उत्तर गाझामध्ये मदत पुरवठ्याची वाट पाहत असताना शंभरहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. इस्रायली लष्कराने हे कृत्य केल्याचा आरोप हमास नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने केला आहे. इस्रायली सैन्याने जमावावर थेट गोळीबार केल्याचंही म्हटलं जात आहे. पण इस्रायलने हा आरोप फेटाळला आहे. इस्रायली लष्कराने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ट्रकने चिरडल्यामुळे डझनभर लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. गाझा शहरातील एका पत्रकाराने बीबीसीला सांगितले की, लोक मदत साहित्य घेण्यासाठी आले होते. तेव्हाच इस्रायली रणगाड्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. पण इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे की, या भागात गोळीबाराचे कोणतेही वृत्त मिळाले नाही आणि या प्रकरणाचा आढावा घेतला जात आहे. सोशल मीडियावरील विचलित करणाऱ्या काही व्हीडिओंमध्ये मृतदेह रिकामे ट्रक आणि गाड्यांवर ठेवलेले दिसत आहे.
30 हजारांचा तो आकडा जाहीर करण्याआधी घडली ही घटना
गाझामधील हमास-नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने या युद्धात मारल्या गेलेल्या लोकांची एकूण संख्या जाहीर करण्याच्या काही तास आधी ही घटना घडली आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की इस्रायल-हमास यांच्या युद्धात 30,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत, ज्यात 21,000 मुले आणि महिलांचा समावेश आहे. गाझापट्टीमध्ये सुमारे सात हजार लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि गेल्या चार महिन्यांत 70,450 जखमींवर उपचार करण्यात आले आहेत. याच दरम्यान UNने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर गाझामध्ये उपासमारीत वाढ होऊ शकते. कारण येथील सुमारे तीन लाख लोकांकडे अन्न आणि शुद्ध पाणी फार कमी आहे. गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी इस्रायली लष्कराने गाझातील हमास संघटनेचा नायनाट करण्यासाठी हवाई आणि जमिनीवरून मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. इस्रायल आणि ब्रिटनसह इतर अनेक देशांनी हमासला 'दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केले आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला केला. त्यामध्ये सुमारे 1200 इस्रायली लोक मारले गेले आणि 253 लोकांचे अपहरण केले. त्यानंतर इस्रायलने गाझापट्टीवर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले केले आहेत. गाझा आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-कुद्रा यांनी सांगितले की, गुरुवारी (29 फेब्रुवारी) सकाळी राशिद रोडवरील नबुलसी चौकात 112 लोक मारले गेले आणि 760 जखमी झाले. त्यांनी यासाठी इस्रायली सैन्याला जबाबदार धरले आहे आणि त्या घटनेला त्यांनी “नरसंहार” म्हटलं आहे. ते म्हणाले की, डझनभर गंभीर जखमी लोकांना गाझा शहरातील जवळच्या अल-शिफा रुग्णालयात आणण्यात आले आहे.
जमिनीवर विखुरलेले मृतदेह
गाझातील आरोग्य कर्मचारी फेअर अफाना यांनी AP या वृत्तसंस्थेला सांगितलं की रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी शेकडो लोक जमिनीवर पडलेले आढळले. ते म्हणाले की पुरेशा रुग्णवाहिका नसल्यामुळे काही मृत आणि जखमींना गाढवाच्या गाड्यांवरून रुग्णालयात नेले जात होते. अधिकृत पॅलेस्टिनी न्यूज एजन्सी वाफाने वैद्यकीय सुत्रांच्या आधारे सांगितले की, इस्रायली सैन्याने गाझा शहर आणि इतर उत्तरेकडील भागात हजारो लोकांवर गोळीबार केला. हे लोक मदत पोहोचवणाऱ्या वाहनांची नबुलसी चौकात वाट पाहत होते. गेल्यावर्षी इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात प्रामुख्याने उत्तर गाझाला लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून या भागात मदत सामग्री पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अनेक महिन्यांपासून इथे मानवतावादी मदत नीट पोहोचत नाही. एकप्रकारे हा भाग तुटला आहे, त्यामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) सांगितले की ते उत्तर गाझाला मदत पाठवू शकत नाही आणि अन्न पुरवठा निलंबित करण्यास भाग पाडले जात आहे. याआधी मदत पोहोचवण्यासाठी गेलेली वाहनं गाझातील एका चौकीवर भुकेलेल्या लोकांनी घेरली होती.
याशिवाय मदत साहित्याच्या आणखी एका खेपेबाबतही असाच प्रकार घडला आहे. गाझातील काही भागात मदत सामग्रीने भरलेली अनेक वाहने लुटण्यात आली. एका चालकाला मारहाणही करण्यात आली. मोठ्या कष्टाने शहरात मदत पोहोचवली जात आहे. मंगळवारी, संयुक्त राष्ट्राच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गाझापट्टीतील किमान 5 लाख 76 हजार लोक उपासमारीचा सामना करत आहेत. इथल्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकांना तीव्र उपासमारीचा धोका आहे. उत्तर गाझामधील दोन वर्षांखालील सहा मुलांपैकी एक गंभीर कुपोषणाचा सामना करत आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, डिहायड्रेशन आणि कुपोषणामुळे उत्तर गाझामधील रुग्णालयात सहा मुलांचा मृत्यू झाला आहे.