श्रीरामविजय - अध्याय १२ वा

अध्याय बारावा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥
संतमंडळी बैसली थोर ॥ बृहस्पतीऐसे चतुर ॥ आतां साहित्यसुमनाचे हार ॥ गुंफोन गळां घालूं त्यांचे ॥१॥
अनर्ध्य शब्दरत्नें प्रकाशवंत ॥ त्यांचे ग्राहक चतुर पंडित ॥ विशेषें रघुनाथभक्त विरक्त ॥ ते प्रेमभरें डुल्लती ॥२॥
मतिमंद बैसतां श्रोता श्रवणीं ॥ तरी ग्रंथरस जाय वितळोनी ॥ जैसें भस्मामाजी नेऊनी ॥ व्यर्थ अवदान घालिजे ॥३॥
रत्नपरिक्षा करिती चतुर ॥ तेथें गर्भांध विटे साचार ॥ गायन ऐकती सज्ञान नर ॥ परी बधिर तेथें विटती पैं ॥४॥
कमळसुवास सेविती भ्रमर ॥ परी तो स्वाद न जाणे दर्दुर ॥ हंस घेती मुक्तांचा चार ॥ परी तो बकासी प्राप्त नाहीं ॥५॥
दुग्ध दोहोनि नेती इतर ॥ गोचिड तेथें अहोरात्र ॥ वसे परी प्राप्त त्यास रुधिर ॥ नेणे क्षीर मतिमंद तो ॥६॥
कीं वसंतकाळीं कोकिळा ॥ पंचमस्वरें आळविती ॥ रसाळा ॥ काकजाती तैशा सकळा ॥ परी तयां तो स्वर नव्हेचि ॥७॥
बलाहक गर्जना करिती गगनीं ॥ मयुर नाचती पिच्छें पसरूनी ॥ परी ते कळा वृषभांनीं ॥ नेणिजे जैशी सर्वथा ॥८॥
चकोर चंद्रामृत सेविती ॥ परी ते कळा कुक्कुट नेणती ॥ म्हणोनि श्रोता मंदमती ॥ सहसाही न भेटावा ॥९॥
श्रोता भेटलिया चतुर ॥ ग्रंथरस वाढे अपार ॥ जेवीं वीर संघटतां थोर ॥ रणचक्रीं रंग भरे ॥१०॥
असो एकादशाध्यायाचे अंतीं ॥ चित्रकुटी राहिला रघुपति ॥ सुदर्शन गंधर्व निश्र्चितीं ॥ काकरूपी उद्धरिला ॥११॥
उपरी सिंहावलोकनें करूनि तत्वतां ॥ श्रोतीं परिसावी मागील कथा ॥ दळभारेंसी भरत तत्वतां ॥ चित्रकूटासमीप आला ॥१२॥
तंव तो भूधरअवतार ॥ चित्रकूटाखालीं सौमित्र ॥ फळें वेंचितां तो दळभार ॥ गजरें येतां देखिला ॥१३॥
ओळखिला आपला घ्वजसंकेत ॥ आले कळलें शत्रुघ्न भरत ॥ म्हणे कैकयीनें पाठविले यथार्थ ॥ वनीं रघुनाथ वधावया ॥१४॥
हे युद्धासी आले येथ ॥ जरी रघुनाथास करूं श्रुत ॥ तरी हेही गोष्ट अनुचित ॥ युद्ध अद्भुत करीन मी ॥१५॥
माझा श्रीराम एकला वनीं ॥ हे आले दळभार सिद्ध करूनी ॥ तरी जैसा वणवा लागे वनीं ॥ तैसें जाळीन सैन्य हें ॥१६॥
रवीच्या किरणांवरी देखा ॥ कैशा चढतील पिपीलिका । कल्पांतविजूस मशक मुखा-॥ माजी केंवि सांठवील ॥१७॥
चढून प्रळयाग्नीचे शिरीं ॥ पत्रग कैसा नृत्य करी ॥ ऊर्णनाभीचे तंतुवाभीतरीं ॥ वारण कैसा बांधवेल ॥१८॥
तृणपाशेंकरून ॥ कैसा बांधवे पंचानन ॥ द्विजेंद्रासी अळिका धरून । कैसी नेईल आकाशा ॥१९॥
दीपाचें तेज देखोन ॥ कैसा आहाळेल चंडकिरण ॥ तैसा मी वीर लक्ष्मण ॥ मज जिंकूं न शकती हे ॥२०॥
भार देखोनि समीप ॥ क्षण न लागतां चढविलें चाप ॥ बाण सोडिले अमूप ॥ संख्येरहित ते काळीं ॥२१॥
वाटे गडगडितां महाव्याघ्र ॥ थोकती जेवीं अजांचे भार ॥ तैसे सोळा पद्में दळभार ॥ भयभीत जाहला ॥२२॥
त्या बाणांचे करावया निवारण ॥ वीर सरसावला शत्रुघ्न ॥ दोघांचें समसमा संधान ॥ बाणें बाण तोडित ॥२३॥
एक चंद्र एक मित्र ॥ कीं रमावर आणि उमावर ॥ किंवा ते मेरुमंदार ॥ युद्धालागीं मिसळले ॥२४॥
एक समुद्र एक निराळ ॥ एक दावाग्नि एक वडवानळ ॥ एक गदा एक चक्र निर्मळ ॥ विष्णुआयुधें भिडती कीं ॥२५॥
एक वासुकी एक भोगींद्र ॥ एक वसिष्ठ एक विश्र्वामित्र ॥ तैसे शत्रुघ्न आणि सौमित्र ॥ बाण सोडिती परस्परें ॥२६॥
एकावरी एक सोडिती बाण ॥ ते वरचेवरीं उडविती संपूर्ण ॥ बाणमंडप जाहला सघन ॥ चंडकिरण न दिसेचि ॥२७॥
रामनामबीजांकित ॥ बाण सुटती सतेज मंडित ॥ रघुनाथ नाम गर्जत ॥ सुसाटे निघत येतांचि ॥२८॥
वाटे ओढवला प्रळयकाळ ॥ वनचरां सर्वां सुटला पळ ॥ ऋषीश्र्वर पळती सकळ ॥ कडे वेंधती पर्वताचे ॥२९॥
सांडोनि गुंफा तपाचरण ॥ पळती आपुला जीव घेऊन ॥ एक धांवतां धापा दाटून ॥ मूर्च्छा येऊनि पडियेले ॥३०॥
एक म्हणती राक्षसदळ ॥ आलें रामावरी तुंबळ ॥ येणें मखरक्षणीं राक्षस सबळ ॥ वीस कोटी निवाटिले ॥३१॥
तें वैर स्मरोनि अंतरीं ॥ सत्य हे आले राघवावरी ॥ आतां सोमित्राची कैंची उरी ॥ अनर्थ निर्धारीं ओढवला ॥३२॥
असो ऋषीश्र्वर समस्त ॥ आले जेथें रघुनाथ ॥ गोष्टी सांगतां बोबडी वळत ॥ संकेत दाविती एक करें ॥३३॥
एक रुदन करूनि फोडित हांका ॥ वेगें पळवीं जनककन्यका ॥ आतां गूढ विवरीं लपवीं कां ॥ रघुनायका ऊठ वेगीं ॥३४॥
न भरे जों अर्ध निमेष ॥ चढविलें श्रीरामें धनुष्य ॥ जैसा उगवतां चंडांश ॥ गुंफेबाहेर तैसा आला ॥३५॥
ऋषींस म्हणे अयोध्यानाथ ॥ तुम्ही मनीं न व्हावें दुश्र्चित्त ॥ काळही विघ्न करूं आलिया येथ ॥ खंडविखंड करीन बाणीं ॥३६॥
पडत्या आकाशा दईन धीर ॥ रसातळा उर्वी जातां करीन स्थिर ॥ तुम्ही समस्त बैसा धरूनि धीर ॥ तपश्र्चर्या करीत पैं ॥३७॥
अथवा करावें अध्ययन ॥ न्याय मीमांसा सांख्यज्ञान ॥ पातंजल अथवा व्याकरण ॥ यांची चर्चा करा जी ॥३८॥
असो पाठींसीं घालून ब्राह्मण ॥ पुढें चालिला रघुनंदन ॥ तो ध्वजचिन्हें ओळखिलीं पूर्ण ॥ शत्रुघ्न बाण टाकीतसे ॥३९॥
आपले भेटीकारणें उत्कंठित ॥ सद्रद जाहला भरत ॥ लक्ष्मणापाशीं सीतानाथ ॥ क्षण न लागतां पातला ॥४०॥
मग म्हणे सौमित्रासी ॥ बा रे भरत आला भेटीसी ॥ तूं किमर्थ यासी युद्ध करिसी ॥ पाहा मानसीं विचारूनि ॥४१॥
ऐसें बोलतां राजीवनेत्र ॥ परी वीरश्रियेनें वेष्टिला सौमित्र ॥ सोडितां न राहे शर ॥ मग रघुवीर काय करी ॥४२॥
हातींचें धनुष्य हिरूनी ॥ श्रीरामें घेतलें तये क्षणीं ॥ सौमित्र लागला श्रीरामचरणीं ॥ हास्यवदन करूनियां ॥४३॥
श्रीरामें वरितां फणिपाळ ॥ अवघें वितळलें बाणजाळ ॥ जैसें निजज्ञान ठसतां केवळ ॥ मायापडळ जेवीं विरे ॥४४॥
भरतासहित अयोध्येचे जन ॥ सर्वीं विलोकिला रघुनंदन ॥ जैसा निशा संपतां चंडकिरण ॥ उदयचळीं विराजे ॥४५॥
तों भरतासी न धरवे धीर ॥ सप्रेम धांव घेतली सत्वर ॥ वाटेसीं साष्टांग नमस्कार ॥ वारंवार घालीतसे ॥४६॥
कीं बहुत दिवस माता गेली ॥ ते बाळकें समीप देखिली ॥ कीं गाय वनींहूनि परतली ॥ वत्सें आटोपिली धांवूनियां ॥४७॥
कीं क्षीराब्धि देखोनि त्वरित ॥ धांव घेत क्षुधाक्रांत ॥ कीं मृगजळ देखानि त्वरित ॥ मृग धांवती उष्णकाळीं ॥४८॥
कीं सफळ देखोनि दिव्य द्रुम ॥ झेंपावे जैसा विहंगम ॥ भरतें धरूनि तैसा राम ॥ चरणसरोजीं स्पर्शिला ॥४९॥
जैसें लोभियाचें जीवित्व धन ॥ तैसें भरतें दृढ चरण ॥ नयनोदकें करून ॥ केलें क्षालन रामपायां ॥५०॥

अध्याय बारावा - श्लोक ५१ ते १००
मग उचलोनियां दोहीं करीं ॥ बंधूसीं आदरें हृदयीं धरी ॥ जैसा जयंतपुत्र सहस्रनेत्रीं ॥ प्रीतीकरोनी आलिंगिला ॥५१॥
की क्षीरसागरीं लहरिया उठती ॥ त्या एकांत एक मिसळती ॥ कीं वेदशास्त्री श्रुती ॥ ऐक्या येती परस्परें ॥५२॥
तैसा अलिंगिला भरत ॥ तों शत्रुघ्न लोटांगण घालित ॥ परम प्रीतीं रघुनाथ ॥ आलिंगन देती तयातें ॥५३॥
सकळ अयोध्येचे ब्राह्मण ॥ रामासी भेटती प्रीतीकरून ॥ सर्व दळभार प्रजानन ॥ करिती नमन रामासी ॥५४॥
लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ परस्परें देती क्षेमालिंगन ॥ मग सुमंत प्रधानें येऊन ॥ श्रीरामचरण वंदिले ॥५५॥
मग सुमंत म्हणे रघुराया ॥ पैल वसिष्ठ आणि दोघी माया ॥ तंव त्या दशरथकुळवर्या ॥ धीर न धरवे ते काळीं ॥५६॥
सामोरा चालिला रघुनंदन ॥ भोंवते अपार अयोध्याजन ॥ जैसा कां वेदोनारायण ॥ अनेक श्रुतीं वेष्टिला ॥५७॥
येऊनियां वसिष्ठाजवळी ॥ रामें गुरुचरण वंदिले भाळीं ॥ जैसा मदनदहनाचे चरणकमळीं ॥ स्कंद ठेवी मस्तक ॥५८॥
तों कौसल्या सुमित्रा माता ॥ त्यांचीं वाहनें जवळी देखतां ॥ धांवोनी येतां रामसुमित्रासुतां ॥ उतरती खालत्या दोघीजणी ॥५९॥
कौसल्येचे चरणीं मस्तक ॥ ठेवूनि बोले रघुनायक ॥ म्हणे सुखीं कीं मम जनक ॥ श्रीदशरथ दयाब्धि ॥६०॥
तों जाहला एकचि कल्लोळ ॥ रुदन करिती लोक समग्र ॥ सुमित्राकौसल्येसी बहुसाल ॥ नाहीं पार तयातें ॥६१॥
वसिष्ठ म्हणे रघुनाथा ॥ तुझा वियोग न साहे दशरथा ॥ रामराम म्हणतां मोक्षपंथा ॥ गेला तात्काळ जाण पां ॥६२॥
वचन ऐसें ऐकतां कानीं ॥ करुणासागर मोक्षदानी ॥ विमलांबुधारा नयनीं ॥ तेच क्षणीं चालिल्या ॥६३॥
स्फुंदस्फुंदोनि विलाप थोर ॥ पित्यालागीं करी रघुवीर ॥ म्हणे पूर्ण सत्याचा सागर ॥ श्रीदशरथ वीर जो ॥६४॥
ज्याचे युद्धाची ठेव ॥ पाहती मानव इंद्रादि देव ॥ वृषपर्वा शुक्रादि सर्व ॥ दैत्य युद्धीं जिंकिले ॥६५॥
श्रोते म्हणती नवल येथ ॥ जो पुराणपुरुष रघुनाथ ॥ तो शोकार्णवीं पडिला ही मात ॥ असंगत दिसतसे ॥६६॥
जो जगद्वंद्य आत्माराम ॥ जो विश्र्वबीजफलांकित द्रुम ॥ तो शोकाकुलित परब्रह्म ॥ पितयालागीं कां जाहला ॥६७॥
विषकंठ आला कीं क्षीरसागरा ॥ उष्णता व्यापिली रोहिणीवरा ॥ पक्षिवर्या त्या खगेंद्रा ॥ सर्पबाधा केवीं जहाली ॥६८॥
चिंतामणी दरिद्रें व्यापिला ॥ कल्पवृक्ष केवीं निष्फळ जाहला ॥ प्रळयाग्नीचे डोळां ॥ अंधत्व केवीं पातलें ॥६९॥
तंव वक्ता दे प्रत्त्युत्तर ॥ श्रोतीं ऐकिजे सादर ॥ पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर ॥ मानवलोकीं अवतरला ॥७०॥
जगद्रुरु देवाधिदेव ॥ दावी मायेचें लाघव ॥ अवतारकारणाची ठेव ॥ लौकिकभाव दाविला ॥७१॥
नट जो जो धरी वेष ॥ त्याची संपादणी करी विशेष ॥ यालागीं जगदात्मा आदिपुरुष ॥ दाखवी आवेश मायेचा ॥७२॥
ऐसी उघडतां शब्दरत्न मांदुस ॥ गुणग्राहक श्रोते पावले संतोष ॥ संदेहरहित निःशेष ॥ जेंवी तम नासे सूर्योदयीं ॥७३॥
कीं वैराग्यें निरसे काम ॥ ज्ञानें वितळे जेवीं भ्रम ॥ जैसा निधानांतूनि परम ॥ दारुण सर्प निघाला ॥७४॥
करितां संशयाचें निरसन ॥ मागें राहिलें अनुसंधान ॥ तरी हे गोष्टीस दूषण ॥ सर्वथाही न ठेवावें ॥७५॥
ग्रासामाजी लागला हरळ ॥ तो काढावया लागेल वेळ ॥ कीं अनध्यायामाजीं रसाळ ॥ वेदाध्ययन राहिलें ॥७६॥
चोरवाटा चुकवावया पूर्ण ॥ अधिक लागला एक दिन ॥ तरी ते गोष्टीतें दूषण ॥ कदा सज्ञान न ठेविती ॥७७॥
रात्रीमाजीं सत्कर्में राहतीं ॥ परी सूर्योदयीं सवेंचि चालतीं ॥ छायेंस पांथिक बैसती ॥ सवेंचि जाती निजमार्गे ॥७८॥
समुद्राचें भरते ओहटें ॥ सवेंच मागुती विशेष दाटे ॥ कीं चपळ तुरंग चपेटे ॥ विसावा घेऊनि मागुती ॥७९॥
तेंवि परिसा पुढील कथार्थं ॥ आठवोनि पिता दशरथ ॥ शोकाकुलित जनकजामात ॥ क्षणएक जाहला ॥८०॥
मग वसिष्ठ म्हणे श्रीरामा ॥ प्रयागाप्रति जाऊनि गुणग्रामा ॥ उत्तरक्रिया करूनि निजधामा ॥ दशरथासी बोळविजे ॥८१॥
कित्येक प्राकृत कवि बोलत ॥ कीं जे पतनीं पडिला दशरथ ॥ परी हे गोष्ट असंमत ॥ बोलतां अनर्थ वाचेसी ॥८२॥
जयाचें नाम घेतां आवडीं ॥ जीव उद्धरले लक्षकोडी ॥ तो आपुला पिता पतनीं पाडी ॥ काळत्रयीं न घडे हें ॥८३॥
असो गयेप्रति येऊन ॥ उत्तरक्रिया सर्व सारून ॥ पिता निजपदी स्थापून ॥ आले परतोन चित्रकूटा ॥८४॥
सकळ ऋषी आणि अयोध्याजन ॥ बैसले श्रीरामासी वेष्टून ॥ मग भरतें घालोनि लोटांगण ॥ कर जोडूनि उभा ठाकला ॥८५॥
म्हणे जयजयाजी पुरुषोत्तमा ॥ मायाचक्रचालका पूर्णब्रह्मा ॥ विरिंचिजनका सुखविश्रामा ॥ मंगलधामा रघुराया ॥८६॥
हे राम करुणासमुद्रा ॥ हे रविकुलभूषणा राघवेंद्रा ॥ सर्वानंदसदना रामचंद्रा ॥ प्रतापरुद्रा जगद्रुरो ॥८७॥
हे राम रावणदर्पहरणा ॥ हे राम भवहृदयमोचना ॥ हे राम अहल्योद्धारणा ॥ मखरक्षणा सीताधवा ॥८८॥
हे राम कौसल्यागर्भरत्ना ॥ हे राम माया अपारश्रममोचना ॥ सनकसनंदमानसरंजना ॥ निरंजना निजरूपा ॥८९॥
दानवकाननवैश्र्वानरा ॥ ममहृदयारविंदभ्रमरा ॥ अज्ञानतिमिरच्छेदक दिवाकरा ॥ समरधीरा सर्वेशा ॥९०॥
हे राम भक्तचातकजलधरा ॥ प्रेमचकोरवेधकचंद्रा ॥ संसारगजच्छेदकमृगेंद्रा ॥ अनंगमोहना अनंगा ॥९१॥
उपवासी मरतां चकोर ॥ त्याचे धांवण्या धांवे चंद्र ॥ कीं अवर्षण पडतां जलधर ॥ चातकालागीं धांवे कां ॥९२॥
कीं चिंताक्रांतासी चिंतामणि ॥ सांपडे पूर्वभाग्येंकरूनि ॥ कीं दरिद्रियाचे अंगणीं ॥ कल्पवृक्ष उगवला ॥९३॥
कीं पतिव्रतेसी प्राणनाथ भेटला ॥ कीं क्षुधितापुढें क्षीराब्धि आला ॥ कीं साधकासी निधि जोडला ॥ आनंद जाहला तैसा आम्हां ॥९४॥
हंसें देखिलें मानससरोवर ॥ कीं प्रेमळा भेटला उमावर ॥ कीं संकल्पीं द्रव्य अपार ॥ दुर्बळ ब्राह्मणासी दीधलें ॥९५॥
तैसा आनंद जाहला जनांसी ॥ आतां सत्वर चलावें अयोध्येसी ॥ सांभाळावें बंधुवा आम्हांसीं ॥ श्रीदशरथाचेनि न्यायें ॥९६॥
आपुलें राज्य सांभाळावें ॥ गोब्राह्मणां प्रतिपाळावें ॥ आमुचे मनोरथ पूर्ण करावे ॥ आतां परतावें सत्वर ॥९७॥
जननी आमुची परम चतुर ॥ मज देत होती राज्यभार ॥ जैसे छेदोनियां शिर ॥ गुडघ्यास पूजा बांधिली ॥९८॥
पूज्यमूर्ति वोसंडून ॥ जैसे गुरवाचे धरी चरण ॥ राजकुमर सांडोन ॥ कन्या दिधली अजारक्षका ॥९९॥
पाडोनि देवळाचें शिखर ॥ घातलें भोंवतें आवार ॥ नागवूनि यात्रा समग्र ॥ अन्नसत्र घातलें ॥१००॥

अध्याय बारावा - श्लोक १०१ ते १५०
फणस टाकोनि रसाळ ॥ प्रीतीनें घेतलें कनकफळ ॥ मुक्त सांडोनि तेजाळ ॥ गुंज जैसी घातली ॥१॥
गार घेऊनि टाकिला हिरा ॥ अंधकार घेऊनि त्यजिलें दिनकरा ॥ पाच भिरकावूनि सत्वरा ॥ कांच बळें रक्षिली ॥२॥
परिस त्यागून घेतला खडा ॥ पंडित दवडूनि आणिला वेडा ॥ चिंतामणि टाकोनि रोकडा ॥ पलांडु घेतला बळेंचि ॥३॥
अमृत टाकूनि घेतली कांजी ॥ कल्पवृक्ष तोडोनि लाविली भाजी ॥ कामधेनु दवडोनि सहजीं ॥ अजा पूजी आदरें ॥४॥
निजसुख टाकोनि घेतलें दुःख ॥ कस्तूरी टाकूनि घेतली राख ॥ सोने टाकूनि सुरेख ॥ शेण जैसें घेतलें ॥५॥
सांडोनियां रायकेळें ॥ आदरें भक्षी अर्कींफळें ॥ ज्ञान सांडोनि घेतलें ॥ अज्ञान जाण बळेंचि ॥६॥
तैसें कैकयीनें केलें साचार ॥ वना दवडोनि जगदोद्धार ॥ मज द्यावया राज्यभार ॥ सिद्ध जाहली साक्षेपें ॥७॥
सर्व अपराध करूनि क्षमा ॥ अयोध्येसी चलावें श्रीरामा ॥ याउपरी जगदात्मा ॥ काय बोलिला तं ऐका ॥८॥
सूर्य मार्ग चुके करितां भ्रमण ॥ नेत्रीं अंधत्व पावे अग्न ॥ मशकाची धडक लागून ॥ जरी मेरु पडेल ॥९॥
पाषाण प्रहार लागून ॥ वायु पडेल मोडोनि चरण ॥ कीं पिपीलिका शोषी सिंधुजीवन ॥ विजूस धांवूनि मशक धरी ॥११०॥
धडधडीत अग्निज्वाळ ॥ कर्पूरतुषारें होय शीतळ ॥ हेंही घडेल एक वेळ ॥ परी वचनास चळ नोहे माझे ॥११॥
एक बाण एक वचन ॥ एकपत्नीव्रत पूर्ण ॥ चौदा वर्षें भरल्याविण ॥ कदापि आगमन घडेना ॥१२॥
ऐसें निश्र्चयाचें वचन ॥ बोलता जाहला रघुनंदन ॥ अग्नीनें आहाळे जैसें सुमन ॥ तैसें भरता जाहलें ॥१३॥
मग भरतें चेतविला जातवेद ॥ प्राण द्यावया जाहला सिद्ध ॥ म्हणे हा देह करीन दग्ध ॥ रामवियोग मज न सोसवे ॥१४॥
महाराज वाल्मीक मुनि ॥ भरतास एकांतीं नेऊनी ॥ मूळकाव्यार्थ अवघा कानीं ॥ भविष्यार्थ सांगितला ॥१५॥
तो ऐकतां कैकयीसुत ॥ उगाच राहिला निवांत ॥ मग येऊनि जनकजामात ॥ हृदयीं धरी भरतातें ॥१६॥
आपुल्या हस्तेंकरून ॥ पुसिले भरताचे नयन ॥ करें कुरवाळिलें वदन ॥ समाधान करीतसे ॥१७॥
देव बंदींचे सोडवून ॥ चौदा वर्षांत येतों परतोन ॥ मग वरदहस्त उचलोन ॥ भाष दीधली भरतातें ॥१८॥
चौदा वर्षें चौदा दिन ॥ पंधरावे दिवशीं पूर्ण ॥ माध्यान्हा येतां चंडकिरण ॥ भेटेन येऊन तुजलागीं ॥१९॥
भरत म्हणे हा नेम टाळतां ॥ मग देह त्यागीन तत्वतां ॥ श्रीरामचरणीं ठेविला माथा ॥ प्रेमावस्था अधिक पैं ॥१२०॥
भरत मागुता उठोन ॥ विलोकी श्रीरामाचें वदन ॥ अमलदलराजीवनयन ॥ तैसाचि हृदयीं रेखिला ॥२१॥
भरत सद्रद बोले वचन ॥ मी अयोध्येसी न जाय परतोन ॥ सकळ मंगळभोग स्नान ॥ त्यजूनि राहीन नंदिग्रामीं ॥२२॥
अवश्य म्हणे रघुनायक ॥ मणिमय पादुका सुरेख ॥ भरतासी दिधल्या शोकहारक ॥ येरें मस्तकीं वंदिल्या ॥२३॥
शिवमस्तकीं विराजे चंद्र ॥ तैशा शिरीं पादुका सुंदर ॥ शोक हारपला समग्र ॥ शरीर शीतळ जाहलें ॥२४॥
जैसें कंठीं धरितां नामस्मरण ॥ शीतळ जाहला पार्वती-रमण ॥ तैसाचि प्रेमळ भरत जाण ॥ अंतरीं पूर्ण निवाला ॥२५॥
शत्रुघ्नासी म्हणे रघुनाथ ॥ तूं आणि प्रधान सुमंत ॥ राज्यभार चालवा समस्त ॥ यथान्यायेंकरूनियां ॥२६॥
सदा स्तवावे संतसज्जन ॥ श्रीगुरुभजनीं सावधान ॥ दूर त्यागावे दुर्जन ॥ त्यांचें अवलोकन न करावें ॥२७॥
परदारा आणि परधन ॥ येथें कदा न ठेविजे मन ॥ वेदमर्यादा नुल्लंघावी पूर्ण ॥ प्राणांतही जाहलिया ॥२८॥
जरी क्लेशकाळ पातला बहुत ॥ परी धैर्य न सोडावें यथार्थ ॥ गुरुभजन पुण्यपंथ ॥ न सोडावे सर्वथा ॥२९॥
साधु संत गोब्राह्मण ॥ त्यांचें सदा करावें पाळण ॥ सकळ दुष्टांस दवडोन ॥ स्वधर्म पूर्ण रक्षावा ॥१३०॥
कथा कीर्तन पुराणश्रवण ॥ काळ क्रमावा येणेंकरून ॥ आपुला वर्णाश्रमधर्म पूर्ण ॥ सर्वथाही न त्यजावा ॥३१॥
संतांचा न करावा मानभंग ॥ हरिभजनीं झिजवावें अंग ॥ सांडोनि सर्व कुमार्ग ॥ सन्मार्गेंचि वर्तावें ॥३२॥
ऋषींचे आशीर्वाद घ्यावे ॥ वर्म कोणाचें न बोलावें ॥ विश्र्व अवघें जाणावें ॥ आत्मरूपीं निर्धारें ॥३३॥
सत्संग धरावा आधीं ॥ नायकावी दुर्जनांची बुद्धि ॥ कामक्रोधादिक वादी ॥ दमवावे निजपराक्रमें ॥३४॥
मी जाहलों सज्ञान ॥ हा न धरावा अभिमान ॥ विनोदेंही पराचें छळण ॥ न करावें सहसाही ॥३५॥
शमदमादिक साधनें ॥ स्वीकारावी साधकानें ॥ जन जाती आडवाटेनें ॥ त्यांसी सुमार्ग दाविजे ॥३६॥
शोकमोहांचे चपेटे पूर्ण ॥ आंगीं आदळत येऊन ॥ विवेकवोडण पुढें करून ॥ ज्ञानशस्त्र योजावें ॥३७॥
काम क्रोध मद मत्सर ॥ हे गृहासी येऊं न द्यावे तस्कर ॥ आयुष्य क्षणिक जाणोनि साचार ॥ सारासार विचारावें ॥३८॥
क्षणिक जाणोनि संसार ॥ सोडावा विषयांवरील आदर ॥ सद्रुवचनीं सादर ॥ सदा चित्त ठेविजे ॥३९॥
दैवें आलें भाग्य थोर ॥ त्याचा गर्व न धरावा अणुमात्र ॥ एकदांचि जरी गेलें समग्र ॥ कदा धीर न सांडावा ॥१४०॥
कमलपत्राक्ष कृपानिधान ॥ वर्षत स्वातीजल पूर्ण ॥ ते सुमंत आणि शत्रुघ्न ॥ कर्ण शुक्तिकेंत सांठविती ॥४१॥
शब्दामृत वर्षे रामचंद्र ॥ निवाले भरत कर्णचकोर ॥ कीं रामवचन क्षीरसागर ॥ उपमन्यु भरत साचार तेथें ॥४२॥
सूर्य उगवतां निरसे तमजाळ ॥ तैसें श्रीरामवचनें जाहलें हृदय निर्मळ ॥ मग भरत परतोनि तात्काळ ॥ नंदिग्रामीं राहिला ॥४३॥
करूनि मातेचे समाधान ॥ सकळ ब्राह्मण प्रजाजन ॥ सुमंत आणि शत्रुघ्न ॥ पाठवी परतोनि अयोध्ये ॥४४॥
श्रीरामपादुका सिंहासनीं ॥ शत्रुघ्नें वरी छत्र धरूनि ॥ मग राज्य चालवी अनुदिनीं ॥ नामस्मरणें सावध ॥४५॥
क्षणक्षणां येत नंदीग्रामासी ॥ मागुता जाय अयोध्येसी ॥ सकळ पृथ्वीच्या राजांसी ॥ धाक भरत शत्रुघ्नांचा ॥४६॥
प्रतिसंवत्सरीं करभार ॥ भूपाळ देती समग्र ॥ असो नंदिग्रामीं भरतवीर ॥ निर्विकार बैसला ॥४७॥
नंदिग्रामाजवळ अरण्यांत ॥ पर्णकुटी करून राहे भरत ॥ श्रीरामपादुका विराजित ॥ रात्रंदिवस मस्तकीं ॥४८॥
जे आवडते श्रीरामभक्त ॥ तेही भरताऐसे विरक्त ॥ कनक कामिनी गृह सुत ॥ त्याग करूनि बैसले ॥४९॥
वटदुग्धीं जटा वळूनि ॥ सकळ मंगळभोग त्यजोनि ॥ वल्कलें वेष्टित तृणासनीं ॥ बैसले ध्यानीं श्रीरामाचे ॥१५०॥

अध्याय बारावा - श्लोक १५१ ते १७८
नक्षत्रांत जैसा चंद्र ॥ तैसा मध्यें भरत साचार ॥ रात्रंदिवस रामचरित्र ॥ भरत सांगे समस्तांतें ॥५१॥
किंवा मानससरोवरीं ॥ बैसती राजहंसाच्या हारी ॥ भरतास भोंवतें तेचिपरी ॥ वेष्टूनियां बैसले ॥५२॥
श्रीधर म्हणे श्रोतयां समस्तां ॥ चित्त द्यावें पुढील श्र्लोकार्था ॥ रघुनाथ चित्रकुटीं असतां ॥ काय कथा वर्तली ॥५३॥
कवीची शब्दरत्नमांदुस ॥ उघडितां पंडित पावती संतोष ॥ इतर कुबुद्धि मतिमंदास ॥ रत्नपरीक्षा नकळे हो ॥५४॥
असो चित्रकूटीं असतां रघुनंदन ॥ मिळोनि बहिर्मूख ब्राह्मण ॥ म्हणती रामा तूं जाईं येथून आम्हांसी विघ्नें तुझेनि ॥५५॥
तुझी स्त्री परम सुंदर ॥ न्यावया जपती बहुत असुर ॥ वाल्मीकभविष्य साचार ॥ ऐसेंचि असे जाण पां ॥५६॥
वनींहूनि वार्ता उठली साचार ॥ त्रिशिरा दूषण आणि खर ॥ दळभारेंसीं येथे येणार ॥ तुजकरितां रघुवीरा ॥५७॥
म्हणोनि सांगतों तुजसी ॥ येथोनि जाईं निश्र्चयेसीं ॥ नाहींतरी आम्हीं स्वाश्रमासी ॥ त्यजोनि जाऊं निर्धारें ॥५८॥
श्रीराम म्हणे ब्राह्मणांलागुनी ॥ तुम्हीं निश्र्चिंत असावें अंतःकरणीं ॥ काळही फोडीन समरंगणीं ॥ राक्षसांतें गणी कोण ॥५९॥
परम अविश्र्वासी ब्राह्मण ॥ म्हणती विघ्नें येती दारुण ॥ हा आपले स्त्रीस रक्षील जाण ॥ कीं आम्हांसी रक्षील ॥१६०॥
हा त्यांसीं न पुरे समरंगणीं ॥ चारी बाण जाती सरूनि ॥ याच्या बोलाचा विश्र्वास धरूनि कदां येथें न राहावें ॥६१॥
मग सकळीं करूनि एकविचार ॥ रात्रीचे उठोनियां समग्र ॥ कुटुंबें घेऊनि सत्वर ॥ गेले विप्र पळोनियां ॥६२॥
उपरी प्रातःकाळीं उठोन ॥ श्रीराम पाहे ऋषिजन ॥ तंव ते रात्रींच गेले पळोन ॥ राजीवनयन काय करी ॥६३॥
एक वाल्मीक उरला पूर्ण ॥ तो महाराज तपोधन ॥ भूत भविष्य वर्तमान ॥ त्रिकालज्ञान जयासी ॥६४॥
वायुसंगें उडे तृण ॥ परी अचळ न सोडी स्थान ॥ किंवा रणमंडळ सोडून ॥ रणशूर कदा पळेना ॥६५॥
तैसा वाल्मीक उरला जाण ॥ तेणें आधींच कथिलें रामायण ॥ इतर बहिर्मूख ब्राह्मण ॥ श्रीराम निधान नोळखती ॥६६॥
प्रत्यया न येतां रघुवीर ॥ आचार तितका अनाचार ॥ कर्म तोच भ्रम थोर ॥ पिशाच नर तेचि पैं ॥६७॥
तणें केलें वेदपठण ॥ करतलामलक शास्त्रें प्रमाण ॥ परी तें मद्यपीयाचें भाषण ॥ राघवा शरण न जातां ॥६८॥
जैसी मुग्धा बत्तीसलक्षणीं ॥ परम सौंदर्य लावण्यखाणी ॥ परी मन नाहीं पतिभजनीं ॥ तरी तें सर्वही वृथा गेलें ॥६९॥
खरपृष्ठीस चंदन देख ॥ परी तो नेणें सुवाससुख । षड्रसीं फिरवी जे दर्वी पाक ॥ रसस्वाद नेणें ती ॥१७०॥
कृपा न करितां सीतावर ॥ कासया व्यर्थ तत्त्वविचार ॥ त्याचें ज्ञान नव्हे साचार ॥ जैसे कीर अनुवादती ॥७१॥
तेणें केले तीर्थाटण ॥ होय चौसष्ट कळाप्रवीण ॥ तेणें केलें जरी कीर्तन ॥ तें जाण गायन गौरियाचें ॥७२॥
असो रघुपतीस सांडोनि विप्र ॥ पळोन गेले समग्र ॥ जदद्वंद्य रघुवीर ॥ त्याचें स्वरूप नेणोनियां ॥७३॥
असो आतां बहु भाषण ॥ श्रीराम चित्रकुट त्यागोन ॥ वाल्मीकऋषीस नमून ॥ दंडकारण्या चालिला ॥७४॥
श्रीरामविजय ग्रंथ प्रचंड ॥ येथें संपलें अयोध्याकांड ॥ आतां अरण्यकांड इक्षुदंड ॥ अति अपूर्व सुरस पुढें ॥७५॥
रामविजय ग्रंथ क्षीरसागर ॥ दृष्टांतरत्नें निघती अपार ॥ संत श्रोते निर्जर ॥ अंगीकरोत सर्वदा ॥७६॥
ब्रह्मानंदा रविकुलभूषणा ॥ श्रीधरवरदा सीताजीवना ॥ पुढें अरण्यकांडरचना ॥ बोलवीं आतां येथोनि ॥७७॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ द्वादशोध्याय गोड हा ॥१७८॥
॥ अध्याय ॥ १२ ॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती