गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील या मतदारांना सुट्टी जाहीर

बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (21:25 IST)
मुंबई – गुजरात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राज्यातील पालघर, नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना मतदानासाठी सुट्टी देण्याचा आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केला आहे.
 
गुजरात विधानसभा निवडणुकीकरिता 1 व 5 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देणार आहे. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे.
 
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी मिळणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत मिळू शकणार आहे. मात्र, त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. तसेच आस्थापनांनी सूचनांचे योग्य अनुपालन करुन कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदानाकरिता सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याबाबत मतदारांकडून तक्रार आल्यास आस्थापनांविरुद्ध योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे, असे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती