हुक्का पार्लरवर बंदी, सरकारकडून अधिसूचना जारी

सोमवार, 8 ऑक्टोबर 2018 (09:40 IST)
राज्यामध्ये हुक्का पार्लरवर बंदी घालण्याबाबतच्या महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि ३ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. हुक्का पार्लर बंदी लागू करणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य ठरलं आहे. 
 
महाराष्ट्राआधी गुजरातने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हुक्का पार्लरवरील बंदीचे विधेयक महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्यानंतर ते मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले होते. राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केल्याने आता राज्यात हुक्काबंदी लागू झाली आहे. कमला मिलमध्ये लागलेल्या आगीनंतर हुक्काबंदीच्या मागणीने जोर पकडला आणि त्यानुसार राज्य सरकारने त्याविरोधात विधेयक मंजूर केले होते.
 
डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनात आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधीमंडळात हुक्का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला. यावर्षी एप्रिलमध्ये हे विधेयक विधीमंडळात पारित झालं. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती