मल्हारी मार्तंड विजय अध्याय सोळावा
बुधवार, 4 डिसेंबर 2024 (12:32 IST)
॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ जयजयाजी मार्तंडराया ॥ जयजयाजी प्राणसखया ॥ जयजयाजी करुणालया ॥ अगाध महिमा तुझा हो ॥१॥
मल्ल म्हणे मार्तंड राय ॥ तूं परतोनि कैलासी जाय ॥ तूं युध्दासी योग्य न होय ॥ अद्भुत पराक्रम पाहे माझा ॥२॥
मार्तंडें शस्त्रास्त्र सोडिलें ॥ तें चूर्ण करोनि पुढें आले ॥ मार्तंडे बाण वृष्टि केले ॥ त्यासही न गणी मल्ल ॥३॥
डाव्या बाजूच्या भागांत ॥ सांबाने खड्ग मारिलें त्वरित ॥ मल्ल जाहला मूर्च्छित ॥ कुंजर दैत्य जाहला ॥४॥
अजस्त्र रुप दीर्घ दांत ॥ पुच्छ फडां सागरात्कारें खळबळीत ॥ सोंड करितांचि गगनांत ॥ स्वर्गी लोक उठोनि पळती ॥५॥
ज्याची गर्जना ऐसी ॥ मेघ पडती भुईसी ॥ खड्ग त्याचे मस्तकासीं ॥ मार्तंडानें मारिलें ॥६॥
सांबासि दैत्य बोले ॥ म्हणे बल तुझे काय जाहले ॥ आज मजला कळों आलें ॥ पुरुषार्थ तुझे ॥७॥
सांब क्रोधासि येवोन ॥ अग्निअस्त्र दिधलें सोडून ॥ तों दैत्य व्याकुळ होवोन ॥ भूमिवरी क्षणभर पडे ॥८॥
तितक्यांत मल्ल पर्जन्यास्त्र ॥ सोडोनि बुडविलें दळसशस्त्र ॥ सोडितां रुद्र वायुअस्त्र ॥ सर्पास्त्र मल्ले सोडिलें ॥९॥
सांबें गरुडास्त्र सोडून ॥ सर्पास्त्र दिधलें तोडोन ॥ पशुपती मंत्रे कडोन ॥ त्रिशुळ सोडिला मार्तंडे ॥१०॥
गदा मुद्गर बाण मुसळ ॥ शक्ति फरश लांगूल ॥ इतुक्यातेंही वारिलें मल्लें ॥ नाटोपोनि हृदयी संचरले ॥११॥
पळूं लागला घाबरा होऊन ॥ भूमीस पडला भवंडून ॥ युध्द करी रे म्हणोन ॥ मस्तकीं मार्तंडे पाय दिधला ॥१२॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१३॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां मल्लासुरवधनो नाम षोडशोऽध्याय गोड हा ॥१६॥