श्रीरामविजय - अध्याय ११ वा

अध्याय अकरावा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
 
अध्यायापरीस अध्याय परिकर ॥ जैसा पळोपळें चढे दिनकर ॥ कीं शुक्लपक्षींहून चंद्र-॥ कळा विशेष वाढती ॥१॥
कीं अभ्यास करितां वाढे ज्ञान ॥ कीं योगसाधनें समाधान ॥ कीं वटबीज विस्तारे पूर्ण ॥ दिवसेंदिवस अधिक पैं ॥२॥
कीं बाळपणापासूनि पंडित ॥ अधिकाधिक व्युत्पत्ति वाढत ॥ कीं कृष्णावेणी संकीर्ण दिसत ॥ पुढें विशाळ होती जैशा ॥३॥
कीं अग्रापासूनि मुळाकडे ॥ इक्षुदंडाची गोडी वाढे ॥ कीं गुरुभजन करितां आतुडे ॥ ज्ञानकळा विशेष ॥४॥
जों जों नेम शुचिष्मंत ॥ तों तों तपश्र्चर्या वाढत ॥ कीं साधुसमागम करितां त्वरित ॥ क्षमा दया वाढती ॥५॥
कीं करितां निष्काम दान ॥ कीर्तीनें भरे त्रिभुवन ॥ कीं वीरश्रीची धरितां आंगवण ॥ प्रताप विशेष वाढे पैं ॥६॥
किंवा धरितां स्नेहादर ॥ मैत्री वाढे अपार ॥ किंवा करितां परोपकार ॥ यश विशेष वाढत ॥७॥
तैसी रामकथा गोड बहुत ॥ विशेष पुढें रस चढत ॥ जेवीं वर्षाकाळीं पूर येत ॥ गंगेस जैसा उल्हासें ॥८॥
गंगेचा पूर मागुता ओहटे ॥ हा दिवसेंदिवस अधिक वाटे ॥ चतुर प्रेमळ जरी श्रोता भेटे ॥ तरी वक्त्यासी आनंद ॥९॥
श्रोता भेटलिया मतिमंद ॥ तरी मावळे व्युत्पत्तीचा आनंद ॥ जैसें सूर्य मावळतां अरविंद ॥ संकोचोनि जाय पैं ॥१०॥
असो दशमाध्यायीं कथन ॥ जान्हवीतीरीं रघुनंदन ॥ न्यग्रोध वृक्षातळीं जाण ॥ तृणशेजे पहुडला ॥११॥
त्यजोनियां मायाजाळ ॥ निरंजनीं योगी जैसा निश्र्चळ ॥ तैसा राम तमालनीळ ॥ जान्हवीतीरीं शोभला ॥१२॥
तों तेथें गुहक भक्त थोर ॥ तयासी म्हणे राघवेंद्र ॥ परतीरासि सत्वर ॥ आम्हां आतां नेईं तूं ॥१३॥
भवाब्धि तरावया दुस्तर ॥ नामनौका जयाची पवित्र ॥ तो रघुवीर राजीवनेत्र ॥ प्रार्थना करी गुहकाची ॥१४॥
भणगापुढें क्षीरसागर ॥ म्हणे मज भूक लागली थोर ॥ कीं वाचस्पति मूढास विचार ॥ पुसतसे साक्षेपें ॥१५॥
कीं थिल्लरासी जन्हुकुमरी ॥ म्हणे माझी तृषा हरी ॥ किंवा दरिद्रियाचे द्वारीं ॥ कल्पवृक्ष याचक ॥१६॥
तैसा राम गुहाकातें ॥ म्हणे परपारा नेईं मातें ॥ तंव तो जाणोनियां राघवातें ॥ पुसे कौतुकें करूनियां ॥१७॥
म्हणे तुमचें नांव करूं श्रवण ॥ कोठें जातां काय कारण ॥ मग मेदिनीगर्भरत्नभूषणें ॥ काय बोलतां जाहला ॥१८॥
रविकुळमंडळ दशरथ ॥ तो पिता आमुचा यथार्थ ॥ या देहास नाम रघुनाथ ॥ जन समस्त बोलती ॥१९॥
ऐसें बोलतां रघुनंदन ॥ गुहकमाता करी रुदन ॥ म्हणे याचा नौकेसी लागतां चरण ॥ नारी संपूर्ण होईल ॥२०॥
याचे चरणरज झगडतां ॥ शिळज्ञ उद्धरली मिथिलेसी जातां ॥ आम्हीं पूर्वींच ऐकिली कथा ॥ भक्तसंतांचेनि मुखें ॥२१॥
कठिण पाषाण लागतां चरणीं ॥ इंदिरेतुल्य जाहली कामिनी ॥ नौका काष्ठाची तत्क्षणीं ॥ चरण लागतां होईल ॥२२॥
वृद्धा म्हणे पुत्रा अवधारीं ॥ यासी न घालावें नावेवरी ॥ नौकेची जाहलिया नारी ॥ कैसी जीविका तुझी होय ॥२३॥
एक वनिता पोसितां ॥ तुज संकट होय तत्वतां ॥ नावेवरी रघुनाथा ॥ पुत्रा सर्वथा बैसवूं नको ॥२४॥
मग गुहक म्हणे सर्वोत्तमा ॥ अगाध तुझे चरणांचा महिमा ॥ तरी ते चरण श्रीरामा ॥ मी प्रक्षाळीन स्वहस्तें ॥२५॥
पाषाणाची जाहली नारी ॥ हे तों चरणरजांची थोर ॥ तरी ते पद प्रक्षाळीन निर्धारीं ॥ मग नावेवरी बैसवीन ॥२६॥
मग गुहकें आश्रमास नेऊन ॥ बैसविला जगन्मोहन ॥ जो मायातीत शुद्ध चैतन्य ॥ पद्माक्षीरमण जगद्रुरु ॥२७॥
विधि हर सहस्रनयन ॥ ज्याचे वांछिती रजःकण ॥ सनकादिकां दुर्लभ पूर्ण ॥ करितां साधन नातळे जो ॥२८॥
जेथूनि जन्मली जन्हुकुमरी ॥ ते चरण प्रक्षाळून स्वकरीं ॥ फळें मूळ आणूनि झडकरी ॥ जनकजामात पूजिला ॥२९॥
ते वेळीं गुहकाचा हर्ष पाहें ॥ ब्रह्मांडामाजीं न समाये ॥ दृढ समाये ॥ दृढ धरूनि श्रीरामाचे पाय ॥ प्रेमेंकरून स्फुंदत ॥३०॥
म्हणे स्वामी रविकुलतिलका ॥ दयाब्धे मायाचक्रचाळका ॥ अयोध्यापते ताटिकांतका ॥ झडकरीं येईं मागुती ॥३१॥
स्वामी तूं परतोन आलियावीण ॥ मी कदापि न भक्षी अन्न ॥ नाना भोग मंगलस्नान ॥ न करीं येथूनि श्रीरामा ॥३२॥
जाणोनियां प्रेमळ भक्त ॥ श्रीराम त्यासी हृदयीं धरित ॥ मग नौका आणूनि त्वरित ॥ जनकजामात बैसविला ॥३३॥
सौमित्र आणि सीता सती ॥ तिघें नौकेवरी आरूढती ॥ मग सुमंताप्रति रघुपति ॥ आज्ञा देता जाहला ॥३४॥
सुमंता तूं जाय वेगें ॥ सकळ वृत्तांत रायासि सांगें ॥ माझा नमस्कार साष्टांगें ॥ वसिष्ठदशरथांसी सांगें कां ॥३५॥
चतुर्दश वर्षें होतां पूर्ण ॥ मी सत्वर येतों परतोन ॥ सकळ लोकांचें समाधान ॥ करी सुमंता जाऊनियां ॥३६॥
तुवां जाऊनियां त्वरित ॥ ग्रामासि आलिया बंधु भरत ॥ क्रोधेंकरून दशरथ ॥ वधील एकादा तयासी ॥३७॥
याकारणें तुवां सुमंता ॥ वेगें परतोनि जावें आतां ॥ सुमंत उतरून रथाखालता ॥ चरणीं माथा ठेवितसे ॥३८॥
नयनोदकेंकरून ॥ प्रक्षाळिले श्रीरामचरण ॥ सुमंत म्हणे माझेन ॥ अयोध्येस न जाववे ॥३९॥
मी समागमें येईन ॥ अथवा येथें प्राण देईन ॥ परी मी न जाय परतोन ॥ दुःख द्यावया समस्तां ॥४०॥
देखती जेव्हां रथ रिता ॥ दशरथ आणि कौसल्या माता ॥ त्यांची करावया हत्या ॥ माझेन तेथें न जाववे ॥४१॥
वनीं सांडून तुज रघुनायका ॥ प्रवेशतां अयोध्येंत देखा ॥ मज म्हणती काळमुखा ॥ कां तूं येथें आलासी ॥४२॥
मग रघुनाथें धरिलें हृदयीं ॥ म्हणे बारे चिंता न करी कांहीं ॥ तूं अयोध्येसी शीघ्र जाईं ॥ आज्ञा माझी पाळी कां ॥४३॥
माथां ठेविला वरदहस्त ॥ तेणें शोक समस्त जाहला शांत ॥ जैसा मेघ वर्षतां अद्भुत ॥ वणवा त्वरित विझोनि जाय ॥४४॥
मग आज्ञा घेऊनि सुमंत ॥ पैलतीरीं उभा अवलोकित ॥ नावेंत बैसला रघुनाथ ॥ गुहक पैलतीरा नेत पैं ॥४५॥
जैसा निवृत्तितटाकीं योगी पावत ॥ तैसा पैलतीरा उभा रघुनाथ ॥ सुमंतासी हातें पालवित ॥ जाय त्वरित माघारा ॥४६॥
यावरी पुढें पुष्करिणी ॥ तेथें क्रमिली एक रजनी ॥ मग प्रयागाप्रति चापपाणी ॥ येता जाहला ते वेळे ॥४७॥
दृष्टी देखोनि रघुनंदन ॥ प्रयागही जाहला पावन ॥ पुढें भरद्वाजआश्रमा रघुनंदन ॥ येता जाहला साक्षेपें ॥४८॥
आला ऐकोनि रघुराज ॥ सामोरा धांवला भरद्वाज ॥ रामें नमस्कारिला द्विज ॥ क्षेमालिंगन दीधलें ॥४९॥
भरद्वाज बोले सप्रेम ॥ आजि माझा सुफळ जन्म ॥ त्रिभुवनपति श्रीराम ॥ गृहा आला म्हणोनियां ॥५०॥

अध्याय अकरावा - श्लोक ५१ ते १००
माझिया पुण्याचे गिरीवर ॥ भेदोनि गेलें चिंदंबर ॥ तरीच सीतावल्लभ रघुवीर ॥ मूळेंविण पातला ॥५१॥
सकळमंगलदायक रघुवीर ॥ जो मंगल भगिनीचा निजवर ॥ मंगलमातेचा उद्धार ॥ करावया जात प्रदक्षिणे ॥५२॥
तो पंचद्वयरथनंदन ॥ करावया सुरांचें बंधमोचन ॥ कमळिणीमित्रकुलभूषण ॥ येणें पंथें चालिला ॥५३॥
तो ऋषि धांवती अपार ॥ त्यांहीं कैसा वेष्टिला रघुवीर ॥ जैसा देवीं वेष्टिला सहस्रनेत्र ॥ कीं किरणांत मित्र विराजे ॥५४॥
कीं चंदनें वेष्टित मलयानिळ ॥ कीं विरक्तीं वेष्टिला जाश्र्वनीळ ॥ की वराभोंवते सकळ ॥ वऱ्हाडी जैसी मिरवती ॥५५॥
कीं साधक जैसे निधानाजवळी ॥ कीं रत्नाभोंवतीं परीक्षकमंडळी ॥ कीं कनकाद्रिभोंवतीं ॥ पाळी ॥ कुलाचलांची विराजे ॥५६॥
कीं नक्षत्रें वेष्टिला शशी ॥ कीं मानस वेष्टिलें राजहंसीं ॥ तैसा ऋषींनीं अयोध्यानिवासी ॥ भरद्वाज आश्रमीं वेष्टिला ॥५७॥
भरद्बाजें पूजिला रघुनंदन ॥ तेथें क्रमिला एक दिन ॥ ऋषि बोलती सुवचन ॥ अजनंदनपुत्राप्रति ॥५८॥
चतुर्दश वर्षेंपर्यंत ॥ श्रीरामा रहा येथें स्वस्थ ॥ दंडकारण्याप्रति व्यर्थ ॥ कासयासी जावें हो ॥५९॥
राघव म्हणे येथें राहतां ॥ अयोध्येच्या प्रजा येतील समस्ता ॥ ब्राह्मण आणि माता पिता ॥ येतील भेटीस निश्र्चयें ॥६०॥
आम्ही गुप्तरूपें येथूनी ॥ प्रवेशूं महाकाननीं ॥ पुढील भविष्यार्थ मनीं ॥ मुनि तुम्हीं जाणतसां ॥६१॥
असो ऋषि आश्रमीं क्रमोनि एक दिवस ॥ ऋषींस पुसे अयोध्याधीश ॥ पुढें चालिला जगन्निवास ॥ मार्ग आम्हांस दाविजे जी ॥६२॥
भरद्वाज म्हणे चित्रकूटपर्वतीं ॥ विद्वज्जन बहुत राहती ॥ तुम्ही तेथें करावी वस्ती ॥ कांही दिवस राघवा ॥६३॥
भरद्वाजें बोळविला रघुनाथ ॥ आज्ञा घेऊनि त्वरित ॥ प्रयागासी परतला ॥६४॥
सिद्धवट देखोनि नमन ॥ करी पद्माक्षी रमण ॥ त्या सिद्धवटीं सावित्री पूर्ण ॥ सीता देखोन नमस्कारी ॥६५॥
विजयी होऊनि रघुनंदन ॥ वनींहून आलिया परतोन ॥ दोन लक्ष गोदानें येथें देईन ॥ ब्राह्मणसंतर्पण यथाविधि ॥६६॥
पुढें चित्रकूटपर्वतावरी ॥ चढला शरयुतीरविहारी ॥ तेथें वाल्मीक ऋषि तप करी ॥ बहुत ऋषींसमवेत ॥६७॥
जेणें नारदकृपेचेनि बळें ॥ अवतारभविष्य कथियेलें ॥ जैसें कमळा अगोदर भरिलें ॥ सरोवरीं जळ जेवीं ॥६८॥
अवताराआधीं जन्मपत्र ॥ केलें शतकोटी विस्तार ॥ तेणें दृष्टीं देखतां रघुवीर ॥ आश्रमाबाहेर धांवला ॥६९॥
वाल्मीकाचे निजचरणीं ॥ माथा ठेवी मोक्षदानी ॥ वाल्मीकें वरचेवर उचलोनी ॥ अलिंगन दीधलें ॥७०॥
इतरां समस्त द्विजवरां ॥ भेटला परात्पर सोयरा ॥ सौमित्रें चित्रकूटीं ते अवसरा ॥ पर्णकुटिका बांधिली ॥७१॥
ऋषिमंडळींत रघुवीर ॥ चित्रकूटीं राहिला जगदुद्धार ॥ गुहक पाठवून बाहेर ॥ समाचार नेला हो ॥७२॥
चित्रकूटीं राहिला रघुनायक ॥ सुमंतासी सांगे गुहक ॥ राघववियोगें दोघांसी दुःख ॥ अत्यंत जाहलें तेधवां ॥७३॥
गुहकें घरासी नेला ॥ म्हणे मी आतां राम कैं देखेन डोळां ॥ असो रथासहित सुमंत परतला ॥ वेगीं अयोध्येसी येतसे ॥७४॥
अयोध्या दिसे प्रेतवत ॥ रिता घेऊन प्रवेशला रथ ॥ सुमंत मुखावरी पल्लव घेत ॥ झांकोनि मुख चालिला ॥७५॥
सुमंत म्हणे आपुले मनीं ॥ श्रीराम टाकोनि आलों वनीं ॥ ऐशिया मज अभाग्यासी जननी ॥ काय व्यर्थ प्रसवली ॥७६॥
कैकयीसदनासमोर ॥ सुमंतें सोडोनि रहंवर ॥ मंदिरांत प्रवेशे सत्वर ॥ अति मुखचंद्र उतरला ॥७७॥
रिता आणिला माघारा रथ ॥ अयोध्येंत समस्तांसी जाहलें श्रुत ॥ घरोघरीं एकचि आकांत ॥ सीताकांतवियोगें ॥७८॥
इकडे कंठीं प्राण धरून ॥ कैकयीसदनीं अजनंदन ॥ सुमंतें तयासी देखोन ॥ नमन करूं लाजतसे ॥७९॥
राजा म्हणे टाकिलें राजीवनयना ॥ मज वाटतें माझिया प्राणा ॥ मूळ आलासी सत्वर ॥८०॥
जगद्वंद्य माझी वस्तु जाण ॥ टाकिली कोण वनीं नेऊन ॥ श्रीराम माझें निधान ॥ कोणें चोरें चोरिलें ॥८१॥
राजहंस माझा रघुनंदन ॥ पंकगर्तेत ठेविला रोवून ॥ माझें सुढाळ मुक्त पूर्ण ॥ भिरकावून दिधलें कोठें ॥८२॥
अन्नपूर्णावरहृदयींचें रत्न ॥ म्यां तुझे हातीं दिधलें पूर्ण ॥ घोर वनीं तें टाकून ॥ कैसा आलासी माघारा ॥८३॥
मज अंधाची काठी बळें ॥ हिरूनि कोणी नेली न कळे ॥ अरण्यामाजी माझीं बाळें ॥ उपवासी निराहारें ॥८४॥
सुंदर सुकुमार सुमनकळी ॥ माझी माउली जनकबाळी ॥ सुमंता रथाखालीं कैसी उतरली ॥ कैसी चालिली पंथीं सांग ॥८५॥
तिहीं भोजनें कोठें केलीं वनीं ॥ शयन केलें कोणे मेदिनीं ॥ सुमंता सांग मजलागुनी ॥ देह टाकूनि जाईन मी ॥८६॥
मग तो सुमंत म्लानवदन ॥ सांगे सकळ वर्तमान ॥ तीन दिवस निराहार पूर्ण ॥ तिघेंजणें पैं होतीं ॥८७॥
तृणासनीं राजीवनेत्र ॥ पहुडला घनश्यामगात्र ॥ पांघरावया अंबर ॥ आपाद मस्तक देखिला म्यां ॥८८॥
श़ृंगवेरपर्यंत ॥ म्यां बोळविला रघुनाथ ॥ ज्याचेनि नामें जग तरत ॥ तो गुहकें नेला परपारा ॥८९॥
मायानदीं उल्लंघून ॥ संत स्वरूपीं होती लीन ॥ तैसा पैलतीरा रघुनंदन ॥ दैदीप्यमान पाहिला म्यां ॥९०॥
याउपरी करुणाकरें ॥ अयोध्येसी जातां त्वरें ॥ तेथोनियां जगदुद्धारें ॥ निजकरें मज पालविलें ॥९१॥
राघवें साष्टांग नमन ॥ घातलें मग तेथून ॥ पुढें चरणचालीं रघुनंदन ॥ करीत गमन वनवासा ॥९२॥
जैसा अस्ता गेला दिनकर ॥ तैसा वनीं प्रवेशला रघुवीर ॥ याज्ञिककुंडामाजी वैश्र्वानर ॥ आच्छादित जैसा कां ॥९३॥
ऐसीं सुमंताचीं वचनें भूपाळ ॥ कर्णीं ऐकतांचि तात्काळ ॥ धबधबा तेव्हां वक्षःस्थळ ॥ पिटोन घेत ते समयीं ॥९४॥
सुमंता वनीं रघुनंदन ॥ कैसा परतलासी सोडून ॥ अरे तुझें हृदय निर्दय पूर्ण ॥ कैसा प्राण गेला नाहीं ॥९५॥
सुमंता तुझा थोर धीर ॥ वज्रापरी तुझें शरीर ॥ वनीं सांडोनि रघुवीर ॥ कैसा एथवरी आलासी ॥९६॥
गळामाजी गुंतला मीन ॥ तैसा तळमळी अजनंदन ॥ श्रीराम वियोगाचा अग्न ॥ जाळीत पूर्ण सर्वांगीं ॥९७॥
म्हणे धांव धांव बारे रघुनंदना ॥ सरोजनेत्रा सुहास्यवदना ॥ कोमलांगा माझिया प्राणा ॥ गेलासी वना टाकूनि ॥९८॥
हांक फोडिली दशरथें ॥ धांव माउलीये रघुनाथे ॥ मज सांडोनि तान्हयातें ॥ गेलासी वना दूरदेशा ॥९९॥
रामा चालिला माझा प्राण ॥ अंतकाळीं दावीं तुझें वदन ॥ ऐसें बोलतां वटारिले नयन ॥ सोडिला प्राण रामस्मरणें ॥१००॥

अध्याय अकरावा - श्लोक १०१ ते १५०
राम राम करितां दशरथ ॥ जाहला रामरूप यथार्थ ॥ खुंटला शोक समस्त हेत ॥ मात सर्व राहिली ॥१॥
पाहा शरीराचें कर्म गहन ॥ चोघे पुत्र दशरथास असोन ॥ एकही जवळी नसतां सोडिला प्राण ॥ मग सुमंत प्रधान धांवला ॥२॥
तेणे उशाशी मांडी दिधली ॥ सुमित्रा कौसल्या जवळी आली ॥ तेव्हां एकचि हांक जाहली ॥ महाशब्दें करूनियां ॥३॥
सप्तशत राण्या सकळ ॥ दुःखें पिटिती वक्षःस्थळ ॥ हडबडलें अयोध्यापुर सकळ ॥ शोक तुंबळ लोकांतें ॥४॥
आक्रोशें कौसल्या सुमित्रा रडत ॥ रामवियोगें दुःख बहुत ॥ त्यांत मृत्यु पावला दशरथ ॥ नाहीं अंत शोकातें ॥५॥
जैसें पायास डंखिजे महाव्याळें ॥ तों मस्तकीं वृक्षिकें ताडिलें ॥ कीं वणव्यांत प्राणी सांपडले ॥ त्यावरी तोडिलें तस्करांनीं ॥६॥
आधींच बहुत धाकेंकरून ॥ त्यावरी पडती पाषाण ॥ आधींच नवज्वरें गेला व्यापून ॥ त्यांत विषपान पैं झालें ॥७॥
आधींच गृहास लागला अग्न ॥ त्यावरी साह्य जाहला प्रभंजन ॥ कीं पूरीं जातां बुडोन ॥ तों गळां पाषाण बांधिला ॥८॥
व्याघ्रभयें पळतां उठाउठी ॥ तों रिसें कंठीं घातली मिठी ॥ तैसी कौसल्येस जाहली गोष्टी ॥ लल्लाट पिटी अवनीये ॥९॥
तों तेथें पातला ब्रह्मसुत ॥ म्हणे शोक कां करितां व्यर्थ ॥ आतां वेगीं आणोन भरत ॥ राज्यीं तया स्थापावा ॥११०॥
एक राजा उभा राहिल्याविण ॥ करूं नये राजाचें दहन ॥ आणि समीप नसतां नंदन ॥ कदा अग्न देऊं नये ॥११॥
मग तैलद्रोणींत साचार ॥ घातलें दशरथाचें शरीर ॥ वसिष्ठ म्हणे सुमंता सत्वर ॥ रथ घेऊनि धांवें कां ॥१२॥
सूर्योदय होतां येथें ॥ वेगीं घेऊनि यावें भरतातें ॥ त्याचे कर्णीं वोखटें तेथें ॥ सर्वथाही सांगूं नको ॥१३॥
वनास गेला रघुनंदन ॥ अथवा दशरथें सोडिला प्राण ॥ हें गुह्य त्यासी न सांगोन ॥ वेगें घेवोन येईंजे ॥१४॥
भरत केवळ श्रीरामभक्त ॥ ही गोष्ट ऐकतां विपरीत ॥ तात्काळ देह टाकील तेथ ॥ यालागीं श्रुत न करावें ॥१५॥
भक्त विरक्त चतुर वरिष्ठ ॥ जो ज्ञानगेंगेचा निर्मळ लोट ॥ जो विवेकररत्नांचा मुकुट ॥ एकनिष्ठ सुभट जो ॥१६॥
जो वैराग्यवैरागर पूर्ण ॥ जो आनंदभूमीचें निधान ॥ जो विरक्तवल्लीचें सुमन ॥ जो समुद्र सत्याचा ॥१७॥
जो शांतिवृक्षांचें पक्वफळ ॥ जो दयेचा आगर केवळ ॥ कीं उपरतीचा निर्मळ ॥ पूर्ण कुंभ उचंबळला ॥१८॥
ऐसा सर्वगुणीं अलंकृत ॥ वेगीं घेऊन ये भरत ॥ तैसाचि निघाला सुमंत ॥ आचार्यचरण वंदूनि ॥१९॥
वायुवेगें चालिला सुमंत ॥ स्वप्न देखे मातुळीं भरत ॥ कृष्णवर्णवस्त्रवेष्टित ॥ नारी एक देखिली ॥१२०॥
तिणें घेऊनियां करीं ॥ तैल जिरवी आपुलें शिरी ॥ भरत जागा होऊनि झडकरीं ॥ रुदन करी आक्रोशें ॥२१॥
म्हणे स्वप्न नव्हे हा दिसतो अनर्थ ॥ आम्हीं चौघे बंधु आणि दशरथ ॥ पांचांमाजी जीवघात ॥ होईल एकाचा निर्धारें ॥२२॥
आणि प्राणसखा अत्यंत ॥ तो अंतरेल दूर बहुत ॥ धरणीवरी मस्तक भरत ॥ आपटी शोकें तेधवां ॥२३॥
आक्रंदोनि हाक देती ॥ केवीं दृष्टीं रघुनाथ ॥ राजाधिराज दशरथ ॥ अंतरला ऐसें वाटतें ॥२४॥
तों मातुळ संग्रामजित ॥ भरतासी स्नेहें हृदयीं धरित ॥ शत्रुघ्नासी समजावित ॥ शोक व्यर्थ कां करितां ॥२५॥
रजनी सरतां तात्काळ ॥ सिद्ध करून चतुरंग दळ अयोध्येप्रति उतावेळ ॥ नेऊन पाठवितों तुम्हांतें ॥२६॥
ऐसें बोलतां सरली रजनी ॥ भरत शत्रुघ्न उठोनी ॥ नगराबाहेर येउनी ॥ मार्ग लक्षीत अयोध्येचा ॥२७॥
ऊर्ध्व वदनेंकरूनि चकोर ॥ विलोकित जैसा चंद्र ॥ कीं चक्रवाक चिंती दिवाकर ॥ किंवा मयूर मेघातें ॥२८॥
ऐसा अयोध्येचा मार्ग लक्षित ॥ तों एकाएकीं देखिला रथ ॥ वरी प्रधान सुमंत ॥ आरूढोनि येतसे ॥२९॥
मंद मंद येत रहंवर ॥ अश्र्वांचे नेत्रीं वाहे नीर ॥ ध्वजाचें विद्युत्प्राय चीर ॥ अति मलिन दिसतसे ॥१३०॥
वरी सुमंत म्लानवदन ॥ नेत्रीं वाहत अश्रुजीवन ॥ राघव लीला आठवून ॥ क्षणांक्षणां स्फुंदतसे ॥३१॥
मागुतीं वस्त्रें नेत्र पुसित ॥ तों शत्रुघ्न आणि भरत ॥ जवळी आले धांवोनि त्वरित ॥ चिन्हें विपरीत देखोनियां ॥३२॥
सुमंतें देखतांचि भरत ॥ वेगें रथाखालीं उतरत ॥ क्षेमालिंगन दोघां देत ॥ सांगे त्वरित बोलाविलें ॥३३॥
भरत सुमंताचें वदन ॥ क्षणक्षणां पाहे विलोकून ॥ म्हणे सख्या तुझे आरक्त नयन ॥ शोक झाले दिसती पैं ॥३४॥
काय अयोध्येचें वर्तमान ॥ सुखी आहे कीं रघुनंदन ॥ श्रीदशरथ क्षेमकल्याण ॥ सुखरूप आहे कीं ॥३५॥
सुमंत म्हणे सुखी रघुनंदन ॥ तुम्हांसी बोलाविलें त्वरेंकरून ॥ मग रथीं बैसत भरतशत्रुघ्न ॥ त्वरेनें शीघ्र चालिले ॥३६॥
पुढें धुरे बैसला सुमंत ॥ घडीघडी नेत्रांसी वस्त्र लावित ॥ तेणें भरत होय सद्रदित ॥ तों पुढें देखत अयोध्या ॥३७॥
प्राणरहित जैसें शरीर ॥ तैसें दिसे अयोध्यानगर ॥ कीं जीवनेंवीण सरोवर ॥ किंवा कांतार दग्ध जैसें ॥३८॥
कीं नारी जैसी भ्रताराविण ॥ कीं जननीविण तान्हें दीन ॥ कीं नासिकावांचोनि वदन ॥ अयोध्याभुवन तेवीं दिसे ॥३९॥
राजमंदिराचे ढळले कळस ॥ मंगलवाद्यांचा नाहीं घोष ॥ घरोघरीं नारी पुरुष ॥ शोक आक्रोशें करिताती ॥१४०॥
होतें दशरथाचें प्रेत ॥ सुमंतें तेथेंचि नेला रथ ॥ छत्र भंगलें देखतां भरत ॥ रथाखालीं पडियेला ॥४१॥
दशरथाचें प्रेत देखोनी ॥ भरत तेव्हां लोळें धरणीं ॥ अश्रुधारा वाहती नयनीं ॥ शोक गगनीं न समाये ॥४२॥
शोक समुद्रीं निमग्न ॥ जाहला कैकयीनंदन ॥ भोवतें सद्रद प्रजानन ॥ दुःखेकरून बोलती ॥४३॥
मग सुमंत प्रधानें सांवरूनि ॥ भरत बैसविला उठवोनि ॥ भरत विचार करी मनीं ॥ राम नयनीं पाहीन आतां ॥४४॥
संसारमाया सांडोन ॥ दशरथ पावला स्वर्गभुवन ॥ मीं आतां राघवचरण ॥ दृढ धरीन निजभावें ॥४५॥
विलोकितां श्रीरामवदन ॥ मी शोकावेगळा होईन ॥ प्रधानासी म्हणे मज नेऊन ॥ श्रीरामचरणांवरी घालावें ॥४६॥
वडील बंधु रघुनाथ ॥ दशरथासम यथार्थ ॥ रामसदनाकडे भरत ॥ मुरडोनियां चालिला ॥४७॥
परी वनास गेला रघुनंदन ॥ हें कोणासी न बोलवे वचन ॥ एक म्हणती देईल प्राण ॥ सीतारमण न देखतां ॥४८॥
तों ओरडत कौसल्यामाय ॥ भरत धांवोनि धरी दृढ पाय ॥ माये श्रीराम कोठें आहे ॥ तो लावलाहें दावी कां ॥४९॥
तों कौसल्येसी आली मूर्च्छना ॥ बोलतां न बोलवे वचना ॥ बा रे राम गेला तपोवना ॥ मग रायें प्राण त्यजियेला ॥१५०॥
 

अध्याय अकरावा - श्लोक १५१ ते २००
भरतें ऐसें ऐकिलें ॥ लल्लाट भूमीवरी आपटिलें ॥ तें दुःख नवजाय वर्णिलें ॥ कल्पांत मांडला ते वेळीं ॥५१॥
अहा रघुवीरा राजीवनेत्रा ॥ नवमेघरंगा स्मरारिमित्रा ॥ जगद्वंद्या कोमलगात्रा ॥ कां ऊपेक्षिलें आम्हांतें ॥५२॥
ऐसे बोलोनियां भरत ॥ मेदिनीवरी अंग घालित ॥ माझी माउली रघुनाथ ॥ गेली निश्र्चित टाकोनि ॥५३॥
मेदिनीगर्भरत्नभूषण ॥ वनासी निघतां रघुनंदन ॥ दशरथें जेवीं सोडिला प्राण ॥ तैसें मरण मज कां न ये ॥५४॥
अद्यापि न ये मजला मृत्य ॥ कां मृत्यूच निमाला यथार्थ ॥ रामवियोगाचें दुःख अत्यंत ॥ मृत्यूसही न सोसवे ॥५५॥
धन्य धन्य राजा दशरथ ॥ कोमल हृदय प्रेमळ यथार्थ ॥ देह ठेवूनि विदेहजामात ॥ जवळ केला त्वरेनें ॥५६॥
तंव तो कमलोद्भवसुत ॥ आचार्य पातला त्वरित ॥ भरत जाऊनि चरण धरित ॥ मज रघुनाथ दाखवीं ॥५७॥
पहावया भरताचें मन ॥ वसिष्ठ काय बोले वचन ॥ तुज राज्य दिधल्याविण ॥ रायास अग्न देऊं नये ॥५८॥
आणि तुझिया मातेच्या मनांत ॥ तुज राज्य व्हावें प्राप्त ॥ वनास गेला जनकजामात ॥ तेंचि निमित्त जाण पां ॥५९॥
ऐसें ऐकतां ते अवसरीं ॥ परम दुःख पावला अंतरीं ॥ भरत आक्रंदत दीर्घस्वरीं ॥ राज्य करी म्हणतांचि ॥१६०॥
सुकुमार चंपककळिकेवरी ॥ चपळा पडतां न उरे उरी ॥ कीं कर्पूर जननीचे शिरीं ॥ शुंडाप्रहारीं ताडी गज ॥६१॥
कीं शस्त्रघायें तोडिली बाळें ॥ कीं वज्रघायीं चूर्ण कपाळें कीं अग्नींत पडलीं मुक्ताफळें ॥ तैसें वाटलें भरतातें ॥६२॥
श्रीराम गेला वनांतरी ॥ जरी मी येथें राज्य करीं ॥ तरी जितुकें ब्राह्मण पृथ्वीवरी ॥ म्यां वधिले स्वहस्तें ॥६३॥
जगद्वंद्यास वनीं सांडोन ॥ जरी मी अंगिकारीं राज्यासन ॥ विगतधवा जे जारीण ॥ तिचें गर्भस्थळ मी पावें ॥६४॥
रजस्वलेच्या शोणितासमान ॥ राज्यभिषेकाचें उदक पूर्ण ॥ मी आपुल्या उदरीं शस्त्र घालीन ॥ राज्यासन घ्या म्हणतां ॥६५॥
ज्यासी मृडानीवर ध्याय मनीं ॥ ज्याची अयोध्या हे राजधानी ॥ ते मी भोगितांचि ते क्षणीं ॥ महाचांडाळ मी जाहलों ॥६६॥
रघुवीर सांडोन काननीं ॥ जरी मी भोगीन राजधानी ॥ तरी जिव्हा जावो झडोनी ॥ कीटक पडोनि तत्काळ ॥६७॥
वनीं सांडोनि जगन्मोहन ॥ जरी मी घेईन राज्यासन ॥ तरी गुरुवध मद्यपान ॥ मात्रागमन घडे मज ॥६८॥
कलंक लागेल वासरमणी ॥ पाप प्रवेशेल गंगाजीवनीं ॥ मृगजळीं घटोद्भवमुनी ॥ जरी बुडोन जाईल ॥६९॥
चित्रकिरणाचियावरी ॥ चढती मुंगियांच्या हारी ॥ कीं वडवानळाचे शिरीं ॥ नृत्य करी पतंग ॥१७०॥
कीं ऊर्णनाभींच्या तंतुसूत्रीं ॥ जरी उचलेल धरित्री ॥ कीं तृणपाशें महाकेसरी ॥ जरी गुंतोन पडेल ॥७१॥
कीं मही उचलेल मशका ॥ जरी सुपर्णासी बाधेल आळिका ॥ दृष्टी देखतां दीपका ॥ मृगांक खालीं पडेल ॥७२॥
जरी हें घडेल ब्रह्मनंदना ॥ तरी मज होईल राज्यवासना ॥ ऐकोनि भरताच्या वचना ॥ वसिष्ठ जाहला सद्रद ॥७३॥
अहो तें भरताचें वचन ॥ वैराग्यवल्लीचें सुमन ॥ कीं विवेकनभींचें उडुगण ॥ प्रेमतेजें झळकत ॥७४॥
कीं तें भक्तिपंथींचें सरोवर ॥ कीं निश्र्चयभावें दिव्य नगर ॥ कीं तें विश्रांतीचें मंदिर ॥ वचनरूप प्रत्यक्ष ॥७५॥
असो तो कैकयीनंदन ॥ म्हणे स्वामी शिवतों तुझे चरण ॥ श्रीरघुवीराची मज आण ॥ राज्याभिषेक करूं नेदी ॥७६॥
कैकयीचें काळें वदन ॥ माता नव्हे ते लांव पूर्ण ॥ तीस आवडे रांडपण ॥ पतीचा प्राण घेतला ॥७७॥
मग वसिष्ठें जें जें चिंतिलें ॥ तें तें भरतासी निवेदिलें ॥ मंथरादासीचे बोलें ॥ कार्य नासलें सर्वही ॥७८॥
कलहकल्लोळसरिता ॥ ते ही मंथरा दासी तत्वतां ॥ कुबुद्धि शिकवूनि तुझी माता ॥ इणेंचि पाहें पां बोधिली ॥७९॥
ऐसी ऐकतांचि मात ॥ वेगें धांवे वीर भरत ॥ मंथरेची वेणी अकस्मात ॥ धरूनि शस्त्र काढिलें ॥१८०॥
मग धांवोनि ब्रह्मसुत ॥ भरताचा धरिला हात ॥ म्हणे स्त्री वधितां पाप अद्भुत ॥ कदा विपरीत करूं नको ॥८१॥
मग लत्ताप्रहारेंकरूनि ॥ भरतें ताडिलें तियेलागुनी ॥ त्रिवक्रकुब्जा तेथूनि ॥ नाम तियेसी जाहलें ॥८२॥
असो ब्रह्मपुत्रें तयेक्षणीं ॥ रामपादुका सिंहासनीं ॥ मणिमय रचित दिव्यरत्नीं ॥ सिंहासनीं स्थापिल्या ॥८३॥
त्यांवरी छत्र धरून ॥ मग राजदेह उचलून ॥ अग्निमुखीं समर्पून ॥ उत्तरकर्म भरत करी ॥८४॥
सप्तशत रायाच्या युवती ॥ अग्निप्रवेश तात्काळ करिती ॥ जैसी सूर्यकिरणें सामावती ॥ सूर्यासरसीं अस्तमानीं ॥८५॥
सुमित्रा आणि कौसल्या ॥ प्राण द्यावया सिद्ध जाहल्या ॥ मग वसिष्ठें वर्जिल्या ॥ शास्त्रप्रमाण रीतीनें ॥८६॥
पुत्रवंत्या स्त्रिया विशेष ॥ त्यांहीं न करावा अग्निप्रवेश ॥ तों कौसल्या म्हणे आम्हांस ॥ कशास व्यर्थ ठेवितां ॥८७॥
वनास गेला रघुनाथ ॥ परत्र पावला दशरथ ॥ आतां काय वांचूनि व्थर्थ ॥ काया अग्नींत निक्षेपूं ॥८८॥
मग वसिष्ठ सांगे वाहूनि आण ॥ तुम्हांस श्रीराम भेटवीन ॥ मग वनासी करील गमन ॥ पुढती आगमन करील पैं ॥८९॥
निवटोनि असुर समस्त ॥ अयोध्येसी येईल रघुनाथ ॥ हा वाल्मीकाचा मूळ काव्यार्थ ॥ माना यथार्थ सर्वही ॥१९०॥
गुरुवचन मानूनि प्रमाण ॥ चित्रकुटीं भेटेल रघुनंदन ॥ अग्निप्रवेश म्हणून ॥ वर्ज केला ते काळीं ॥९१॥
असो रात्र जाहली दोन प्रहर ॥ कैकयीनें येऊन सत्वर ॥ भरतासि एकांत विचार ॥ सांगे कैसा ऐका तें ॥९२॥
म्हणे पुत्रा ऐक वहिलें ॥ संकटीं म्यां राज्य साधिलें ॥ रामासी वनवासा पाठविलें ॥ नाना यत्नेंकरूनियां ॥९३॥
वना गेलें रामलक्ष्मण ॥ हें तूं परम मानीं कल्याण ॥ सत्वर घेईं छत्रीसिंहासन ॥ कांहीं अनमान करूं नको ॥९४॥
पितृवचन करावया प्रमाण ॥ वनास गेला रघुनंदन ॥ त्या शोकास्तव राव पावला मरण ॥ हेही जाण बरें जाहलें ॥९५॥
सापत्नबंधु राम निर्धारें ॥ त्यासीं वंचन करितां बरें ॥ देव दैत्य दायाद वैरें ॥ अद्यापिही वर्तती ॥९६॥
गरुड सर्व सापत्न ॥ वैरें वर्तती दोघेजण ॥ जरी तूं होसी माझा नंदन ॥ तरी वचन पाळीं हें ॥९७॥
भरतें ऐकतांचि तिची वाणी ॥ म्हणे उठें येथोनि चांडाळिणी ॥ तुझा वध केला असतां या क्षणीं ॥ परी माता म्हणोनि रक्षिली ॥९८॥
परम निर्दय तूं पापीण ॥ अमंगळ तूं लांव पूर्ण ॥ घेतला दशरथाचा प्राण ॥ जानकीजीवन धाडिला वना ॥९९॥
तूं सर्पीण होसी यथार्थ ॥ डंखोनि मारिला दशरथ ॥ माझा सखा रघुनाथ ॥ दूर वनासी धाडिला ॥२००॥

अध्याय अकरावा - श्लोक २०१ ते २७०
पिता बंधु दोघेजण ॥ गेले ज्या पंथेकरून ॥ त्या मार्गें मीही जाईन ॥ ऊठ येथूनि पापरूपे ॥१॥
असो कैकयी गेली उठोन ॥ तों उदय पावला चंडकिरण ॥ भरतें वल्कलें वेष्टून ॥ भस्म लाविलें सर्वांगीं ॥२॥
सर्व अलंकार त्यागून ॥ वटदुग्धीं जटा वळून ॥ वनाप्रती कैकयीनंदन ॥ चरणचालीं चालिला ॥३॥
षोडशपद्में दळभार ॥ नगरलोक निघाले सत्वर ॥ ओस पडले अयोध्यापुर ॥ जीवमात्र चालिले ॥४॥
कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ शिबिकेंत बैसल्या ते क्षणीं ॥ वरी वस्त्रावरण घालूनी ॥ वाहनासहित झांकल्या ॥५॥
वसिष्ठादि सकळ ब्राह्मण ॥ सवें निघालें चारी वर्ण ॥ अयोध्येंत कैकयीवांचून ॥ नाहीं कोणी राहिलें ॥६॥
जन म्हणती ओस नगर ॥ कैकयीचें वपन करूं सत्वर ॥ तिजवरी धरावें छत्र ॥ परम अपवित्र पापिणी ॥७॥
तिचें पोटीं भरत जन्मला ॥ जैसा कागविष्ठेंत अश्र्वत्थ प्रगटला ॥ कीं कागिणी पोटीं कोकिळा ॥ निपजे अवचिता जैसी कां ॥८॥
असो भरत म्हणे सुमंतातें ॥ रघुवीर गेला कोण्या पंथें ॥ तोच मार्ग दावीं आम्हांतें ॥ तुझें अनुमतें चालूं आम्ही ॥९॥
मग भरतसमवेत दळभार ॥ गुहकाश्रमा पावले सत्वर ॥ वाजत वाद्यांचे गजर ॥ नादें अंबर कोंदलें ॥१०॥
गुहक विलोकी दुरून ॥ म्हणे मातेनें धाडिले दोघेजण ॥ दळभार सिद्ध करून ॥ रामलक्ष्मण वधावया ॥११॥
मग सहस्रांचे सहस्र किरात ॥ गुहकें मेळविले समस्त ॥ धनुष्य ओढोनियां त्वरित ॥ जान्हवीतीर बळकाविलें ॥१२॥
भरतासि सांगती सेवक ॥ संग्रामासी सिद्ध जाहला गुहक ॥ जन्हुकुमारीचें उदक ॥ स्पर्शों न देती कोणातें ॥१३॥
मग शत्रुघ्न आणि दळपती ॥ भरतासंगें विचार करिती ॥ म्हणती आज्ञा द्यावी निश्र्चितीं ॥ शिक्षा लावूं तयातें ॥१४॥
भरत म्हणे गुहक रामभक्त ॥ म्यां ऐकिला होता वृत्तांत ॥ तरी समाचार न घेतां यथार्थ ॥ युद्ध त्यासी न करावें ॥१५॥
मग भरत पुढें होऊन ॥ गुहकाप्रति बोले वचन ॥ त्वां युद्ध आरंभिलें निर्वाण ॥ काय कारण सांग तें ॥१६॥
गुहक म्हणे घेऊनि दळभार ॥ वधावया जातोसि रघुवीर ॥ तरी मी श्रीरामउपासक निर्धार ॥ वेंचीन प्राण स्वामीकाजीं ॥१७॥
माझा स्वामी रघुनंदन ॥ निराहार वनीं निर्वाण ॥ तुम्ही मारावया दोघेजण ॥ दळभारेंसी चालिलां ॥१८॥
परम निंदक दुर्जन खळ ॥ जे रघुनाथद्वेषी चांडाळ ॥ त्यांचीं शिरें छेदोनि तत्काळ ॥ पाठवीन यमलोका ॥१९॥
मातेच्या बोलेंकरूनि ॥ श्रीराम वधूं पाहसी वनीं ॥ तरी तुम्हांस जान्हवीचें पाणी ॥ स्पर्शों नेदीं अणुमात्र ॥२२०॥
ऐकतां गुहकाचें वचन ॥ भरतासी आलें दीर्घ रुदन ॥ गुहकास म्हणे सोडूनि बाण ॥ माझें शिर छेदोनी टाकीं ॥२१॥
मज पापियाचा देह त्वरित ॥ गुहका छेदीं यथार्थ ॥ कैकयीनें केला अनर्थ ॥ सीताकांत धाडिला वना ॥२२॥
जन्मलों कैकयीचे उदरीं ॥ जन म्हणती हा रामचंद्राचा वैरी ॥ तरी गुहका आतां वेग करीं ॥ छेदीं झडकरीं देह माझा ॥२३॥
श्रीरामावियोगाचें दुःख ॥ मज सोसवेचि अणुमात्र देख ॥ निर्वाण बाण सोडोनि एक ॥ मज रघुनायकपद दावीं ॥२४॥
भरताचें अंतर ओळखून ॥ गुहक धांवोनि धरी चरण ॥ दोघांसी पडिलें आलिंगन ॥ गेले विसरून देहभाव ॥२५॥
कंठ दाटला दोघांचा ॥ उभारणी जाहली रोमांचा ॥ दोघांचे नेत्रीं अश्रुधारांचा ॥ पूर पडत ते काळीं ॥२६॥
दोघेही श्रीरामचे भक्त ॥ दोघेही योगी विरक्त ॥ दोघेही श्रीरामास आवडत ॥ वल्कलेंवेष्टित दोघेही ॥२७॥
दोघांही केलें भस्मोध्दूलन ॥ दोघांही केलें जटावळण ॥ दोघेंही न घेती अन्न ॥ रामदर्शनावांचोनि ॥२८॥
गुहक म्हणे भरता वसिष्ठा ॥ श्रीराम गेला चित्रकूटा ॥ आतां चला जी उठा उठा ॥ वेगीं भेटा राघवातें ॥२९॥
ऐकतां गुहकाचें वचन ॥ भरत धरूं धावे चरण ॥ गुहक घाली लोटांगण ॥ प्रेमेंकरून सद्रद ॥२३०॥
भरतें स्नानसंध्या सारून ॥ गुहकासी म्हणे प्रीतीकरून ॥ श्रीराम राहिला एक दिन ॥ तें मज स्थळ दाविजे ॥३१॥
गुहक म्हणे न्यग्रोधवृक्ष ॥ त्याखालीं राहिला कमलपत्राक्ष ॥ जयासी हृदयीं ध्याय विरूपाक्ष ॥ सहस्राक्ष शरण ज्यातें ॥३२॥
या तृणशेजे वरी जाण पद्मनयनें केलें शयन ॥ याच पंथें येऊन ॥ केलें स्नान जान्हवीचें ॥३३॥
सीतेच्या तगटवस्त्रांचे रज ॥ ते न झगटती तृणशेज ॥ देखतां भरत भक्तराज ॥ साष्टांग नमन करीतसे ॥३४॥
रघुनाथपदमुद्रा तेथ ॥ उमटल्या देखोनि भरत ॥ ते धुळी कपाळा लावित ॥ सद्रदित होवोनि ॥३५॥
असो नौका आणोनि सहस्र ॥ उतरला सकळ दळभार ॥ प्रयागासी येऊन सत्वर ॥ भरद्वाजदर्शन घेतलें ॥३६॥
लक्षोनि चित्रकुटाचा पंथ ॥ चालती गुहक आणि भरत ॥ तों फळें वेंचावया सुमित्रासुत ॥ पर्वतातळीं उतरला ॥३७॥
तों पर्णकुटीमाजी रघुनंदन ॥ करावया बैसला हवन ॥ तेथें उपसामग्री आणोन ॥ जनकात्मजा देतसे ॥३८॥
चकोरमुखीं एकसरां ॥ अत्रिसुत सोडी अमृतधारा ॥ तैशा आहुती घाली वैश्र्वानरा ॥ तृप्त होय रामहस्तें ॥३९॥
तेव्हां आश्रमाबाहेर जनकबाळी ॥ जो सुकुमार चंपककळी ॥ तों सुदर्शनगंधर्वें जातां निराळीं ॥ ते वेल्हाळी देखिली ॥२४०॥
जानकी देखोनि सुंदर ॥ चित्तीं जाहला कामातुर ॥ भय लज्जा समग्र सोडोनियां दीधली ॥४१॥
मंगळरूप ते मंगळभगिनी ॥ गंधर्व धांवला ते क्षणीं ॥ अमंगळ कागरूप धरूनी ॥ सीतेलागीं झडपीतसे ॥४२॥
जैसा पतंग दीप देखोन ॥ उडी घाली विसरून मरण ॥ कीं खदिरांगारासी वृश्र्चिक येऊन ॥ पुच्छेंकरून ताडी जेंवि ॥४३॥
कीं अंतगृहींचें दिव्यान्न ॥ स्पर्शों धांवे जैसे श्र्वान ॥ यज्ञशाळेमाजी मळिण ॥ अंत्यज जैसा पातला ॥४४॥
असो जानकींचें स्तनयुग ॥ धरूं पाहे पतित काग ॥ जगन्माता धांवली सवेग ॥ आंग घाली घरणीतें ॥४५॥
मग म्हणे धांव धांव रघुराया ॥ कागें विटंबिली माझी काया ॥ आक्रंदे परम जनकतनया ॥ रघुवर्या जाणवलें ॥४६॥
आहुती टाकी रघुनाथ ॥ जवळी नाही सुमित्रासुत ॥ मग दर्भ मंत्रोनि त्वरित ॥ रामचंद्रें प्रेरिला ॥४७॥
कल्पांतविजूसमान ॥ कागें दर्भ देखिला दुरून ॥ पळों लागला घेतलें रान ॥ पाठीसी बाण लागला असे ॥४८॥
गंधर्व भ्रमे सकळ सृष्टी ॥ परी कोणी न घाली तया पाठीं ॥ हिंडता जाहला हिंपुटी ॥ होय कष्टी दुरात्मा ॥४९॥
इंद्रादिक देवगण ॥ समस्तांसी गेला शरण ॥ ते म्हणती न दाखवीं वदन ॥ दुष्टा होईं माघारा ॥२५०॥
मग भेटला नारद मुनि ॥ काग लागला तयाचे चरणीं ॥ म्हणे पहा हो या त्रिभुवनीं ॥ ठाव नेदी कोणी मज ॥५१॥
माझी पाठ न सोडी बाण ॥ मग नारद बोले वचन ॥ मूढा रामासी जाय शरण ॥ तोचि मरण चुकवील ॥५२॥
मग म्हणे जगद्वंद्या रामचंद्रा ॥ मी तुज शरण कृपासागरा ॥ दीनरक्षका अतिउदारा ॥ मज पामरा न मारावें ॥५३॥
मजवरी टाकिला बाण ॥ हें लोकांत न दिसे थोरपण ॥ कमळावरी वज्र घेऊन ॥ घातल्या काय पुरुषार्थ ॥५४॥
सूक्ष्म आळिका धरी सुपर्ण ॥ वडवानळ जाळी तृण ॥ भोगींद्र उचली सुमन ॥ हें काय अपूर्व बोलावें ॥५५॥
पर्जन्यें उठलें तृण ॥ अगस्ति प्याला किंचित जीवन ॥ मेघें निजप्रतापेंकरून ॥ घटीं जीवन भरियेलें ॥५६॥
सूर्यें दीपतेज झांकिलें ॥ गोवत्स विदारिला शार्दूलें ॥ रघुपति त्वां मज तैसें मारिलें ॥ तरी थोरपण प्रकटेना ॥५७॥
मातेचिया स्तनावरी ॥ बाळक हस्त ठेवूनि क्रीडा करी ॥ तरी काय माता जीवें मारी ॥ बाळकातें सांगपां ॥५८॥
महाराज रविकुळभूषणा ॥ ताटिकांतका अहल्योद्धारणा ॥ द्विपंचमुखदर्पहरणा ॥ शरणागता न मारावें ॥५९॥
मग बोले रघुपति ॥ माझा बाण असत्य कल्पांतीं ॥ नव्हेच जाण निश्र्चितीं ॥ महामलिना अपवित्रा ॥२६०॥
मग बाणासी अज्ञापी रघुनंदन ॥ याचा रक्षोनियां प्राण ॥ वेगें छेदावा सव्य नयन ॥ शिक्षा यास जाण पैं ॥६१॥
न लागतां पातया पातें ॥ दर्भें छेदिलें नयनातें ॥ काग म्हणे रघुत्तमातें ॥ देई वरातें मज कांहीं ॥६२॥
मग दोहींकडे एक बुबुळ ॥ खेळे ऐसें केलें चंचळ ॥ काकदृष्टी अवघ्यांत चपळ ॥ जन सकळ देखती ॥६३॥
सीतेसी द्यावया चुंबन ॥ तूं धावलासी दुरात्मा पूर्ण ॥ तरी तूं करिसी विष्ठाभक्षण ॥ कनिष्ठ जाण पक्ष्यांत तूं ॥६४॥
तुज वर एक देतो जाण ॥ प्रेतपिंड तूं भक्षल्याविण ॥ सर्वथा नोहे उद्धारण ॥ हें वरदान तुज दिधलें ॥६५॥
मग सुदर्शन गंधर्व तेव्हां ॥ साष्टांग नमोनि श्रीराघवा ॥ आपले स्वस्थळाप्रति तेधवां ॥ जाता जाहला आनंदें ॥६६॥
भरत प्राणसखा आतां ॥ येऊनि भेटेल रघुनाथा ॥ श्रोतीं परिसावी तेचि कथा ॥ भव्यव्यथा नासे जेणें ॥६७॥
रामविजय ग्रंथ प्रचंड ॥ रसभरित अयोध्याकांड ॥ तें श्रवण करितां वितंड ॥ विघ्नें उदंड वितळती ॥६८॥
अयोध्याधीशा रामचंद्रा ॥ ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा ॥ श्रीधरवरदा प्रतापरुद्रा ॥ मज नाममुद्रा अखंड देईं ॥६९॥
स्वस्ती श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥
एकदशोऽध्याय गोड हा ॥२७०॥ ओंव्या ॥२७०॥
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती