रशियात अंदाधुंद गोळीबारात 93 जणांचा मृत्यू, 4 संशयितांना अटक

शनिवार, 23 मार्च 2024 (14:50 IST)
रशियाची राजधानी मॉस्कोमधील क्रोकस सिटी हॉल या कॉन्सर्ट हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबारात 93 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले असल्यची माहिती रशियन सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.या हल्ल्याप्रकरणी सुरक्षारक्षकांनी आतापर्यंत 4 संशयितांना अटक केली आहे.
रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी याला ‘दहशतवादी हल्ला’ म्हटले आहे. रशियन नॅशनल गार्ड हल्लेखोरांचा शोध घेत असून अजून त्यांची मोहिम संपल्याचं रशियानं जाहीर केलेलं नाही.
 
एका ऑनलाईन निवेदनानुसार या हल्ल्याची जबाबदारी कथित इस्लामिक स्टेट या कट्टरतावादी संघटनेच्या ISKP या गटानं घेतल्याचं म्हटलं जातंय. या निवेदनाची सत्यता तपासली जाते आहे.पण अमेरिकन गुप्तहेर संघटनांना काही दिवसांपूर्वीच ही संघटना रशियात मोठा हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती, असं समोर येतं आहे. दोनच आठवड्यांपूर्वी मॉस्कोमधल्या अमेरिकन दूतावासानं रशियातल्या अमेरिकन नागरिकांना सावधानतेचा इशाराही दिला होता. भारताचेे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेेध केला आहे. तर युक्रेननं या हल्ल्यामागे आपला हात नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
 
कुठे आणि कसा हल्ला झाला?
मॉस्कोच्या वायव्येकडील क्रास्नोगोर्स्क या उपनगरात क्रोकस सिटी रिटेल आणि कॉन्सर्ट कॉम्प्लेक्समध्ये हा हल्ला झाला.इथे 'पिकनिक' नावाच्या रशियन रॉक बँडची मैफल आयोजित केली होती. पण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी बंदूकधाऱ्यांनी उपस्थितांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. हल्ल्यावेळी सभागृहात सहा हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. घटनाास्थळी उपस्थित एकानं सांगितले आहे की, रॉक ग्रुप स्टेजवर येण्यापूर्वीच हा हल्ला झाला. 'पिकनिक'चे सर्व कलाकार सुरक्षित वाचले आहेत.
 
हल्लेखोरांनी कुठल्यातरी ज्वलनशील पदार्थ किंवा बाँबसदृष्य उपकरणाचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जाते आहे, कारण हल्ला सुरू झाल्यावर इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांच्या काचा फुटल्या. या भागात आग लागली आणि छताचा काही भागही कोसळला. रस्त्यावरून टिपरलेल्या दृष्यांत या इमारतीच्या वरच्या भागातून धूर आणि ज्वाळा उठताना दिसतात.
 
एका सुरक्षारक्षकाच्या माहितीनुसार, सशस्त्र हल्लेखोर प्रेक्षक बसण्याच्या जागेच्या मागील भागात आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यादरम्यान इतर हल्लेखोर हॉलच्या मध्यभागी असलेल्या दरवाजाजवळ गोळ्या झाडत होते. या सुरक्षारक्षकानं रशियन टेलिग्राम चॅनल बाझाला सांगितलं की, "तिथं आणखी तीन सुरक्षारक्षक होते आणि ते जाहिरात फलकांच्या मागे लपले. हे हल्लेखोर आमच्यापासून 10 मीटर अंतरावरुन जात होते आणि ते तळमजल्यावर उपस्थित लोकांवर गोळ्या झाडत होते.”
 
सभागृहात उपस्थित असलेल्या एका महिलेनं सांगितले की, येथे गोळ्या झाडल्या जात असल्याचं लोकांना समजताच ते व्यासपीठाकडे धावू लागले. मी स्टॉलजवळ एक माणूस उभा असल्याचे पाहिले, तिथे गोळीबार सुरू होता. मी लाऊडस्पीकरजवळ होते आणि जमिनीवर रेंगाळत होते."
 
बीबीसीने या घटनेशी संबंधित व्हीडिओंचे परीक्षण केले आहे, ज्यामध्ये हॉलच्या लॉबीत किमान चार बंदूकधारी हल्लेखोर अंदाधुंद गोळीबार करतानाा दिसतात. तर उपस्थित लोक बचावासाठी सैरावैरा धावताना दिसतात. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षापथकं त्वरीत घटनास्थळी दाखल झाली.
 
घटनास्थळी उपस्थित विटाली सांगतो की, तो हॉलच्या बाल्कनीत होता आणि त्याने हल्लेखोरांनी लोकांवर गोळीबार करताना पाहिले. तो म्हणाला, "त्यांनी काही पेट्रोल बॉम्ब फेकले आणि सगळीकडे आग लागली. आम्ही बाहेर पडण्याच्या दरवाजापर्यंत पोहोचलो पण तो लॉक होता. त्यामुळे आम्ही तळघरात गेलो."रशियन सुरक्षापथकानं नंतर इमारतीच्या तळघरात लपलेल्यांची सुटका केली.
 
घटनेच्या वेळी क्रोकस कॉम्प्लेक्समध्ये लहान मुले आणि तरुणही उपस्थित होते जे येथे बॉलरूम डान्सिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले होते, अशी माहिती मिळते आहे. कॉन्सर्ट हॉलमध्ये उपस्थित असलेले बरेच लोक पार्किंगच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. पण बरेच लोक टेरेसच्या दिशेने धावले.
 
हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट?
कथित 'इस्लामिक स्टेट' या कट्टरतावादी संघटनेच्या एका गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचा दावा एका ऑनलाईन निवेदनातून केला आहे. 'इस्लामिक स्टेट इन खोरासन प्रोव्हिन्स' अर्थात ISKP असं या गटाचं नाव आहे.
 
अमरिकेतील अधिकाऱ्यांनी हा दावा खरा असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं म्हटलं आहे. बीबीसीशी संलग्न असलेल्या सीबीएस वृत्तसमुहाला माहिती देताना एका अमेेरिकन अधिकाऱ्यानं सांगितलं की, इस्लामिक स्टेट रशियामध्ये हल्ला करू शकते, अशी माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.
 
त्यामुळेच रशियातील अमेरिकन दूतावासानं सावधानतेचा इशारा दिला होता. सध्याच्या परिस्थितीविषयी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं अमेरिकन व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.
ISKP ही कट्टरतावादी संघटना प्रामुख्यानं अफगाणिस्तानातून काम करते. तिथे तालिबानशीही या संघटनेच्या चकमकी उडताना दिसल्या आहेत.
 
इराण, मध्य आशिया आणि दक्षिण आशियाच्या काही भागांतील कारवायांमध्येही ही संघटना आणि त्यांच्याशी निगडीत गट सहभागी असल्याचा संशय वेळोवेळी व्यक्त केला जातो. काबुलमध्ये गुरुद्वारावर झालेला हल्ला आपणच केेल्याचं या संघटनेनं म्हटलं होतं. काबुलमध्ये 2022 साली रशियन दूतावासाबाहेर झालेल्या आत्मघातकी बाँबस्फोटाची जबाबदारी याच संघटनेेनं स्वीकारली होती.
 
2015 साली इजिप्तमध्ये एक रशियन विमान स्फोटानं उडवलं होतं, आणि त्यात सर्व 224 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. इस्लामिक स्टेटनं त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती आणि कथित बाँबचे फोटोही आपल्या मासिकात प्रकाशित केले होते. सीरियात या संघटनेविरुद्ध लढ्यामध्ये रशियाचा सहभाग, चेचन्यामधील इस्लामिक बंडखोरांविरोधातली रशियाची कारवाई आणि सोव्हिएत काळात रशियानं अफगाणिस्तानवर केलेला हल्ला यांमुळे या संघटनेचं रशियाशी शत्रुत्व आहे.
 
पुतिन, नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्को येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली अर्पण केली. मोदींनी ट्वीट करत म्हटलंय की, “मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आमच्या प्रार्थना पीडितांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या दु:खाच्या वेळी भारत रशियन सरकार आणि तेथील लोकांसोबत उभा आहे." रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी व्लादिमीर पुतिन यांची फेरनिवड झाल्यानंतर काही दिवसांतच हा हल्ला झाला आहे.
 
राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने मध्यरात्री आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर एक निवेदन जारी केले की, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना या हल्ल्याबद्दल आणि सुरक्षा यंत्रणांनी उचललेल्या पावलांची माहिती सतत दिली जात आहे.
 
पुतिन यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व विभागांना आदेश दिले आहेत, असं पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलंय.
 
अमेरिकेेनं दावा केला आहे की त्यांनी रशियन सरकारला मार्चच्या सुरुवातीलाच मॉस्कोमध्ये गर्दीच्या ठिकाणी हल्ला होऊ शकतो अशी चेतावणी दिली होती.
 
बीबीसीचे संरक्षण विषयक प्रतिनिधी गॉर्डन कोरेरा माहिती देतात की क्रेमलिन नं व्हाइट हाऊसच्या या इशाऱ्याकडे ‘प्रोपोगँडा’ म्हणून दुर्लक्ष केलं होतं.
 
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती