कोरोना लशीची सोशल मीडियावर खिल्ली उडवणाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

शुक्रवार, 30 जुलै 2021 (15:00 IST)
कोरोना लशीसंदर्भात सोशल मीडियावर खिल्ली उडवणारे कॅलिफोर्नियातील स्फीफन हार्मन यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जवळपास एका महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
 
ते हिलसाँग मेगाचर्चचे सदस्य होते. त्यांचा लसीकरणाला जाहीर विरोध होता. लशींची खिल्ली उडवण्यासाठी ते विनोदी मालिका सुद्धा तयार करायचे.
 
"99 समस्या आहेत, पण लस नाही," 34 वर्षीय स्टीफन यांनी जूनमध्ये आपल्या 7 हजार फॉलोअर्ससाठी हे ट्वीट केलं होतं.
 
लॉस एंजेलिसबाहेर एका रुग्णालयात त्यांच्यावर न्यूमोनिया आणि कोव्हिड-19 वर उपचार करण्यात येत होते. परंतु बुधवारी (21 जुलै) त्यांचं निधन झालं.
 
उपचारादरम्यानही स्टीफन हार्मन सोशल मीडियावर सक्रिय होते. त्यांनी रुग्णालयातील काही फोटोसह पोस्ट केल्या होत्या.
 
एका पोस्टमध्ये ते म्हणतात, "माझ्यासाठी प्रार्थना करा. त्यांना खरंच मला व्हेंटिलेटवर ठेवायचं आहे."
 
बुधवारी त्यांनी शेवटचे ट्वीट केले होते, इनट्यूबेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं. "मी पुन्हा उठेन की नाही हे माहिती नाही. कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा."
 
विषाणूशी संघर्ष करत असतानाही त्यांनी म्हटलं की, आताही माझा लस घ्यायला विरोध आहे. माझा धार्मिक विश्वास माझं संरक्षण करेल. अशी त्यांची भूमिका होती.
 
मृत्यूपूर्वी त्यांनी साथीच्या रोगाबद्दल आणि लसीबद्दल विनोद केला होता. अमेरिकेतील वरिष्ठ रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फ्युसी यांच्यापेक्षा माझा बायबलवर विश्वास असल्याचे मीम्स त्यांनी शेअर केले होते.
 
हिलसाँगचे संस्थापक ब्रायन ह्यूस्टन यांनी गुरुवारी (22 जुलै) एका ट्विटमध्ये त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला.
 
ते म्हणाले, "आमच्या लाडक्या मित्राचे कोव्हिडमुळे निधन झाले. बेनने नुकतीच ही माहिती आम्हाला दिली."
 
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ते लिहितात, "माझ्या ओळखीच्या लोकांपैकी तो सर्वात उदार होता. आमच्या नातवंडांसोबत खेळण्यासाठी तो कायम पुढाकार घेत. अनेक लोक त्याची आठवण काढतील."
 
डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे यासाठी चर्च सदस्यांना कायम प्रोत्साहन देत असते असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
कॅलिफोर्नियामध्ये अलिकडच्या आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असून लस न घेतलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण अधिक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती