भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन, योगयुक्त होऊन तू ज्यायोगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त, सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निःसंशयपणे जाणशील, ते ऐक. ॥ ७-१ ॥
हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मत्परायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. ॥ ७-३ ॥
भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च । अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥ ७-४ ॥
पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, आणि अहंकार अशी ही आठ प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे. ॥ ७-४ ॥
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् । जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥ ७-५ ॥ही आठ प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाबाहो अर्जुना, हिच्याहून दुसरी, जिच्यायोगे सर्व जग धारण केले जाते, ती माझी जीवरूप परा म्हणजे चेतन प्रकृती समज. ॥ ७-५ ॥
हे भरतश्रेष्ठा (अर्जुना), मी बलवानांचे आसक्तिरहित व कामनारहित बल म्हणजे सामर्थ्य आहे आणि सर्व सजीवांतील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे. ॥ ७-११ ॥
ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये । मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥ ७-१२ ॥
आणखीही जे सत्त्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत, ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत, असे तू समज. परंतु वास्तविक पाहाता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. ॥ ७-१२ ॥
गुणांचे कार्य असणाऱ्या सात्त्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या भावांनी हे सारे जग-सजीवसमुदाय मोहित झाले आहे. त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाही. ॥ ७-१३ ॥
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ ७-१४ ॥
कारण ही अलौकिक अर्थात अतिअद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे. परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात, ते या मायेला ओलांडून जातात, म्हणजे संसारातून तरून जातात. ॥ ७-१४ ॥
हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्मे करणारे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला भजतात. ॥ ७-१६ ॥
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते । प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ ७-१७ ॥
त्यांपैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असलेला अनन्य प्रेम-भक्ती असलेला ज्ञानी भक्त अति उत्तम होय. कारण मला तत्त्वतः जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. ॥ ७-१७ ॥
उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् । आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥ ७-१८ ॥
हे सर्वच उदार आहेत. परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे, असे माझे मत आहे. कारण तो माझ्या ठिकाणी मन-बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अतिउत्तम गतिस्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो. ॥ ७-१८ ॥
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते । वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ ७-१९ ॥
पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्त्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे, असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. ॥ ७-१९ ॥
त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन, निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात. ॥ ७-२० ॥
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति । तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ ७-२१ ॥
जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवतास्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो, त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. ॥ ७-२१ ॥
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते । लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥ ७-२२ ॥
तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो. ॥ ७-२२ ॥
पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त, मला कसेही भजोत, अंती मलाच येऊन मिळतात. ॥ ७-२३ ॥
मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ, अविनाशी अशा परम भावाला न जाणता मन-इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या, सच्चिदानंदघन परमात्मस्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात. ॥ ७-२४ ॥
आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या आणि अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत. अर्थात मी जन्मणारा-मरणारा आहे, असे समजतात. ॥ ७-२५ ॥
वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन । भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ ७-२६ ॥
हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व सजीवांना मी जाणतो. पण श्रद्धा, भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही. ॥ ७-२६ ॥
हे भरतवंशी परंतप अर्जुना, सृष्टीत इच्छा व द्वेष यांमुळे उत्पन्न झालेल्या सुखदुःखरूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व सजीव अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात. ॥ ७-२७ ॥
परंतु निष्कामभावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे, ते राग-द्वेष यांनी उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात. ॥ ७-२८ ॥
जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये । ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥ ७-२९ ॥
जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यांपासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष, ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात. ॥ ७-२९ ॥
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः । प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥ ७-३० ॥
जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह (सर्वांच्या आत्मरूप अशा) मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात. ॥ ७-३० ॥
श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानविज्ञानयोगः नावाचा हा सातवा अध्याय समाप्त झाला. ॥ ७ ॥