ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाविषयी संकेत देताना म्हटलं...

सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (13:54 IST)
'आता फक्त हुजूर पक्षाच्या सरकारला पाठिंबा देईन' असं ऋषी सुनक यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलंय. त्यांच्या या विधानावरून त्यांनी नेतेपदाची शर्यत गमावल्याचे संकेत मिळत आहेत.
 
हुजूर पक्षाच्या नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सोमवारी (5 सप्टेंबर) पूर्ण होईल, त्यानंतर ब्रिटनच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लिझ ट्रस किंवा ऋषी सुनक कोण बाजी मारणार, हे स्पष्ट होईल.
 
सुनक यांनी रविवारी (4 सप्टेंबर) बीबीसीच्या लॉरा कुएन्सबर्ग यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, "पुढील आठवड्यात पंतप्रधान झालो नाही तरी खासदार म्हणून मी कायम राहीन."
 
मात्र हुजूर पक्षाच्या नेतेपदासाठी पुन्हा शर्यतीत उभं राहण्याची शक्यता नाकारली नाही.
 
2019 साली बोरीस जॉन्सन यांच्याकडे हुजूर पक्षाचं नेतृत्त्व होतं. त्यांच्या राजीनाम्यानंतर नवा पक्षनेता निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज (5 सप्टेंबर) नव्या नेत्याची घोषणा होईल.
 
बोरीस जॉन्सन आपला राजीनामा राणीकडे सोपवतील. त्यानंतर एकतर ऋषी सुनक नाहीतर लिझ ट्रस पंतप्रधानपदाची सूत्र ताब्यात घेतली.
 
ब्रिटनमध्ये महागाई वाढली आहे. ही महागाई नियंत्रणात येईपर्यंत टॅक्स कपात करता येणार नाही असं धोरण ऋषी सुनक यांनी अवलंबवलं. तर दुसरीकडे आपल्या आठ आठवड्यांच्या प्रचार सभेत लिझ ट्रस यांनी टॅक्समध्ये तात
 
्काळ कपात करण्यावर भर दिला. त्यांच्या या धोरणामुळे त्या आघाडीवर आल्याचं दिसलं.
 
यावर सुनक यांनी लिझ ट्रसच्या यांच्या मुद्द्यावर कडाडून टीका केली. तसेच ट्रस यांच्या या धोरणामुळे ब्रिटनच्या सार्वजनिक वित्तपुरवठयाला गंभीर धोका निर्माण होईल असंही म्हटलं. त्यामुळे आता जर ट्रस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं तर ऋषी सुनक कसा प्रतिसाद देतील हे बघणं महत्वाचं ठरेल.
 
सुनक यांना त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, "मी कोणत्याही परिस्थितीत हुजूर पक्षाचंच समर्थन करीन."
 
भविष्यात पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उभे रहाल का? या प्रश्नावर सुनक म्हणाले, "आम्ही आत्ताच प्रचार सभांची सांगता केलीय. त्यामुळे मला सध्या विश्रांतीची गरज आहे एवढंच मी सांगेन."
 
सुनक खासदार म्हणून कायम राहतील. 2014 पासून ते रिचमंड (यॉर्क्स) मतदारसंघातून हुजूर पक्षाचं प्रतिनिधित्व करीत आहेत. ते म्हणाले की, नॉर्थ यॉर्कशायरच्या रिचमंड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणं खरं तर मोठी भाग्याची गोष्ट आहे."
 
"जोपर्यंत मी तिथं असेन मला त्यांच्यासाठी काम करत राहायला आवडेल," असं ही सुनक यावेळी म्हणाले.
 
मी पंतप्रधान झाले तर एका आठवड्याच्या आत ऊर्जा पुरवठ्याचा प्रश्न निकाली काढेन, असं ट्रस एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, ऊर्जेचा जो वाढता खर्च आहे त्याला पायबंद घालण्यासाठी सरकार मार्फत प्रयत्न केले जातील.
 
तसेच देशांतर्गत ऊर्जा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सगळ्यांच्याच प्रयत्नांची गरज असल्याचंही त्या या कार्यक्रमात म्हणाल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती