जिग्नेश मेवाणींविरोधात AIMIMचा हिंदू उमेदवार, मुस्लिमबहुल वडगामची साथ काँग्रेस, आप की भाजपला?

गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (09:00 IST)
गुजरात विधानसभा निवडणुकीत 2017 पूर्वीपर्यंत बनासकांठामधील वडगाम मतदारसंघाची फारशी चर्चा होत नसायची.
 
मात्र, 2017 मध्ये हा मतदारसंघ अचानक चर्चेत आला. याचं मुख्य कारण म्हणजे येथूनच उना प्रकरणातील आंदोलनकर्ते जिग्नेश मेवाणी उभे होते.
 
अपक्ष उभ्या असलेल्या मेवाणी यांना काँग्रेसने पाठिंबा दर्शवला होता.
 
मेवाणी यांना पाठिंबा देताना काँग्रेसने तत्कालीन विद्यमान आमदार मणिभाई वाघेला यांचं तिकिटही कापलं होतं. वाघेला यांना जवळच्या ईडर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसने पाठवलं होतं.
 
मात्र यंदाच्या निवडणुकीत वडगाम मतदारसंघाचं समीकरण थोडंस वेगळं आहे.
 
मणिभाई वाघेला यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अर्थातच त्यांना वडगाममधून भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे.
 
तर 2017 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकलेले मेवाणी आता गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आहेत. ते वडगाममधूनच काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
 
शिवाय, आम आदमी पक्षाचे उमेदवार दलपत भाटिया, AIMIM पक्षाकडून कल्पेश सुंधिया रिंगणात आहेत.
 
आप आणि AIMIM मुळे मुस्लीम मतांची विभागणी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
ही तफावत जिग्नेश मेवाणी यांच्यासाठी अडचणीची ठरेल का, हा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.
 
दुसरीकडे, भाजप सरकारच्या विरोधात उघडपणे आंदोलन करणाऱ्या विपुल चौधरींच्या अटकेनंतर अर्बुदा सेना नामक संघटना आक्रमक झाली आहे.
 
या संघटनेचा चौधरी समाजावर प्रभाव आहे. त्यामुळे चौधरी समाजाची मतं मिळवण्यात भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे.
 
या सगळ्या घडामोडींचा एकत्रित परिणाम आणि त्यामुळे चौधरी समाज आणि मुस्लीम समाजाच्या मतांमधील संभाव्य फाटाफूट यांचा फायदा नेमका कुणाला होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
 
मागच्या निवडणुकांमध्ये काय झालं?
सध्या भाजपकडून उभे असलेले मणिभाई वाघेला हे 2012 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार फकीरभाई वाघेला यांचा पराभव केला होता.
 
2012 साली मणिभाई वाघेला यांना 90 हजार 375 मते मिळाली. तर फकीरभाई वाघेला यांना 68 हजार 536 मते मिळवता आली. एकूण 21 हजार 839 मतांनी मणिभाई विजयी झाले होते.
 
गुजरातमधील उनाकांड प्रकरणानंतर उदयाला आलेल्या दलित चळवळीमुळे सामाजिक कार्यकर्ते जिग्नेश मेवाणी प्रसिद्धीच्या झोतात आले.
 
2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
 
काँग्रेसने विद्यमान आमदार मणिभाई यांना उमेदवारी न देता त्यावेळी मेवाणी यांना पाठिंबा जाहीर केला होता.
 
या निवडणुकीत भाजपने विजयकुमार चक्रवर्ती यांना उमेदवारी दिली होती. जिग्नेश मेवाणी यांना या निवडणुकीत 95 हजार 497 मते मिळाली. तर, चक्रवर्ती यांना 75 हजार 801 मते मिळाली. म्हणजेच, एकूण 19 हजार 696 मतांनी मेवाणी यांनी विजय मिळवला होता.
 
प्रत्येकाचा विजयाचा दावा
भाजप उमेदवार मणिलाल वाघेला यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हटलं, “माझ्या मतदारसंघातील वडगाममध्ये पाण्याचा प्रश्न होता. परंतु अलिकडेच सरकारने मुक्तेश्वर धरण आणि करामावत तलावात पाणी भरण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी 192 कोटींची तरतूद केली आहे. ही मागणी गेल्या 20 वर्षांपासून सुरू होती."
 
ते पुढे म्हणाले, "माझ्या 2012 ते 2017 च्या कार्यकाळात मी माझ्या मतदारसंघात अॅट्रॉसिटीची एकही तक्रार होऊ दिलेली नाही. सर्व लोक एकत्रितपणे राहतात. समाज एकत्र असेल तरच परिसराचा विकास होऊ शकतो. आपण दोन भागात विभागलो तर परिसरात कोणतंही काम करता येणार नाही.”
 
 "मला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. लोक विकासाचं स्वागत करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष वडगाम विधानसभेची जागा प्रचंड बहुमताने जिंकेल," असा दावा वाघेला यांनी केला.
 
 काँग्रेस उमेदवार जिग्नेश मेवाणी यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं, “मागील वेळी मी आंदोलक म्हणून निवडणुकीत उतरलो होतो. मला निवडणुकीचं राजकारण माहीत नव्हतं. पण आता मी राजकीयदृष्ट्या परिपक्व झालो आहे.
 
यावेळी काँग्रेसकडून मी निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने परिवर्तन रॅली, भारत जोडो रॅली सारख्या कार्यक्रमातून लोकांचा पाठिंबा प्राप्त केला आहे."
 
ते पुढे म्हणाले, "गुजरातची जनता बेरोजगारी आणि महागाईमुळे त्रस्त आहे. त्यामुळे यावेळी लोक काँग्रेसला मतदान करतील. यंदाच्या निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसला 125 जागा मिळतील. वडगामच्या मुस्लिम बांधवांनाही माहीत आहे की जिग्नेश मेवाणी यांनी मुस्लिमांसाठी आणि बिल्किस बानोसाठी आवाज उठवण्याचं काम केलं आहे.”
 
मेवाणी यांनी पुढे म्हटलं, “मी उना पीडितांसाठी तसंच विपुलभाई चौधरी यांच्या बेकायदेशीर अटकेविरोधात बोललो होतो, हे वडगामच्या हिंदू बांधवांना माहीत आहे. तसंच मी किशन भारवाडच्या मुद्द्यावरही बोललो.
 
गुजरातमध्ये काँग्रेस आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करेल. कंत्राटी पद्धती बंद करून कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल. वैद्यकीय विमा 10 लाखांपर्यंत असेल. काँग्रेसने राजस्थानमध्येही या योजना लागू केल्या आहेत.”
 
बीबीसीने येथील आम आदमी पक्षाचे उमेदवार दलपत भाटिया यांच्याशीही संवाद साधला.
 
"वडगाम जागेवर आम आदमी पक्षाचा विजय निश्चित आहे. ही जागा जिंकल्यानंतर आम आदमी पक्ष लोकांच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर भर देणार आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरही भर दिला जाईल. आणि त्या भागातील शेतीचे पाणी जे आम्ही वर्षानुवर्षे चालत असलेल्या गोष्टींचे निराकरण करू," असं त्यांनी म्हटलं.
 
 ते पुढे म्हणाले, “या भागात GIDC निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरुणांना रोजगार मिळण्यासाठी ते आवश्यक आहे. वडगाममध्ये अनुसूचित जाती जमातीचे वसतिगृह होते ते बंद करण्यात आलं आहे. आम्ही केवळ अनुसूचित जाती समुदायांसाठीच नाही तर प्रत्येक समाजासाठी वसतिगृहे आणि शाळा बांधू.
 
शिक्षणावर भर दिला जाईल. वडगाम विधानसभेतील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा नाहीत, पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. आम्ही आरोग्य सेवेवर भर देणार आहोत."
 
AIMIM उमेदवार कल्पेश सुंधिया म्हणाले, "वडगाममध्ये प्रत्येक पक्ष आयात केलेला उमेदवार आणतो. आमच्या पक्षाने मला स्थानिक उमेदवार म्हणून संधी दिली आहे. स्थानिक उमेदवार स्थानिक लोकांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. वडगामचे लोक प्रतिनिधित्व करू शकत नाहीत, असं इतर पक्षांना वाटतं का?
 
निवडणूक सोपी नाही
दलित कार्यकर्ते आणि लेखक चंदू मेहेर यांच्या मते, “यंदाची निवडणूक जिंकणं कुणासाठीही सोपं नाही.”
 
ते पुढे म्हणाले, "भाजप उमेदवार वाघेला हे काँग्रेसमधून पक्षांतर करून भाजपमध्ये आले आहेत. ते काँग्रेसमध्ये विजयी झाले होते. पण त्यावेळी त्यांना लोकांनी काँग्रेस उमेदवार म्हणून मते दिली होती. ती मते त्यांना आता मिळतीलच असं नाही.”
 
स्थानिक पत्रकार एमजी पटेल यांनी म्हटलं, "वडगाम विधानसभा जागेचा इतिहास पाहिला तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र यावेळी समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत."
 
त्यांच्या मते, “आम आदमी पार्टीचे उमेदवार दलपतभाई भाटिया यांचं दलित समाजात चांगलं काम आहे. सामाजिक कार्यक्रमांमुळे ते लोकांच्या परिचयाचे आहेत. त्यामुळे दलित समाजाची मते आम आदमी पक्षाकडे वळवण्याचीही शक्यता आहे."
 
वडगाम विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतांनाही महत्त्व असल्याचं विश्लेषकांनी सांगितलं.
 
पटेल म्हणतात, “मुस्लिमांनी याठिकाणी वर्षानुवर्षे काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मात्र यंदा AIMIM पक्षाने स्वत:चा उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे मुस्लिम मतांमध्ये फूट पडण्याचीही शक्यता आहे. त्याचा फायदा भाजपलाही होऊ शकतो.”
 
याशिवाय, वडगामची सर्वांत मोठी समस्या म्हणजे पाण्याची टंचाई. यासंदर्भात आमदार जिग्नेश मेवाणी यांनीही मुक्तेश्वर धरण आणि करमावद तलावातून पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले. विधानसभेतही त्यांनी निवेदन दिलं होतं. त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो, असं पटेल म्हणाले.
 
सर्वाधिक मुस्लीम मतदार
बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम विधानसभा जागेवर 2.94 लाख मतदार आहेत. त्यामध्ये 1.44 लाख महिला आणि 1.50 लाखांच्या जवळपास पुरुष मतदार आहेत.
 
या ठिकाणी सर्वाधिक मतं मुस्लिम समाजाची आहेत. ही संख्या 82 हजारांच्या जवळपास आहे.
 
यानंतर चौधरी समाजाचे 51 हजार, दलित समाजाचे 42 हजार, ठाकोर समाजाचे 41 हजार मतदार आहेत.
 
याशिवाय, प्रजापती आणि नई समाजाचे प्रत्येकी 4 हजार तर देवीपूजक समाजाचे 1हजार 500 मतदार आहेत.
 
या समाजातील नागरिकांचा कौल नेमका कुणाला मिळतो, यावर निवडणुकीचं गणित बऱ्याच अंशी अवलंबून असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती