सर्व सैनिकांना सोशल मीडिया वापरण्यास पाकिस्तानात बंदी

सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (12:02 IST)
दहशतवाद आणि गरिबीशी झुंजत असलेल्या पाकिस्तानवर आता नव्या संकटांची टांगती तलवार लटकत आहे. पाकिस्तानने सैन्यदलातील सर्व अधिकारी, जवान यांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली आहे. बलुचिस्तान प्रांतातील सैनिक बंडखोरी करतील या भीतीतून पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. 
 
पाकिस्तानी लष्कराने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सोशल मीडियात देशाच्या लष्कराची संवेदनशील आणि गोपनीय माहिती लीक होत आहे. पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी हा मोठाच धोका आहे. ताकीद देऊनही सतत संवादासाठी सोशल मीडिया नेटवर्कचा वापर केला जात आहे, तो खूप घातक आहे. यासाठी सध्या सेवेत असलेले आणि निवृत्त अशा सैन्यदलातील सर्वांनी लष्कराशी संबंधित माहिती कोणत्याही ग्रुपवर शेअर करू नये.
 
दरम्यान, बलुचिस्तानातील सैनिक बंड उभारण्याच्या तयारीत असल्याची भीती पाकिस्तानच्या सत्ताधिशांना वाटत आहे. त्यामुळेच पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. बलुचिस्तान प्रांताने पाकिस्तानपासून अलग होऊन स्वतंत्रराष्ट्र स्थापन करण्याची मागणी केली आहे. आपल्या या मागणीच्या पाठपुराव्यासाठी त्यांच्याकडून सोशल मीडियाचा वापर होत आहे. 
 
नुकतेच त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात 'ये जो दहशतगर्दी है, इसकी पिछे वर्दी है' असा नारा दिला होता. हा नारा सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला होता. 
 
पाकिस्तानची दुखरी नस
 
बलुचिस्तान ही पाकिस्तानची दुखरी नस बनली आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तानकडून काश्मीरचा विषय काढला जातो, तेव्हा भारताकडून बलुचिस्तानचा विषय काढला जातो. 15 ऑगस्ट 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाचा उल्लेख केला होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती