इस्रायल हमास युद्ध: कुटुंबाचं पोट भरण्यासाठी गाझाच्या रस्त्यावर भटकणाऱ्या लहान मुलांची गोष्ट

बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (11:35 IST)
गाझा पट्टीतल्या काही ठिकाणी, माणसांसाठी 'जिवंत राहणं' ही गोष्टसुद्धा अभिमानाची बनलीय. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी हे लोक घराबाहेरही पडू शकत नाहीयेत.
 
गाझाच्या दक्षिणेकडच्या राफा शहरात राहणारा 11 वर्षांचा मोहम्मद झोराब रोज सकाळी एका मोहिमेवर निघतो.
 
मोहम्मद त्याच्या हातात पिवळ्या रंगाचं भांडं घेऊन निर्वासितांना ज्या शाळांमध्ये ठेवलं गेलंय, त्या शाळा आणि त्यांच्या छावण्या धुंडाळण्याचं काम करतो. त्या छावण्यांमध्ये राहणारी कुटुंबं जगण्यासाठी धडपडत असली तरीही अनोळखी लोकांच्या मुलांना ते काहीबाही खायला देतात.
 
मोहम्मद इस्पितळांमध्येही जातो. तिथे हल्ल्यात जखमी झाल्यानं सतत आणलं जात असतं. एवढंच काय ज्या ज्या ठिकाणी चुलीवर एखादं भांडं ठेवलेलं असेल त्या त्या ठिकाणी जाऊन त्याच्या पिवळ्या भांड्यात त्याला जे काही मिळवता येईल ते मिळवायचा प्रयत्न मोहम्मद करतो.
 
मोहम्मद म्हणतो की, "मी गोळा केलेलं अन्न घेऊन घरी जातो तेव्हा माझ्या कुटुंबीयांना आनंद होतो आणि मग आम्ही सगळे मिळून जेवतो."
 
"कधीकधी मात्र मला रिकाम्या हाताने घरी परतावं लागतं, तेव्हा वाईट वाटतं."
 
राफामध्ये प्लास्टिक आणि ताडपत्रीपासून बनवलेल्या एका घरात मोहम्मद आणि त्याचे कुटुंबीय राहतात. मोहम्मद त्याच्या चार भावंडांमध्ये सगळ्यात मोठा आहे.
 
दिवसभर फिरून मोहम्मदचे वडील खालेद मिळेल ते काम करतात. या कामातून त्यांना दिवसाचे पाच शेकेल (इस्रायली चलन) (114.37रुपये) मिळतात. याच पैश्यांमधून त्यांच्या दोन महिन्यांच्या मुलीसाठी त्यांना डायपर खरेदी करावे लागतात.
 
कुटुंबासाठी अन्न गोळा करण्याची जबाबदारी अंगावर येऊन पडलेल्या हजारो मुलांपैकी मोहम्मद हा एक आहे
तो म्हणतो की, "जेवण मागणाऱ्यांच्या रांगेत माझ्या पुढे शंभर लोक असतील तर मी हळूच त्या रांगेत पुढे जातो."
 
गर्दीत घुसून भांडण न करता हवं ते मिळवण्याच्या त्याच्या कौशल्याचा त्याला अभिमान वाटतो.
 
बहुतांश वेळा त्याचं भांडं शिजवलेल्या बीन्सने भरलेलं असतं. घरी परतल्यानंतर मोहम्मद त्याच्या आईकडे ते भांडं देतो. त्यानंतर त्याची आई समर तिच्या सगळ्या मुलांमध्ये ते अन्न वाटते. समर खूपच कृश दिसत असल्या तरी त्या बहुतांश वेळा त्या स्वतः जेवतच नाहीत.
 
त्या म्हणतात की, "मला हाडांचा कर्करोग झालाय. माझ्याकडे बघितल्यावर मी तुम्हाला 60 वर्षांची म्हातारी वाटेन पण मी 31 वर्षांची आहे."
 
"मला चालल्यावर खूप थकवा येतो. माझं संपूर्ण शरीर दुखतंय मला उपचार आणि चांगल्या पोषक आहाराची गरज आहे."
 
गाझा पट्टीतल्या खान युनूस शहरातून राफामध्ये आलेल्या अनेक कुटुंबांपैकी एक हे एक कुटुंब आहे. तीन महिन्यांपूर्वी इस्रायलच्या लष्कराने त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना खान युनूस सोडून राफामध्ये जायला सांगितलं होतं.
 
खान युनूस गाझा पट्टीच्या उत्तरेला आहे तर राफा दक्षिण टोकावर इजिप्तच्या सीमेला लागून असणारं एक शहर आहे.
 
पंधरा दिवसांपूर्वी इस्रायलने हमासच्या ताब्यात असलेल्या दोन ओलिसांची सुटका करण्यासाठी छापा टाकला तेव्हा 70 हून अधिक लोक मारले गेले. युद्ध आता हळूहळू राफाकडे सरकत आहे.
 
झोराब कुटुंबाच्या घराचं छत नेहमी गळत असतं, पाऊस आला की त्यांच्या झोपडीत पावसाचं पाणी साचतं. दोन महिन्यांच्या होवैदासाठी त्यांच्याकडे नवीन डायपर नसतात.
 
इजिप्तच्या सीमेवर असणाऱ्या राफा शहरात सध्या सुमारे 15 लाख लोक राहत आहेत. हा आकडा या शहराच्या क्षमतेपेक्षा किमान पाच पटींनी जास्त आहे. इथे राहणाऱ्यांना रोज नवनवीन समस्यांचा सामना करावा लागतोय.
 
गाझापट्टीत राहणारे सुमारे 85% लोक आता विस्थापित झाले आहेत आणि त्यांच्यासाठी मिळणारी मदत खूपच तुटपुंजी आहे.
 
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या गाझा मध्ये रोज मदतीच्या पाचशे ट्रक्सची गरज आहे. पण गाझात राहणाऱ्या लोकांसाठी धान्य आणि इतर वस्तू घेऊन फक्त 90 ट्रक सीमा ओलांडून गाझात येतायत.
 
उत्तर गाझामधली परिस्थिती याहीपेक्षा बिकट आहे. इस्रायल म्हणतंय की संयुक्त राष्ट्र संघटना उत्तरेकडच्या लोकांना मदत पोहोचवण्यात अपयशी ठरली आहे. गाझाच्या सीमेवर मदतीने भरलेले अनेक ट्रक थांबून असल्याचंही इस्रायलने सांगितलंय.
 
संयुक्त राष्ट्रांनी उत्तरेकडे दिली जाणारी मदत थांबवली आहे, कारण मदत घेऊन जाणाऱ्या गाड्या चालवणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काहीही करण्यात आलेलं नाही.
 
मागच्या काही दिवसांमध्ये या गाड्यांवर जमावाकडून आणि गुन्हेगारी टोळ्यांकडून हल्ला करण्यात आलाय. मदतीचे ट्रक्स मोठ्या प्रमाणात लुटण्यात आले आहेत.
 
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या नौदलाने केलेल्या गोळीबारात मदत घेऊन जाणाऱ्या एका ट्रकवर हल्ला करण्यात आला.
 
याशिवाय हमासच्या पोलीस दलानेही इस्रायली लष्कराकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्याच्या भीतीने मदतीचे ट्रक सुरक्षितपणे घेऊन जाण्यास नकार दिला आहे.
 
आम्हाला आमचे लोक परत द्या
इस्रायलमध्ये राहणाऱ्या बहुसंख्य लोकांचं लष्करी कारवाईला समर्थन आहे. त्या देशातली एकही संस्था सध्या गाझाला दिली जाणारी मदत वाढवण्याच्या बाजूने नाही.
 
नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असं आढळून आलं की इस्रायलचे 68% लोक गाझामध्ये राहणाऱ्यांसाठी कसलीही मदत पाठवण्याच्या विरोधात आहेत.
 
विशेषतः हमासने अजूनही काही लोकांना ओलीस ठेवलेलं असताना ही मदत करू नये असं त्यांना वाटतं.
 
याउलट इस्रायलमध्ये राहणाऱ्या 85% अरब नागरिकांनी हमासला मदत दिली पाहिजे असं मत व्यक्त केलंय.
 
झ्विका मोर यांच्या सगळ्यात थोरल्या मुलाचं हमासने 7 ऑक्टोबरला अपहरण केलं होतं. एतान नावाच्या त्यांच्या मुलाबाबत बोलताना झ्विका मोर म्हणतात की "मला बाबा म्हणून हाक मारणारा तो पहिला व्यक्ती होता. ते, त्यांची पत्नी आणि एतानच्या भावंडांना अपहरण झालेल्या त्यांच्या भावाची सतत आठवण येत राहते.
 
हमासने ज्या नोव्हा संगीत महोत्सवावर हल्ला करून सुमारे 360 लोकांना ठार केलं होतं त्या संगीत महोत्सवात एतान सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याच्याकडे कसलंही शस्त्र नव्हतं.
 
झ्विका मोर हे हमासने अजूनही ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांनी स्थापन केलेल्या एका संघटनेचे अध्यक्ष आहेत.
 
हमाससोबत कोणताही करार होण्याआधी त्यांच्या प्रियजनांची सुटका व्हावी यासाठी ही संघटना प्रयत्न करत आहे. युद्धविराम, गाझामधील मानवतावादी मदत वाढवणे आणि पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणे या अटींवर ओलीसांची सुटका करण्याच्या कराराला त्यांचा विरोध आहे.
 
मोर म्हणतात की, "इस्रायलने गाझामध्ये एक मानवतावादी संकट उभं केलंय. पण आमच्यासाठी आमच्या कुटुंबीयांची सुटका होणं खूप महत्त्वाचं आहे."
 
"आम्हाला आमचे लोक परत हवे आहेत. कोणताही करार होण्याआधी आणि मदत पाठ्वण्याआधी आम्हाला आमचे लोक परत द्या."
 
गाझाच्या नागरिकांची परिस्थिती बघता हा निर्णय कठोर वाटत नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना मोर म्हणतात की, "हो पण आमच्याकडे लहान लहान मुलं आहेत. घरात म्हातारी लोकं आहेत. महिला आहेत."
 
"हे खूप सरळ आहे. आमचे लोक आम्हाला परत करा आणि त्याबदल्यात आम्ही तुम्हाला अन्न आणि औषधे देऊ."
 
गाझामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटना त्यांच्याकडे उरलेलं धान्य लोकांमध्ये वितरित करत आहेत. 'पायस प्रोजेक्ट ऑफ अमेरिका' नावाच्या स्वयंसेवी संस्थेत काम करणारे महमूद अल-क्विशावी उकळणाऱ्या बीन्सच्या भांड्याजवळ उभे आहेत. इथूनच मोहम्मद त्याच्या कुटुंबीयांसाठी अन्न घेऊन गेला होता.
 
महमूद अल-क्विशावी म्हणतात की, "आम्ही या लोकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी दररोज अथक प्रयत्न करत आहोत... तुम्ही या संकटात एकटे नाही आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत हेच आम्हाला त्यांना सांगायचं आहे."
 
या संस्थेकडे अन्न शिजवण्यासाठी आता गॅस नाहीये. त्यामुळे स्वयंसेवक लाकूड गोळा करून आणत आहेत आणि चुलीवर बीन्स शिजवून गाझातल्या काही लोकांचं पोट भरण्याचा प्रयत्न केला जातोय.
 
ते म्हणतात की, "अत्यंत उदास वातावरणात आम्ही काम करतोय. हे एक भीषण संकट आहे."
 
उत्तर गाझामध्ये कुपोषणामुळे लहान मुलांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या येतायत. उत्तर गाझामध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरने कुपोषणामुळे खूप मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती Action Aid नावाच्या सामाजिक संस्थेला दिली आहे.
 
कमल अडवान हॉस्पिटलमधील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. हुसम अबू साफिया यांनी एका व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं की, "कुपोषण खूप मोठ्या प्रमाणात पसरलं आहे. यासोबतच लहान मुलांच्या पचनसंस्थांना संसर्ग झालाय."
 
Action Aid ने दिलेल्या माहितीनुसार, "गाझामधल्या निर्वासित छावण्यांमध्ये केलेल्या चाचण्यांत असं दिसून आलं की दोन वर्षांपेक्षा कमी वयाचं सहापैकी एक बाळ तीव्र कुपोषित झालं आहे."
 
इथे राहणाऱ्या एकूण लोकसंख्येच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला असल्याची माहिती या संस्थेने दिली आहे.
 
उत्तर गाझामधील अल-शिफा मेडिकल कॉम्प्लेक्समधील आणखी एका डॉक्टरने सांगितलं की त्यांनी महमूद फतौह नावाच्या दोन महिन्यांच्या मुलावर उपचार केले होते, ज्याचा रुग्णालयात आल्यानंतर लगेच मृत्यू झाला.
 
डॉ. अमजद अलीवा म्हणतात की, "त्या मुलाला दूध मिळालं नव्हतं. त्या बाळाची आईच कित्येक दिवसांपासून जेवलेली नसल्यामुळे तिच्या शरीरात दूध तयारच होत नव्हतं."
 
"त्यामुळे त्या मुलाचं शरीर संपूर्णपणे डी-हायड्रेट झालं होतं आणि माझ्याकडे आला तेव्हा तो मुलगा त्याचे शेवटचे श्वास घेत होता."
 
इस्रायल-हमास युद्ध आणि भुकेमुळे गाझात अनेक लोक जगण्यासाठी संघर्ष करत आहेत.
 
(ॲलिस डॉयार्ड, हानीन अब्दीन, गिडी क्लेमन आणि स्टेफनी फ्राइड यांच्या सहकार्याने)
 
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती