मूळ संकल्पना अशी देखील आहे की भाविकाने स्वत:च्या हाताने मातीपासून गणेश मूर्ती तयार करुन पार्थिव गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी आणि दुसऱ्या दिवशी पुनरागमन म्हणून विसर्जन करावे. मात्र कालांतराने मोठे बदल होत गेले आणि कुठे दीड दिवस, तर कुठे पाच दिवस तर कोणी अकरा दिवस बाप्पाची स्थापना करून पूजा-आराधना करु लागले.
यामागील एक मूळ कारण हे देखील सांगितले जाते की श्री व्यास यांनी जेव्हा महाभारत लिहायला सुरुवात केली तेव्हा स्वतः श्री गणेश त्यांचे लेखनिक होते. तेव्हा महाभारत लिहीत असताना गणेशाचं अंगातलं पाणी कमी झालं आणि त्वचा कोरडी पडू लागली. गणरायाच्या अंगाची प्रचंड आग होऊ लागली हे महर्षी व्यास यांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब गणेशाच्या शरीरावर ओल्या मातीचा चिखलाचा लेप लावला. यानंतर गणेशाच्या अंगावर गार पाण्याचा शिडकावा केला. परिणाम स्वरुप गणराचा ताप उतरला. ही घटना भाद्रपदातील चतुर्थीच्या दिवशी घडली असल्याचे समजते. चतुर्थीच्या दिवशी हा लेप लावण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी पंचमीला गणेशाचा ताप उतरला तेव्हा व्यासांनी गणपतीच्या शरीरावरील चिखलाचा लेप काढून पाण्यात विसर्जित केला. यामुळे चतुर्थीला पार्थिव गणपतीचे पूजन आणि पंचमीला विसर्जन अशी प्रथा रूढ झाली.