Alec Baldwin : सिनेमाच्या शुटिंगच्यावेळेस सुटली गोळी, महिलेचा मृत्यू

शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (09:40 IST)
मेक्सिकोत सिनेमातील गोळीबाराच्या चित्रिकरणादरम्यान छायाचित्रण दिग्दर्शक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. प्रसिद्ध अभिनेते अॅलेक बॉल्डविन यांनी ही गोळी झाडली होती. या घटनेत सिनेमाचा दिग्दर्शक जखमी झाला आहे.
 
हेलिना हचिन्स असं या 42 वर्षीय छायाचित्रण दिग्दर्शिकेचं नाव होतं, तर जोएल सौझा असं 48 वर्षीय दिग्दर्शकाचं नाव आहे.
 
हेलिना हचिन्स यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर जखमी असलेल्या जोएल सौझा यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
 
गुरुवारी (21 ऑक्टोबर) सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान ही घटना घडल्याची पोलिसांनी माहिती दिली.
हेलिना हचिन्स छायाचित्रण दिग्दर्शक म्हणून काम करत होत्या, असं ट्रेड युनियननं विविध मासिकांशी बोलताना सांगितलं.
 
द इंटरनॅशनल सिनेमॅटोग्राफर्स ग्लिडनं या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, 'कधीही भरून न निघणारी हानी' असल्याचं म्हटलं.
 
मेक्सिकोतील बोनान्झा क्रीक रांच या प्रसिद्ध चित्रिकरणस्थळी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाहीय.
 
हेलिना हचिन्स या अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटच्या पदवीधर होत्या. अमेरिकन सिनेमॅटोग्राफर मासिकाने 2019 साली 'रायझिंग स्टार' असं म्हटलं होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती