350 वर्षं जुन्या बाबुलनाथाच्या पिंडीवर दूध वाहण्यास मनाई, 'भेसळयुक्त दुधामुळे हानी होत असल्याची शंका,' काय आहे प्रकरण?

शुक्रवार, 3 मार्च 2023 (18:45 IST)
दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध प्राचीन बाबुलनाथ मंदिर जवळपास 350 वर्षं जुनं मंदिर आहे. दररोज शेकडो भाविक या मंदिरात शिवलींगाची पूजा करण्यासाठी दाखल होत असतात. परंतु मंदिर प्रशासनाने आता शिवलिंगावर दुग्धाभिषेक करण्यास मनाई केली आहे. भेसळयुक्त पदार्थं आणि रसायनांमुळे शंकराच्या पिंडीला हानी पोहोचत असल्याची शंका मंदिराच्या विश्वस्तांना आहे.
 
या पार्श्वभूमीवरच बाबुलनाथ मंदिराच्या विश्वस्तांनी शंकराच्या पिडींवर दूध वाहण्यास मनाई केली आहे.
 
यासंदर्भात पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच बैठकही घेतली आहे. तसंच मंदिराच्या विश्वस्तांनी आयआयटी बॉम्बेला यासाठी संपर्क साधला असून त्यांच्याकडून याबाबत संशोधन करून अहवाल सादर केला जाणार आहे.
 
बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील एक प्राचीन आणि सुप्रसिद्ध मंदिर आहे.
 
दक्षिण मुंबईत गिरगाव चौपाटीच्या शेवटच्या टोकाला हे मंदिर आहे. तसंच मुंबईतील एक प्रसिद्ध स्थळसुद्धा आहे.
 
यामुळेच मंदिर प्रशासनाने घातलेले निर्बंध आणि विश्वस्तांनी घातलेल्या विविध मर्यादांमागे नेमकी काय कारणं आहेत? आणि हे प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊया...
 
काय निर्णय घेतला आहे?
बाबुलनाथ मंदिरांच्या पुजाऱ्यांना आणि विश्वस्तांना शंकराच्या 350 वर्षं जुन्या प्रचीन मंदिरातील शंकराच्या पिडींवर काही बदल दिसले किंवा त्याची हानी होत असल्याची शंका आली.
 
यानंतर मंदिराच्या विश्वस्तांनी आयआयटी बॉम्बे या केंद्रीय शैक्षणिक संस्थेतील तज्ज्ञांना संपर्क साधला. याबाबत अभ्यास करून संशोधन करावं आणि अहवाल द्यावा अशी चर्चा आयआयटी बॉम्बे आणि बाबुलनाथ मंदिराच्या विश्वस्तांमध्ये काही महिन्यांपूर्वी झाली.
 
आता या अहवालाची प्रतिक्षा असल्याचं विश्वस्त नितीन ठक्कर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
अहवालातील शिफारशी, सूचना या विचारात घेतल्या जातील आणि नेमका काय निष्कर्ष काढला जातोय त्यानुसार पुढील निर्णय घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
सध्यातरी बाबुलनाथ मंदिरातील शंकराच्या पिडींवर दूध वाहण्यास, दुग्धाभिषेक करण्यास मनाई करण्यात आल्याचं नितीन ठक्कर म्हणाले.
 
“गेल्या सहा महिन्यांपासून दुग्धाभिषेक बंद आहे. केमिकलयुक्त पदार्थ वाहिल्याने पिंडीला हानी पोहोचू नये यासाठी खबरदारी म्हणून मनाई करत आहोत,” असंही नितीन ठक्कर यांनी स्पष्ट केलं.
 
ते असंही म्हणाले की, “शंकराच्या पिडीला कुठेही तडा गेलेला नाही. कुठेही पिडींला क्रॅक नाही. शंकराची पींड खंडीत झालेली नाही. आम्ही केवळ सर्वेक्षण करण्यासाठी आयआयटीला सांगितलं आहे. या महिन्याच्या अखेरिस आयआयटीचा अहवाल येईल. त्यानंतर आम्ही कारणांची अधिकृत माहिती देऊ.”
 
याठिकाणी मंदिराच्या पिडींवर सध्या जलाभिषेक, फळं, फुलं वाहण्याची परवानगी आहे. परंतु दूध, भस्म, गुलाल, चंदन असे काही इतर पदार्थ जे केमिकलयुक्त असू शकतात ते पिंडींवर वाहण्यास मनाई असल्याचं समजतं.
 
बाबुलनाथ मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. तर रविवार आणि सोमवारी तीन ते पाच हजार भावीक दर्शनासाठी येतात. तसंच शिवरात्रीला मंदिरात जवळपास साडे तीन लाख भावीक येतात.
 
मंदिर पहाटे पाच वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत खुलं असतं.
 
‘हे योग्य नाहीय’
दरम्यान, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या निर्बंधांसदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, “मंदिराच्या विश्वस्तांनी अनेक गोष्टींवर निर्बंधं आणले आहेत. दुग्धाभिषेक बंद आहे. पंचामृत अभिषेक बंद केलं त्यांनी. आता जलाभिषेकही बंद करण्याचा त्यांचा विचार आहे. ते आमच्यासमोर नवनवीन अहवाल आणतात. भाविकांची संख्याही त्यांनी मर्यादित केली. वेळवर निर्बंधं आणले. पाण्यामुळे धोका कसा असू शकतो?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 
“शंकराच्या पिडींला तडे गेले नाहीत तर ते डॅमेज होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. यासाठी दोन वर्षांपूर्वीच त्यांनी आयआयटीला एक्झामीन करण्यास सांगितलं होतं. पण तडे गेलेले नाहीत. शिवलींग डॅमेज होत आहे,” असं विश्वस्तांचं म्हणणं असल्याचंही मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे.
“मंदिराच्या विश्वस्तांची ही भूमिका आणि हे नियम योग्य नाहीत. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगणार आहे,”असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
15 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बाबुलनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन ठक्कर, विश्वस्त प्रदीप श्रॉफ यांच्यासह भाविकांचे काही प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेतली.
 
राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार,
 
‘कोरोनाकाळात मंदिरात पूजाविधिबाबत प्रतिबंध लावण्यात आले होते. आयआयटीच्या एका अहवालानुसार, शिवलिंगावर हळदी, कुंकू किंवा इतर पूजा साहित्य वाहिल्याने, चंदनाचा लेप लावल्याने शिवलींगाची झीज, नुकसान होत असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात पूजाविधी करण्याबाबत भाविकांची मागणी होती. यासंदर्भात बैठक पार पडली आणि जलाभिषेक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.’
 
काय कारणं असू शकतात?
बाबुलनाथ मंदिराचे विश्वस्त नितीन ठक्कर म्हणाले, “केमिकलयुक्त पदार्थ वाहिले जात असावेत अशी आम्हाला शंका आहे यामुळे परिणाम होताना दिसत आहे. आता एक्सपर्ट अधिक चांगलं सांगू शकतात. झीज झाल्याचं सांगितलं जात आहे.”
 
यासंर्भातील चौकशीसाठी मंदिराजवळील बाजारपेठांमधील पदार्धांचीही पडताळणी केली जात असल्याचं वृत्त आहे.
 
शंकराच्या पिडींवर वाहिल्या जाणाऱ्या पूजेच्या साहित्याचाही दर्जा तपासला जाऊ शकतो. मंदिराच्या आसपासच्या दुकानांमधील दूध, चंदन, मध, मिठाई अशा काही पदार्थांमध्ये भेसळ किंवा केमिकल तर नाही ना? याचीही चौकशी केली जाऊ शकते.
 
यात आणखी एक मुद्दा उपस्थित केला जात आहे तो म्हणजे समुद्राच्या हवेचा.
 
पर्टनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “शंकराच्या पिडींवर तडे गेले नसून त्याला डॅमेज झालं आहे. दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर हे गिरगाव चौपाटीच्या म्हणजे समुद्रसपाटीपासून जवळ आहे. हे सुद्धा कारण असू शकतं.”
 
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती