पापुआ न्यू गिनी : 3800 लोकवस्तीच्या भागावर दरड कोसळली, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

सोमवार, 27 मे 2024 (20:00 IST)
पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनात ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांची संख्या हजारोंमध्ये असण्याची भीती सरकारी यंत्रणेनं व्यक्त केली आहे.राष्ट्रीय आपत्ती केंद्राच्या कार्यकारी संचालकांनी एका पत्रात म्हटलं आहे की, शुक्रवारी (24 मे) झालेल्या या भूस्खलनात 2,000 पेक्षा अधिक लोक जिवंत गाडले गेले असण्याची भीती आहे.
 
मात्र, किती लोकांचा मृत्यू झाला आहे किंवा किती लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, याची निश्चित संख्या सांगता येणं कठीण आहे. काही ठिकाणी हा ढिगारा 32 फूट खोल आहे. त्यामुळे पुरेशा उपकरणांच्या अभावी मदत कार्यात अडचणी येत आहेत.काही मृतदेह आतापर्यत सापडले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेनं या भूस्खलनात सुमारे 670 लोक गाडले गेल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
 
पापुआ न्यू गिनीमधील स्थलांतरासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रमुख, सेरहन अक्टोप्राक यांनी सांगितलं की, "पापुआ न्यू गिनीच्या एन्गा प्रांतात शुक्रवारी झालेल्या भूस्खलनामुळे सुरुवातीला या घटनेत जेवढं नुकसान होईल असं वाटलं होतं त्याहीपेक्षा जास्त भीषण परिणाम झाले आहेत."दक्षिण-पश्चिम पॅसिफिक महासागरात असणाऱ्या या देशातील एन्गा प्रांतात डोंगराळ प्रदेशात ही घटना घडली आहे.
 
अक्टोप्राक म्हणाले की, "जमीन अजूनही सरकत असल्याने" बचावकर्त्यांनासुद्धा धोका आहे. तसंच, ते पुढे म्हणाले की, पाणी वाहत आहे आणि यामुळे सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. भूस्खलनाचा फटका बसलेल्या भागात जवळपास 3,800 लोक राहतात.
 
मदतकार्यात सहभागी असलेल्या केअर ऑस्ट्रेलिया या मानवतावादी संस्थेने मृतांचा आकडा जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली होती. कारण आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे या भागात येऊन राहिलेल्या निर्वासितांची संख्या अधिक आहे. या आपत्तीमुळे किमान 1,000 लोक बेघर झाले आहेत. सेरहन अक्टोप्राक म्हणाले की या घटनेमुळे शेतं वाहून गेली आहेत. पाण्याचे स्रोत नष्ट झाले आहेत. पापुआ न्यू गिनीमधली ही घटना शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 03:00 वाजेच्या सुमारास घडली. यावेळी लोक झोपेत असण्याची शक्यता जास्त होती.
 
अक्टोप्राक म्हणाले की, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले जात आहेत. "लोक मातीखाली दफन केलेले मृतदेह काढण्यासाठी काठ्या, कुदळ, मोठे शेतीची अवजारं वापरत आहेत."
 
रविवारपर्यंत, या ठिकाणी पाच मृतदेह सापडले होते यासोबतच इतर काही मृतदेहांचे तुकडे देखील बाहेर काढण्यात आले आहेत.
 
भूस्खलनामुळे वाहून आलेल्या ढिगाऱ्यात मोठंमोठे दगड, झाडं आणि माती आहे. काही भागात 8 मीटर (26 फूट) पर्यंत हा गाळ साचलेला आहे.
 
एन्गा प्रांतात फक्त एकच महामार्ग आहे आणि केअर ऑस्ट्रेलियाने सांगितले की, रस्त्याच्या मोठ्या भागांवर मलबा पडला होता, ज्यामुळे घटनास्थळावर जाण्यास अडचणी येत होत्या.
राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्राच्या कार्यकारी संचालकांनी सांगितलं आहे की मदत आणि बचाव टीम वेगानं काम करत आहेत.
 
भूस्खलनाचा तडाखा बसलेल्या स्थानिक लोकांना अजूनही मोठ्या प्रमाणात मदत आणि बचाव कार्याची अपेक्षा आहे.
 
सुसेटे लासो माना यांच्या पत्रात म्हटलं आहे की नुकसानीची व्याप्ती मोठी आहे. देशाच्या आर्थिक जीवनवाहिनींवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
 
पंतप्रधान जेम्स मारापे यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पोर्ट मोरेस्बी या राजधानीपासून जवळपास 600 किमी वायव्येस घडलेल्या या संकटात मदत आणि बचाव कार्यासाठी देशाचं सैन्यदल आणि आपत्ती निवारण यंत्रणांना काम करण्याचा आदेश दिला आहे.
 
मात्र, कोकोलम या भूस्खलनाचा तडाखा बसलेल्या गावातील स्थानिकांचं म्हणणं आहे की अजूनही मोठ्या प्रमाणावर बचत कार्य सुरू होण्याची ते वाट पाहत आहेत.
 
एविट कांबू या एका स्थानिक रहिवाशी महिलेनं सांगितलं की तिला वाटतं आहे की तिच्या कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखील अडकले आहेत. "माझ्या कुटुंबातील 18 सदस्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. गावातील अनेक कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली सापडले असण्याची शक्यता आहे. मी त्यांची मोजदाद देखील करू शकत नाही."
 
"तुम्ही सर्व जे आम्हाला मदत करायला आलात त्याबद्दल धन्यवाद. मात्र मला मृतदेह बाहेर काढणं शक्य होत नसल्यानं मी असहाय्यपणे इथे उभी आहे."
 
या ठिकाणाला भेट दिलेल्या येथील समुदायाच्या एका नेत्यानं बीबीसीला सांगितलं की, स्थानिक लोकांमध्ये अशी भावना निर्माण झाली आहे की त्यांच्या परिस्थितीवर सोडून देण्यात आलं आहे. ढिगाऱ्यातून माणसं बाहेर काढण्यासाठी ते मिळेल त्या साहित्याचा वापर करून खणत आहेत. ते त्यांच्या हातानं माती बाजूला सारून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
"आता या घटनेला तीन ते चार दिवस होऊन गेले आहेत, मात्र अजूनही कित्येक मृतदेह हाती आलेले नाहीत. ते सर्व ढिगाऱ्याखाली अडकले आहेत आणि ढिगाऱ्याची माती दूर करणं खूपच अवघड ठरतं आहे. स्थानिक लोक सरकारकडे मदत मागत आहेत," असं इग्नास नेम्बो यांनी बीबीसीला सांगितलं.
 
मात्र एका पोलिस कर्मचाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की घटनास्थळी सैनिक आल्याचं त्यानं पाहिलं आहे आणि ते ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्याचा आणि जे ढिगाऱ्याखाली जिवंत अडकले आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
या प्रांताचे पोलिस कमांडर मार्टिन केली यांनी सांगितलं की, हे सर्व प्रयत्न अनिश्चित स्वरुपाचे आहेत. कारण कारच्या आकाराचे दगड आणि इतर मोठाले अडथळे काढल्यामुळे पुढील खडक घसरणाचा धोका आहे.
 
"या क्षणी इथं खोदणं खूपच कठीण आहे कारण आम्हाला पुढील भूस्खलनाची आणि मृत्यूंची चिंता वाटते आहे. त्यामुळे स्थानिक लोक फक्त तिथेच खणत आहेत जिथं त्यांना सुरक्षित वाटतं आहे. जे लोक गाडले गेले आहेत त्यांची ओळख पटवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत," असं ते म्हणाले.
 
शुक्रवारी ही घटना घडल्यापासून अनेकदा त्यांनी या ठिकाणाला भेट दिली आहे. ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या आणि वाचलेल्या लोकांचे मदतीसाठीचे आवाज ऐकू आल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
स्थानिक प्रसारमाध्यमांनी खडकांखालून एक जोडपं जिवंत वाचवल्याची बातमी दिली आहे. हे जोडपं वाचलं कारण या भूस्खलनात त्यांच्या घराचा कोपराच सापडला होता.
 
बचाव टीमनं मदतीसाठीच्या त्यांच्या हाका ऐकल्यानंतर त्यांना बाहेर काढलं होतं असं वृत्त स्थानिक एनबीसी चॅनेलनं दिलं आहे.
 
या परिसरात आणखी पाऊस होण्याचा अंदाज असल्यामुळे येथील धोका वाढला आहे. त्यामुळे उरलेल्या रहिवाशांना इतरत्र हलवलं जातं आहे.
 
"सद्य परिस्थितीत इथली जमीन अस्थिर आहे आणि इथे आणखी भूस्खलन होण्याचा धोका आहे," असं जस्टीन मॅकमोहन या केअर ऑस्ट्रेलिया या घटनास्थळी मदत करत असलेल्या मानवतावादी संस्थेच्या कोऑर्डिनेटरनं सांगितलं.
 
"बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी अधिकाऱ्यांना येथील परिस्थितीचं योग्य मूल्यांकन करता यावं यासाठी सध्या आम्ही यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे."
 
याआधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतकार्य करणाऱ्या यंत्रणेनंदेखील मदतकार्यातील अडचणींबद्दल बीबीसीला सांगितलं होतं.
 
ढिगाऱ्यामध्ये मोठाले खडक, झाडं आणि मातीचा समावेश आहे.
 
मदत कार्य करणाऱ्या टीममधील लोकांनी सांगितलं की शहराकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्याचं मोठं नुकसान झाल्यामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत. मॅकमोहन यांनी सांगितलं की भूस्खलनामुळे जवळपास 200 मीटर लांबीच्या परिसराला फटका बसला आहे.
 
Published By- Priya Dixit
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती