गणेशोत्सव दरम्यान ज्येष्ठ गौरींचे आगमन होते. अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करण्यात येते. अष्टमीला ज्येष्ठ गौरी पूजन करण्यात येते. ज्येष्ठ नक्षत्रांवर गौरींना पूजले जाते म्हणूनच त्याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही संबोधले जाते. या व्रतामध्ये तीन मुख्य भाग म्हणजे -
ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीला महानैवेद्य दाखविण्यात येतो. यात गोडाधोडाचे जेवण केले जाते. साधारणतः 16 पदार्थ बनविण्याची पद्धत असते. परंपरेनुसार काही ठिकाणी 16 वेगवेगळ्या पद्धतीची भाजी बनविली जाते. काही ठिकाणी नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो.
तर काही ठिकाणी 5 प्रकारच्या कोशिंबीर तसेच गोडाचे पंचपक्वान्न ज्यामध्ये शेवयांची खीर, गव्हल्यांची खीर, पुरण, लाडू, काकडीचे गोड पातोळे याचा समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी पदार्थ देखील असतात.
वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे गोड पदार्थ तयार केले जातात. जसे घावन- घाटले, पुरणपोळी, साटोर्या, सांजोऱ्या, करंजी, लाडू, बासुंदी इतर.
या व्यतिरिक्त फळे, मिठाई, फराळाचे (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) विविध पदार्थ तयार केले जातात.