शेल कंपनी शेतकऱ्यांना देणार 132 कोटींची नुकसान भरपाई कारण...
शनिवार, 24 डिसेंबर 2022 (15:05 IST)
तेल निर्मिती कंपनी शेलने खनिज तेल वाहून नेणाऱ्या पाईपलाईनमधून गळतीप्रकरणी 16 मिलिअन डॉलर्स म्हणजे जवळपास 132 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीच्या पाईपलाईनमधून गळती झाल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला होता. यानंतर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या फ्रेंड्स ऑफ द अर्थ आणि शेल यांच्यात झालेल्या वाटाघाटीनंतर कंपनीने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र आम्ही झालेल्या नुकसानाची जबाबदारी म्हणून नुकसान भरपाई देत नसल्याचं संयुक्त पत्रकात म्हटलं आहे.
नायजेरियातील खनिज तेल उत्पादक उद्योगामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर धक्का बसला आहे.
2004 ते 2007 या कालावधीत शेल कंपनीच्या खनिज तेल वाहून नेणाऱ्या पाईपलाईनमधून तेलगळती झाली होती. यासाठी शेल कंपनी कारणीभूत असल्याचा निर्णय नेदरलँड्सच्या न्यायालयाने दिला होता. त्यानंतर कंपनीने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलगळती हा आमच्याविरुद्ध कारस्थानाचा भाग असल्याचा युक्तिवाद शेल कंपनीने केला होता. शेल कंपनीचं मुख्यालय यंदाच्या वर्षीपर्यंत नेदरलँड्समध्ये होतं. पर्यावरणाला नुकसान पोहोचवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीला उपकंपनीच्या कृत्यासाठी कायदेशीरदृष्ट्या जबाबदार धरण्यात आलं.
नुकसान भरपाईतून आम्हाला नव्याने उभं राहायला बळ मिळेल. आम्ही भवतालातल्या पर्यावरणात गुंतवणूक करु शकू, असं एरिक डूह या एका शेतकऱ्याच्या मुलाने सांगितलं.
2008मध्ये फ्रेंड्स ऑफ द अर्थ स्वयंसेवी संघटनेचं नेदरलँड्सस्थित युनिट आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेल कंपनीविरोधात खटला दाखल केला होता.
ओरुमा, गोई, इकोट अडा उडो या भागातील लोकांना नुकसान भरपाई मिळेल.
नुकसान भरपाईची रक्कम प्रचंड नसली तरी नायजर डेल्टा भागातील नागरिक आणि पर्यावरणाशी निगडीत विषयांवर काम करणाऱ्या संस्थांसाठी हा मैलाचा दगड मानला जात आहे, असं बीबीसीच्या इशाक खालिद यांनी सांगितलं.
खनिज तेलाच्या प्रदूषणामुळे या भागात आजही नागरिकांचं आरोग्य आणि उदरनिर्वाहावर परिणाम होत आहे.
बरिझा डूह, आल्फ्रेड आकपन, फिडेलिस ए ओग्युरू आणि अलाली एफंगा या चार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपनीविरोधात खटला दाखल केला होता. कंपनीच्या पाईपलाईनमधून झालेल्या गळतीमुळे भूगर्भाचं आणि पाण्याचं प्रचंड नुकसान झालं होतं.
नुकसानभरपाईचा निर्णय होईपर्यंत या चार शेतकऱ्यांपैकी एफंगा आणि डूह यांचा मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या मुलांनी खटल्याची लढाई सुरु ठेवली.
नुकसान भरपाईच्या बरोबरीने न्यायालयाच्या निर्णयामुळे शेल कंपनीला तेलगळती होत असेल तर लक्षात यावं यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. ही यंत्रणा आता सुरू झाली आहे, असं शेल तसंच फ्रेंड्स ऑफ द अर्थ कंपनीच्या संयुक्त पत्रकात म्हटलं आहे.