Indonesia Earthquake: जकार्तामध्ये 5.6 तीव्रतेचा भूकंप, 20 ठार, 300 हून अधिक जखमी

सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (14:36 IST)
इंडोनेशियातील जकार्ता येथे 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. यादरम्यान 20 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याचवेळी 300 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सियांजूरच्या प्रशासनाचे प्रमुख हरमन सुहरमन यांनी सांगितले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, केवळ एका रुग्णालयात सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किमान 300 लोकांवर उपचार सुरू आहेत. इमारतींमध्ये अडकल्यामुळे बहुतेकांना फ्रॅक्चर झाले आहे. मृतांचा आकडाही वाढू शकतो.
 
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सोमवारी 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे हवामानशास्त्र आणि भूभौतिकी संस्थेने सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये 10 किमी खोलीवर होता. मात्र, यामुळे सुनामी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार, जकार्तामध्ये भूकंपानंतर लोक घाबरले. कार्यालयात काम करणारे लोकही बाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारत हादरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. 
 
याआधी शुक्रवारी रात्री पश्चिम इंडोनेशियामध्ये भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. या काळात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) भूकंपाची तीव्रता 6.9 इतकी नोंदवली होती. त्याचा केंद्रबिंदू दक्षिण बेंगकुलूपासून 202 किमी नैऋत्येस 25 किमी खोलीवर होता. यानंतर दुसरा धक्का बसला, ज्याची तीव्रता 5.4 होती.


Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती