मल्हारी मार्तंड विजय अध्याय बारावा

बुधवार, 4 डिसेंबर 2024 (12:28 IST)
॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ कोटी राक्षसांचा नाथ ॥ त्याचें नाम उल्कामुख दैत्य ॥ बैसोनियां रथीं त्वरित ॥ युध्द करावयास्तव आला ॥१॥
वीस लक्ष रथ घोडे कोटि ॥ पन्नास लक्ष गज वाजे घाटी ॥ दैत्य आला पाहोनि धूर्जटी ॥ गणपतीसी आज्ञा दिली ॥२॥
उल्कामुख म्हणे गणपति ॥ तूं आम्हां योग्य नव्हे युध्दाप्रति ॥ निघोनि जाय गृहाप्रति ॥ मोदके भक्षावयास्तव ॥३॥
दैत्यास बोले गणराज ॥ तुज समवेत दळ आज ॥ मोदके करोनि सहज ॥ फरशमुखानें खांडून मी ॥४॥
वचन एकोनि तीक्ष्ण ॥ दैत्ये सोडिले शत बाण ॥ गणपति फरशें कडोन ॥ बाण तोडोनि टाकिले ॥५॥
दैत्यें दोन सहस्त्र बाण सोडिले ॥ तेणें घोडे व्याकूल झाले ॥ ते पाहोन गणरांज कोपले ॥ ध्वज उडविलें तत्क्षणीं ॥६॥
अश्वासहित सारथी मारिला ॥ तें पाहोनि दैत्यास कोप आला ॥ सहस्त्र लोह गदा उचलिला ॥ घेऊनि धावला गणपतिवरी ॥७॥
गणपति दांतें मारिलें ॥ उल्कामुखें प्राण सोडिले ॥ दैत्यसैन्य यमलोकीं धाडिलें ॥ जय जय बोलिले सुर अवघे ॥८॥
ऐशी लक्ष घोडे दोन कोटी रथ ॥ चार कोटी गज पायदळ बहुत ॥ दहा सहस्त्र जयवाद्य ध्वजसहित ॥ कुंतलोमा दैत्य आला ॥९॥
सांबे दैत्यासि पाहोन ॥ आज्ञा दिधली जयनंदना ॥ त्याचें रुप शिवाप्रमाण ॥ दैत्यासि वाटे शिव हाची ॥१०॥
दैत्य पुसे तूं सांब काय ॥ जयनंदन म्हणे मी शिवदास होय ॥ तुजला समरीं वधूनी जाय ॥ म्हणोनि आलों रणभूमीसी ॥११॥
दैत्य ललाटस्थळ लक्षून ॥ सोडिता जाहला सहस्त्र बाण ॥ ते खड्गें विदारिलें जयनंदने ॥ शत सोडिले उरावरी ॥१२॥
दैत्यें बाणजाळ सोडिला ॥ सारथी मारुन धनु उडविला ॥ जयनंदने पळ घेतला ॥ स्वदळां माजी ॥१३॥
नूतन सारथी घेवोन आला ॥ अग्नि अस्त्रानें दैत्य मारिला ॥ देवासिं आनंद जाहला ॥ जयजयकार गर्जंती ॥१४॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१३॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां उल्कामुख कुंतलोभ्यावधनो नाम द्वादशोऽध्याय गोड हा ॥१२॥
ALSO READ: मल्हारी मार्तंड विजय अध्याय तेरावा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती