शेख हसीना देश सोडून गेल्यानंतर बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंची काय स्थिती आहे?

बुधवार, 7 ऑगस्ट 2024 (18:01 IST)
-सौतिक बिस्वास
शेख हसीना यांनी पंतप्रधान पद सोडल्यानंतर देशही सोडला. त्या आश्रयासाठी बांगलादेशातून हेलिकॉप्टरने भारतात आल्या.
 
या राजकीय घटनेचे पडसाद अनेक लोकांवर होताना दिसत आहेत.
 
या राजकीय घटना घडत असतानाच एका व्यक्तीला त्याच्या नातेवाईकाचा फोन आला.
 
अविरूप सरकार हे बांगलादेशी हिंदू आहे. 90 टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात ते राहतात.
 
अविरूप यांच्या बहिणीच्या पतीचं निधन झालं असून ती एकत्र कुटुंबात राहते.
 
हे कुटुंब ढाक्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या नद्यांनी वेढलेल्या नेत्रोकोना जिल्ह्यात वास्तव्यास आहे.
 
त्या फोन कॉलबद्दल अविरूप सरकार यांनी सांगितलं, "माझी बहीण घाबरली होती. जमावानं हल्ला करून घर लुटलं आहे, असं ती मला म्हणाली."
 
जवळपास 100 लोकांचा जमाव त्यांच्या घरात लाठ्या घेऊन घुसला. त्यांनी फर्निचर, टीव्ही आणि बाथरुमचे सामानही फोडले. घराचे दरवाजे तोडले, असं अविरूप यांना त्यांच्या बहिणीनं सांगितलं.
 
बाहेर जाण्यापूर्वी या लोकांनी घरात ठेवलेले सर्व पैसे आणि दागिने लुटले. मात्र, जमावानं तिथं उपस्थित असलेल्या 18 जणां पैकी कोणावरही हल्ला केला नाही. या 18 लोकांमध्ये 6 मुलं होती.
 
तिथून निघण्यापूर्वी जमावातील लोक या कुटुंबातील सदस्यांवर ओरडून म्हणाले, "तुम्ही अवामी लीगचे वंशज आहात. तुमच्यामुळे या देशाची अवस्था वाईट आहे. तुम्ही देश सोडून जायला पाहिजे.”
 
हिंदूंना का लक्ष्य केलं जातंय?
या घटनेनं धक्का बसला असला तरी फारसं आश्चर्य वाटलं नसल्याचं अविरूप सरकार यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले, “बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंना सामान्यतः शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगचे समर्थक मानलं जातं आणि इस्लामिक देशातील विरोधकांकडून त्यांच्यावर अनेकदा हल्ले केले जातात.”
 
शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर सोशल मीडियावर हिंदूंच्या संपत्ती आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांशी संबंधित बातम्यांचा पूर आला.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 6 ऑगस्ट रोजी संसदेत सांगितलं की, "सर्वांत त्रासदायक गोष्ट म्हणजे तिथं राहणारे जे अल्पसंख्याक आहेत, अनेक ठिकाणी त्यांच्या दुकानांवर आणि मंदिरांवर हल्ले झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, याबाबतची संपूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाही."
 
या सगळ्यामध्ये हा प्रकार थांबवण्यासाठी अनेक मुस्लीम तरुणही हिंदूंची घरं आणि धार्मिक स्थळांच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत.
 
अविरूप सरकार म्हणाले, "बांगलादेशी हिंदूंना टार्गेट करणं सोपं आहे. अवामी लीग जेव्हा सत्ता गमावते, तेव्हा त्यांच्यावर (हिंदूंवर) हल्ले केले जातात."
 
अविरूप यांच्या बहिणीच्या घरावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. 1992 मध्ये भारतातील अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले झाले. त्यावेळीही जमावानं अविरूप यांच्या बहिणीच्या घराची तोडफोड केली होती.
 
त्यानंतरच्या दशकातही हिंदूंवर अनेक हल्ले झाले.
 
'मुस्लीम हिंदूंचं रक्षण करत आहेत'
बांगलादेशातील मानवाधिकार गट 'एन ओ सालिश सेंटर'च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2013 ते सप्टेंबर 2021 दरम्यान हिंदू समुदायावर 3,679 हल्ले झाले. यामध्ये तोडफोड, जाळपोळ आणि टार्गेट करुन हिंसाचार यांचा समावेश आहे.
 
2021 मध्ये दुर्गापूजेदरम्यान हिंदू अल्पसंख्याकांच्या घरांवर आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर, मानवाधिकार गट ॲम्नेस्टी इंटरनॅशनलनं म्हटलं होतं की, "गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेशातील व्यक्तींवर सातत्याने होणारे हल्ले, जातीय हिंसाचार आणि अल्पसंख्याकांची घरे आणि प्रार्थनास्थळांची नासधूस यावरून दिसून येते की, हा देश अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरला आहे.”
 
सोमवारी (5 ऑगस्ट) अविरूप सरकार यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही हिंसाचाराचा सामना करावा लागला.
 
ढाक्यापासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या किशोरगंजमधील त्यांच्या पालकांचं घर या हिंसाचारापासून वाचलं होतं. याचं कारण सांगताना ते म्हणतात, "कारण आमच्या कुटुंबाला इथं सगळे ओळखतात आणि आम्हीही शेजारच्या सगळ्यांना ओळखतो."
 
आपली आई शाळा चालवत असल्याचं अविरूप सरकार सांगतात.
 
अविरूप यांना त्यांच्या बिझनेस पार्टनरचा कॉल आला आणि लोक हल्ला करण्यासाठी लोकांच्या मालमत्तेची यादी तयार करत असल्याचं त्यानं सांगितलं.
 
त्यांचा पार्टनर म्हणाला, "तुझं नाव त्या यादीत नाही. पण तू जरा जपून राहायला हवं."
 
नंतर अविरूप यांच्या वडिलांनी पाहिलं की त्यांच्या घराबाहेर लोखंडी गेटजवळ थोडा जमाव जमत आहे. त्यांनी कुटुंबाला आतून कोंडून ठेवलं होतं.
 
"तिकडे जाऊ नका, तिथं काही करायचं नाहीये, असं कुणीतरी म्हणाल्याचा आवाज माझ्या वडिलांना आला आणि यानंतर जमाव पांगला,” अविरूप सांगतात.
 
पण काही अंतरावर किशोरगंजच्या नोगुआ भागात हिंदूंची घरे लुटल्याच्या बातम्या आल्या.
 
अविरूप सांगतात, "मी ऐकलं आहे की तिथं जवळपास 20-25 घरांवर हल्ले झाले आहेत. लोकांनी माझ्या हिंदू मित्राच्या सोन्या-चांदीच्या दुकानाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि सर्व दागिने लुटले. मात्र, ते तिजोरी फोडू शकले नाहीत किंवा लुटू शकले नाहीत."
 
पुढे काय?
ढाकापासून उत्तरेला जवळपास 200 किलोमीटर अंतरावरील शेरपूर जिल्ह्यात अविरूप सरकार यांच्या पत्नीचं घर आहे. या घरालाही धोका होता.
 
त्यांच्या घरावर हल्ला झाला नसला, तरी जमावानं शेजारच्या एका हिंदूचं घर लुटलं.
 
दिलासादायक गोष्ट म्हणजे हिंसाचाराची बातमी पसरताच स्थानिक मुस्लिमांनी हिंदूंची घरं आणि मंदिरांभोवती सुरक्षेचे कडे तयार करुन त्यांचे संरक्षण केले.
 
अभिरूप सांगतात, "संपूर्ण बांगलादेशात हे घडत आहे. मुस्लिमांनी हिंदूंच्या संपत्तीचं रक्षण केलं आहे."
 
पण गोष्टी इथंच संपल्या नाहीत. सोमवारी रात्रीपर्यंत अविरूप यांच्या ढाक्यातील 10 मजली अपार्टमेंटबाहेर गर्दी जमू लागली.
 
अविरूप तिथं पत्नी आणि मुलीसह राहतात. अविरूप यांना वाटलं हे लोक त्यांच्या अपार्टमेंटबाहेर राहणाऱ्या अवामी लीगच्या नगरसेवकाला शोधण्यासाठी तिथं आले आहेत.
 
अविरूप म्हणाले, "मी सहाव्या मजल्यावरच्या बाल्कनीत आलो आणि बघितलं की जमाव इमारतीवर दगडफेक करत होता आणि दरवाजे तोडण्याचा प्रयत्न करत आहे. दरवाजे चांगल्या पद्धतीनं बंद होते, त्यामुळे त्यांना आत जाता येत नव्हते. त्यांनी पार्किंगमध्ये उभं राहून काही वाहनं आणि खिडकीच्या काचेचं नुकसान झालं."
 
सध्या त्यांच्या कुटुंबाला आणखी हल्ले होण्याची भीती वाटत आहे, असं अविरूप सरकार यांच्या बहिणीनं त्यांना सांगितलं.
 
त्यांनी सैन्यातील एका मित्राला फोन करुन लष्करी वाहनाला त्यांच्या घराशेजारी गस्त घालत राहण्याची विनंती केली.
 
"हा खूप वेदनादायक काळ आहे. येथे कायदा आणि सुव्यवस्था नाही आणि आम्हाला पुन्हा लक्ष्य केले जात आहे," अविरूप सांगतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती