केजीबी ते रशियन राष्ट्रप्रमुख
व्लादिमीर पुतिन यांचा जन्म दुसऱ्या महायुद्धानंतर सात वर्षांनी, 7 ऑक्टोबर 1952 रोजी लेनिनग्राड शहरात झाला, जे आता सेंट पीटर्सबर्ग म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या जन्माआधी या शहरावर जर्मनीनं कब्जा केला होता, तेव्हा पुतिन यांचं कुटुंब कसंबसं त्यातून वाचलं. लहानपणीच्या त्या कठीण काळाचा पुतिन यांच्यावर मोठा परिणाम झाल्याचं सांगितलं जातं. लहानपणी व्लादिमीर आपल्यापेक्षा वयानं मोठ्या मुलांशी मारामारीही करत असत. लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीतून कायदा आणि अर्थशास्त्रात शिक्षण घेतल्यावर त्यांनी थेट केजीबी या रशियन गुप्तहेर संस्थेत काम करू सुरू केलं 16 वर्ष त्यांनी केजीबीमध्ये काम केलं, आणि या काळात पूर्व जर्मनीतही वास्तव्य केलं. 1989 साली पूर्व जर्मनीतलं रशिया पुरस्कृत कम्युनिस्ट सरकार कोसळलं आणि जर्मनीचं एकीकरण झालं, तेव्हा पुतिन यांनी त्या घडामोडी जवळून पाहिल्या. पुतिन तेव्हा ड्रेस्डेनमध्ये केजीबी मुख्यालयात होते. रस्त्याच्या पलीकडे पूर्व जर्मनीच्या गुप्तहेर संघटनेच्या कार्यालयावर जमावानं हल्ला केला, तेव्हा पुतिन यांनी तिथे तैनात रशियन लष्कराकडे मुख्यालयाच्या संरक्षणासाठी मागणी केली, पण मॉस्कोतून आदेश आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही आणि मॉस्को गप्प आहे, असं उत्तर त्यांना मिळालं. पुढच्याच वर्षी पुतिन मायदेशात परतले, तेव्हा तिथे राजकीय अस्थिरता होती. तेव्हा पुतिन यांनी 16 वर्षं गुप्तहेर म्हणून काम केल्यानंतर 1991मध्ये केजीबीचा राजीनामा दिला, तो राजकारणात प्रवेशासाठीच. अगदी लवकर ते राजकारणातल्या पायऱ्या चढत गेले. पुढे 1999 मध्ये रशियाचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष आणि लोकप्रिय उदारमतवादी नेते बोरिस येल्तसिन यांनी वाढत्या वयामुळे राजकारणातून निवृत्ती घेतली, तेव्हा त्यांचे राजकीय वारसदार म्हणून व्लादिमीर पुतिन यांचं नाव आपसूकच पुढे आलं. 1999 मध्ये पुतिन आधी रशियाचे काळजीवाहू पंतप्रधान झाले आणि 2000मध्ये निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले. रशियन घटनेतल्या तरतुदीनुसार कुणीही दोन टर्म पूर्ण झाल्यानंतर लगेच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकत नाही. त्याप्रमाणे 2008मध्ये पुतिन यांचा कार्यकाळ संपायला हवा होता. पण, पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडलं आणि ते एक पायरी उतरून पुन्हा पंतप्रधान झाले. पंतप्रधान असतानाही सगळे प्रमुख निर्णय पुतिनच घ्यायचे एवढी त्यांची पक्षावर पकड होती. पुन्हा 2012मध्ये पुतिन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. मग आपला दुसरा कार्यकाळ संपत असताना 2021 मध्ये त्यांनी देशात घटनादुरुस्ती केली. राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाळाची मर्यादा आठ वर्षांऐवजी सोळा वर्ष एवढी केली. 15 ते 17 मार्च 2024 रोजी झालेल्या निवडणुकीत पुतिन यांना 87% मते मिळाल्याचा दावा त्यांच्या पक्षानं केला आहे. या निकालावरही शंका घेतली जाते आहेच. पण पुतिन यांनी आता आणखी सहा वर्षांसाठी आपणच राष्ट्राध्यक्षपदी राहणार यावर शिक्कामोर्तब केलं आहे. इतकंच नाही तर त्यापुढची म्हणजे 2030 ची निवडणूक जिंकून पुतिन आता 2036 पर्यंत सत्तेत राहू शकतात. त्यामुळे पुतिन जोसेफ स्टालिन यांना मागे टाकून नंतर सर्वाधिक काळ रशियावर राज्य करणारे नेते ठरतील. रशियाला पुन्हा गतवैभव मिळवून देणं, हे आपलं स्वप्न असल्याचं पुतिन वारंवार सांगत आले आहेत. पण खरी परिस्थिती काय आहे?