इंडोनेशियामध्ये आता लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्यावर कायदेशीर बंदी

मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (23:13 IST)
इंडोनेशियामध्ये आता लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्यावर कायदेशीर बंदी आली आहे. त्यासाठी इंडोनेशियाच्या संसदेत नव्या फौजदारी कायद्याचा मसुदा तयार केला गेला आणि हा कायदा आता संमत झाला आहे.
 
या कायद्यानुसार विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवल्यास एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल.   
 
हा कायदा इंडोनेशियातील नागरिक तसेच परदेशी नागरिकांवरही बंधनकारक असेल.  
 
या कायद्यानुसार, आई-वडीलांनी तक्रार दाखल केल्यास अविवाहितांवरही कारवाई होऊ शकते.
 
पती किंवा पत्नी वगळता इतरांशी शारिरीक संबंध ठेवल्यास तो देखील गुन्हा ठरेल. यात संबंधित महिला किंवा पुरूषाने पार्टनरविरोधात गुन्हा दाखल करावा लागेल. 
 
या कायद्यात विवाहापूर्व संबंधावर बंदी घालण्यात आली असून दोषी आढळल्यास सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.   
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, या कायद्यामुळे इंडोनेशियाच्या हॉलिडे डेस्टिनेशनच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता असल्याची चिंता काही बिझनेस ग्रुप्सने व्यक्त केली आहे.   
 
इंडोनेशियाच्या एम्प्लॉयर्स असोसिएशन (APINDO) च्या उपाध्यक्ष शिंता विद्जाजा सुकमदानी म्हणाल्या की, "या कायद्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात कायदेशीर अनिश्चितता निर्माण होईल. सोबतच इंडोनेशियामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणारे गुंतवणूकदार सुद्धा त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करतील."  
इंडोनेशियात 2019 मध्येही सरकारने हा कायदा आणण्याची तयारी केली होती. पण हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून याला विरोध दर्शविला होता. हजारो विद्यार्थी जकार्ताच्या रस्त्यावर उतरले होते. पोलिसांवर दगडफेकही झाली होती.   
 
पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर अश्रुधुराचा आणि पाण्याच्या मारा करण्यात आला.  
देशातील मुस्लीमबहुल भागात लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी शिक्षा केल्याची उदाहरणं आहेत.   
इंडोनेशियाच्या ऍचे प्रांतात इस्लामिक कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाते.
 
जुगार खेळणे, दारू पिणे आणि भिन्नलिंगी लोकांना भेटणे यासाठी शिक्षा केली जाते.   
 
2021 मध्ये असंच एक प्रकरण घडलं होतं. दोन पुरुषांनी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप त्यांच्या शेजाऱ्यांनी केला होता. यावर पोलिसांनी त्या पुरुषांना सार्वजनिकरित्या 77 फटके मारले होते.   
 
त्याच दिवशी आणखीन एका जोडप्याला शिक्षा करण्यात आली होती. 
 
या महिलेने आणि पुरुषाने लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी 20 फटके मारले होते.  तर दारू प्यायलेल्या दोन पुरुषांना प्रत्येकी 40 फटके मारण्यात आले होते. 

Published by- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती