी बिगर-श्वेतवर्णीय समुदायाला उसकवलं
या गावातील शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक स्वरुप प्राप्त झालं. दंगलखोरांनी विटा फेकल्या, स्मोक बाँब आणि इतर क्षेपणास्त्र पोलिसांवर तसंच हॉटेलमध्ये असलेल्या आश्रितांवर फेकले. हा हिंसाचार युकेमध्ये अनेक भागात पसरला. त्यात हुल, लिव्हरपूल, मँचेस्टर, ब्लॅकपुल आणि बेलफेस्टचा समावेश होता.
भारत, नायजेरिया, मलेशिया या देशांनी युकेच्या प्रवासासाठी काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत.
 
पंतप्रधान किएर स्टार्मर यांनी ही परिस्थिती म्हणजे कडव्या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी केलेला हिंसाचार असल्याचं म्हटलं आहे. या कृतीचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही असं त्यांनी डाउनिंग स्ट्रीटच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
बीबीसी व्हेरिफायने केलेल्या एका विश्लेषणानुसार साऊथपोर्ट हल्ल्यानंतर जी लोक रस्त्यावर उतरली आहेत त्यापैकी प्रत्येकाचे या घटनेबद्दल सौम्य मतं नाहीत. ते दंगलीचं समर्थन करताहेत किंवा ते कडव्या उजव्या विचारसरणीशी निगडीत आहेत असंही नाही. हा हल्ला बेकायदा स्थलांतराशी निगडीत आहे अशी चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे त्यामुळे हा हल्ला झाला आहे अशी एक धारणा तयार झाली. त्याचीही लोकांना काळजी वाटत आहे.
 
अपप्रचाराचे कारण?
जेव्हा चाकूहल्ल्ल्याची बातमी पसरली तेव्हा हल्लेखोराच्या ओळखीबद्दलचा अपप्रचार किंवा चुकीची माहिती सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली.
 
त्याच्या वयाचा अंदाज घेऊन पोलिसांना तो 17 वर्षांचा असल्याचा कळलं आहे. त्यामुळे त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले आणि लोकांना कोणत्याही प्रकारचे अंदाज वर्तवू नयेत असं सांगितलं.
 
हल्लेखोर मुस्लीम होता आणि त्याला आश्रय हवा होता अशी अफवा पसरली आणि उजव्या विचाराच्या सोशल इन्फ्लुएन्सर्सनी कारवाईसाठी लोकांना प्रोत्साहन दिलं.
 
इंग्लिश डिफेन्स लीग ही अशीच एक संस्था आहे. या संस्थेशी निगडीत स्टीफन याक्सले लेनन उर्फ टॉमी रॉबिन्सन हा असाच एक इन्फ्लुएन्सर एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर आहे. अशी बातमी बीबीसी व्हेरिफायने दिली आहे.
बीबीसी व्हेरिफायने दिलेल्या माहितीनुसार चुकीचे दावे प्रतिदावे सोशल मीडियावर पसरण्यास सुरुवात झाली. ही माहिती मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. अगदी ज्यांचा या उजव्या विचारसरणीच्या लोकांशी काही संबंध नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा माहिती पोहोचली.
 
होप नॉट हेट या कट्टतावादाविरोधात लढणाऱ्या संशोधन संस्थेचे जॉन मुल्हाल म्हणाले, “याच्या मुळाशी एकच कारण आहे असं नाही. एकूणच यामुळे कडव्या उजव्या विचारांच्या लोकांचा स्वभाव दिसून येतो. अनेक लोक ऑनलाइन गोष्टींमध्ये गुंतले आहेत. तिथे काहीही सदस्यत्व वगैरे प्रकार नाही.. त्यांचा कोणी अधिकृत नेताही नाही. सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर्स त्यांचं नेतृत्व करतात. एखाद्या पारंपरिक संस्थेपेक्षा मासळी बाजारच जास्त वाटतो.’
 
वंशवाद आणि स्थलांतर
युकेमध्ये जुलै महिन्यात निवडणुका झाल्या त्यावेळी स्थलांतर आणि स्थलांतरितांचे लोंढे हे मुद्दे उपस्थित झाले होते.
 
नायजेल फराज हे युकेमधील ब्रेक्झिट मोहिमेतील आघाडीचे नेते होते. ते निवडणुकीत रिफॉर्म युके या राजकीय पक्षाचे नेते म्हणून पुन्हा सक्रिय राजकारणात आले होते. त्यांनी अनावश्यक स्थलांतरावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
 
या दंगलीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “अनियंत्रित स्थलांतरामुळे आमच्या समुदायाची लोकसंख्या खिळखिळीत झाल्याचं पहायला मिळतंय.”
 
कायदेशीर आणि बेकायदेशीर स्थलांतर हा युकेमध्ये एक मोठा मुद्दा झाला आहे. फेब्रुवारी मध्ये झालेल्या Ipsos सर्वेक्षणानुसार 52% लोकांना वाटतंय की सध्या स्थलांतराचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. दोन वर्षांपूर्वी फक्त 42% लोकांनाच असं वाटायचं.
 
2022 पासून ही दरी वाढलेली असली तरी स्थलांतराबद्दल लोक सकारात्मक असतात असं Ipsos च्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे.
कडव्या उजव्या विचारांच्या पॅट्रिऑटिक अल्टरनेटिव्ह सारख्या गटांनी स्थलांतरितांविरुद्ध निदर्शनं केली, जमाव गोळा केला आणि साऊथपोर्ट हल्ल्याविरुद्ध रोष वाढवला. त्यामुळे हिंसाचार वाढला.
अशाच आणखी काही गटांनी स्थलांतरितांना मायदेशी पाठवण्याची मागणी केली.
“कडव्या विचारांचे लोक प्रत्यक्ष लढा देत नाही ही त्यांच्यातली उणीव आहे. मात्र या हल्ल्याने त्यांना एकत्र आणलं आहे.” असं लिझी डिअरडन म्हणाले.
ते ‘प्लॉटर्स- द युके टेररिस्टर हु फेल्ड’ या पुस्तकाचे आणि द इंडिपेंडेंट च्या होम अफेअर्स विभागाचे संपादक होते. ते बीबीसी रेडिओ 4 शी बोलत होते.
वांशिक हल्ल्यांचा इंग्लंडमधील काही मशिदींनाही फटका बसला. त्यामुळे तिथे विशेष पोलीस दल तैनात करावं लागलं.
 
आश्रित लोक थांबलेल्या हॉटेल्सलाही वंशभेदी आणि स्थलांतराला विरोध करणाऱ्यांनी लक्ष्य केलं.
 
इंग्लंडमधील दक्षिण भागात असलेल्या अल्डरशॉट या गावात बीबीसीचे पत्रकार पॅडी ओकॉनेल यांनी आंदोलकांना आश्रितांच्या हॉटेलच्या बाहेर उभं असलेलं पाहिलं.
 
“फेसबुकवर स्थलांतरितांमुळे घराच्या आणि इतर अडचणींमुळे एका शांततापूर्ण आंदोलनाचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र ते भरकटत गेलं. विटा फेकल्या गेल्या, वंशभेदी अपशब्द वापरले. हॉटेलमध्ये भयावह परिस्थिती होती,” असं त्यांनी बीबीसी न्यूजकास्ट पॉडकास्ट मध्ये सांगितलं.
 
बाहेरच्या फुटपाथवर आम्ही दोन बहिणींशी बोललो. त्या अफगाणिस्तानच्या होत्या आणि त्यांना युकेमध्ये आसरा हवा होता.
 
“दंगलखोर अचानक आले आणि त्यांच्या कार पार्क केल्या. ते हॉटेलमध्ये उडी मारून येऊ पाहत होते. त्यांनी आमची भिंत, गेट फोडण्याचा प्रयत्न केला. खिडक्याही फोडल्या. ते सगळं फारच भीतीदायक होतं.” त्या दोघींमधली एक बहीण म्हणाली. तिचं वय 22 होतं.
 
“ते आम्हाला शिव्या देत होते, आणि आमचे व्हीडिओ तयार करत होते. ही अजिबात चांगली वागणूक नव्हती,” असं त्यांच्यातली 17 वर्षांची मुलगी म्हणाली.
 
गंमत म्हणून लूटमार
काही आंदोलकांनी दंगलीचा फायदा घेऊन दुकानं लुटली.
 
संडरलँड हे इंग्लंडच्या उत्तर-पूर्वेकडील एक शहर आहे. तिथे ग्रीग्स बेकरीची एक शाखा आहे. ती आणि नॅट वेस्ट बँकेवर दरोडा टाकण्यात आला. उत्तर पश्चिमेकडे असलेल्या ब्लॅकपूलमध्येही एका शॉपिंग सेंटरमध्ये लूट केल्याची पोलीस चौकशी करत आहे.
 
उत्तर पूर्वेकडे असलेल्या हुल शहरात बीबीसी प्रतिनिधीने अनेक दुकानांमध्ये लूट होताना पाहिली. अनेक दुकानांची मोडतोड करण्यात आली आणि काहींना आग लावण्यात आली. रस्त्यावर ठेवलेल्या काही वस्तुंनाही आग लावण्यात आली. शहरातली दुकानं बंद करण्यात आली. वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला.
 
संडरलँड सिटी काऊंसिलने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिलं. “संडरलँड ही एक उबदार आणि शांत जागा म्हणून ओळखली जाते. आज जे काही झालं ते या शहराचं आणि लोकांचं प्रतिबिंब नाही. आमच्या समाजाच्या शांततेसाठी आम्ही नेहमीसारखे एकत्रितपणे प्रयत्न करू ”
स्थानिक महापौर म्हणाले, “अशा गोष्टींमुळे लोकांच्या भावभावनांवर परिणाम होईल आणि संडरलँड काऊंसिलला रात्रभर प्रचंड स्वच्छता करावी लागली.”
 
“आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले लोक सकाळी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहे. ही खूपच सुखावह बाब आहे.”
 
मोहम्मद इद्रिस साऊथ बेलफास्टमध्ये बॅश कॅफे चालवतात. शनिवारी झालेल्या हिंसाचारात त्यांचं दुकान जाळलं. ते आता त्यांचं दुकान परत उघडणार नाही असं त्यांनी सांगितलं.
 
त्यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांच्या दुकानावर याआधीही हल्ला झाला आहे. त्यांच्या दुकानावर मागच्या वर्षीही हल्ला झाला होता. सँडी रो भागात त्यांचं दुकान होतं.
 
“या कॅफेसारखंच माझ्या कॉम्प्युटर शॉपचंही असंच नुकसान करण्यात आलं होतं. हा कॅफे इथल्या समुदायासाठी एक आशेचं किरण होता. आता कोणतीही आशा नाही.
 
स्थानिक सेवांमध्ये कपात
काही गटांच्या मते वर्षानुवर्षं सरकारने स्थानिक सेवांच्या निधीत कपात केली आहे आणि त्यांच्याबरोबर कठोरपणे वागली आहे.
 
साऊथपोर्ट येथे सुरुवातीला झालेल्या आंदोलनांनंतर होप नॉट हेट समुदायाचे लोक म्हणाले की या समुदायातील लोकांना मागच्या सरकारने प्राधान्य दिलं नाही, खर्च कमी करायचं कारण देऊन अनेक वर्षं त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं.
त्यामुळे अशा प्रकारच्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी आणि इथल्या समुदायाला आधार देण्यासाठी नवीन सरकारने एखादी रणनिती आखणं अतिशय गरजेचं आहे असं ते पुढे म्हणाले.
2010 ते 2019 या काळात माजी चान्सलर जॉर्ज ओसबोर्न आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी घरांना अनुदान, लोककल्याणकारी योजना आणि सामाजिक सेवांमध्ये 30 बिलियन पौंडची कपात केली होती.
 
तज्ज्ञांच्या मते या सामाजिक आणि आर्थिक अस्थिरतेमुळे तरुण मुलं कट्टर उजव्या विचारसरणीच्या ध्रुवीकरणाकडे आकर्षिले जातील. कोव्हिडमुळे झालेल्या नुकसानाची भरही यात पडू शकते.
 
“लोक एकेकटे होते. त्यांच्या मित्रमैत्रिणींपासून ते दूर होते. क्रीडा, समाज, शिक्षक, असो किंवा सुटी घेऊन वेळ व्यतित करण्यासाठी असा कोणताच गट अस्तित्वात नव्हता. तसंच लोकांच्या विचारांना आवाहन देणारे कौटुंबिक गटही नव्हते.”असं दहशतवादविरोधी गुप्तहेर डेट सुप्ट गॅरेथ रीस यांनी बीबीसीला सांगितलं.
 
होम एडिटर मार्क इस्टन यांचं विश्लेषण
रोज काहीतरी गुन्हेगारीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे या देशात कायदा उरलेला नाही आणि तो आणखी धोकादायक होतो आहे अशी आम्ही कल्पना केली तर आम्हाला माफ करण्यात यावं. मात्र इंग्लंड आणि वेल्समध्ये गुन्हेगारीचं जे सर्वेक्षण करण्यात आलं त्यात लोकांना त्यांच्या गुन्हेगारीच्या अनुभवाबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी वेगळी मतं प्रदर्शित केली.
 
सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करतंय असं संडरलँडमधल्या लोकांना वाटतं. त्यामुळे त्या दिवशी पसरलेली शांतता हा त्या असंतोषाचा परिपाक होता किंवा तो असंतोष दाखवण्याची संधी होती.
इतरांसाठी मात्र ते तितकं आश्चर्यकारक नव्हतं सिटी सेंटरमध्ये असंतोष पसरला त्याच्या काही वेळाआधी ग्लासगो, स्कॉटलंडमधून एक ट्रेन आली. त्यातून उतरलेल्या माणसांनी अंगावर यूनियन जॅक पांघरला होता. स्टेशनच्या बाहेर त्यांचं स्वागत दाक्षिणात्य लहेजा (Southern Accents) असलेल्या लोकांनी त्यांचं स्वागत केलं.
तिथे मला इंग्लिश डिफेन्स लीग या सध्या अस्तित्वात नसलेल्या संस्थेशी निगडीत लोकांचे काही चेहरे दिसले. मी गेल्या 45 वर्षांपासून युके मध्ये वार्तांकन करतोय. अशा प्रकारचा वांशिक तणाव निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही.
फक्त यावेळी फरक इतकाच होता की सोशल मीडियावर लोक स्वत:ला हवं ते पब्लिश करू शकतात त्यासाठी त्यांना सत्य परिस्थिती जाणून घेण्याची गरज पडत नाही. काही परदेशी कंपन्यांच्या मालकीच्या वेबसाइट्सनेही अपप्रचार केल्याचे पुरावे आहेत. स्वत:ला देशभक्त म्हणवून घेणाऱ्या काही गटाच्या लोकांनी तो आणखी पसरवला.
ज्यांच्या समुदायात हा हिंसाचार उफाळून आला आहे त्यांच्यासाठी हे नक्कीच काळजीचं आहे. हे आणखी किती पसरत जाणार आहे याची कल्पना नाही.
मात्र मी उत्तर पूर्वेच्या हार्टलेपूलमध्ये स्वच्छता करताना पाहिलं आणि एक संशोधनानप्रमाणे आधीपेक्षा जास्त सुरक्षित आणि सहनशील आहे.
त्यामुळे कडव्या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी ठरवून मांडलेला उच्छाद हेच ब्रिटनचं सध्याचं खरं चित्र आहे असं मानणं चुकीचं ठरेल.
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती