पुराचं पाणी बोगद्यात शिरलं आणि 13 जणांचा मृत्यू झाला, अनेक गाड्या अडकल्या

सोमवार, 17 जुलै 2023 (21:03 IST)
दक्षिण कोरियात पुरामुळे एक बोगदा पाण्यानं भरला आहे. बोगद्यात अनेक प्रवासी अडकले आहेत. या बोगद्यातून बचाव पथकातील कर्मचार्‍यांनी आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढले आहेत.
 
शनिवारी (15 जुलै) रात्री चिओंगजू नावाच्या शहरातील नदी दुथडी भरुन वाहिल्यानं बोगदा पाण्यानं भरला होता. पुरामुळे 683 मीटर लांबीच्या बोगद्यात अनेक वाहनं अडकली होती.
 
यातील बहुतांश लोक कारमध्ये होते. याशिवाय बोगद्यात एक बसही अडकली होती.
 
एकूण किती लोक अडकले आहेत, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दक्षिण कोरियामध्ये गेल्या आठवड्यात पाऊस आणि पुरामुळे 39 जणांना जीव गमवावा लागला आहे.
 
पुरामुळे दक्षिण कोरियात अनेकदा भूस्खलन झालं असून वीज सेवाही विस्कळीत झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत 9 जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
बोगद्यात अडकलेले लोक
हा बोगदा चिओंगजू शहरातील ओसोंग भागात आहे.
 
बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेले सर्व मृतदेह बसमधून प्रवास करत होते. याशिवाय 9 जणांना जिवंत वाचवण्यात यश आलं आहे.
 
अधिकाऱ्यांनी योग्य वेळी कारवाई केली असती तर या लोकांना वाचवण्यात यश आलं असतं, असं पीडित कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
 
दक्षिण कोरियाच्या स्थानिक माध्यमांनी नदीला पूर येऊ शकतो, असा इशारा देणाऱ्या बातम्या दिल्या होत्या.
 
या इशाऱ्यानंतर बोगद्यात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी कायदेशीर उपाय अवलंबता आले असते.
 
पाऊस आणि विद्ध्वंस
दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक मृत्यू ग्योंगसांगच्या डोंगराळ भागात झाले आहेत. या भागात अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे अनेक घरं वाहून गेली आहेत.
 
देशातील पूरग्रस्त भागांची हवाई छायाचित्रे हृदय पिळवटून टाकणारी आहेत. आकाशातून घरांचे छत फक्त दिसत आहे.
 
सरकारी यंत्रणेनं हजारो लोकांची सुटका केली आहे. शनिवारी गेओसाम धरणातून पाणी वाहू लागलं. धरणाच्या खाली राहणाऱ्या 6,400 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं.
 
असं असतानाही अनेक ठिकाणांहून लोक बाहेर पडू शकले नाहीत आणि ते अजूनही घरातच अडकून पडले आहेत.
 
गेल्या शुक्रवारी चुंगचियोंग इथं भूस्खलनामुळे एक रेल्वे रुळावरून घसरली. सुदैवानं त्या रेल्वेमध्ये एकही प्रवासी नव्हता.
 
कोरियातील ट्रेन रनिंग एजन्सी कोरेलनं म्हटलंय की, ते सध्या सर्व धीम्या गतीच्या रेल्वे थांबवत आहेत.
 
येत्या बुधवारपर्यंत आणखी पावसाचा अंदाज कोरियाच्या हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामानामुळे देशासमोरील धोका कायम असल्याचं विभागानं म्हटलं आहे.
 
मुसळधार पावसामुळे भारत, चीन आणि जपानमध्येही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
 
यामागे हवामान बदल हे प्रमुख कारण असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती