मनाच्या लेखणीतून.... जागतिक मैत्री दिवस

©ऋचा दीपक कर्पे

शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (19:43 IST)
मैत्री! दोन अक्षरांचा हा शब्द आणि त्यासाठी दोनच अटी.. No expectations... No complaints.... म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवणारे आणि कुठलीही तक्रार न करणारे, निखळ आनंद देणारे हे नाते! 
प्रत्येकाच्या आयुष्यात असे मित्र मैत्रिणी असतातच.. तर असाच एक मित्र म्हणा, मैत्रीण म्हणा आपल्या सर्वांच्याच आयुष्यात common आहे! कोण बरं?? तर ते म्हणजे पुस्तक! 
 
हो पुस्तक. लहानपणापासून तर म्हातारं होईपर्यंत बडबड गीतांपासून तर भगवद् गीतेपर्यंत साथ देणारी ही जिवाभावाची मैत्रीण! आपल्या एकटेपणात आपला साथ देणारी.
 
एकविसाव्या शतकात आता आपली ही मैत्रिण पण काळानुसार बदलली आहे, अपडेट झाली आहे. आता हिने ई-पुस्तकाचे स्वरूप घेतले आहे. 

सध्याच्या कोरोनाकाळात ही मैत्री म्हणजे एक वरदानच! एका बोटाच्या इशाऱ्यावर ई पुस्तकांचे विश्व आपल्यासमोर खुले होते आणि आपण आपल्या संपूर्ण काळज्या, एकटेपण सारे सारे विसरून ह्या विश्वात भटकंती करून येऊ शकतो! 
 
आपण ही ई-पुस्तके आपल्या मित्रा नातेवाईकांना भेट पण करू शकतो! ही भेट किती वेगळी, आनंद देणारी आणि सुरक्षित आहे! नाही का??
 
ई-पुस्तके आपल्या आणखी एका जिवाभावाच्या मित्रालाही जपतात बरं का? त्यांचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी झटतात..आता तो मित्र कोण?? तो मित्र म्हणजे वृक्ष. ई-पुस्तकांमुळे किती टन कागदाची बचत होते आणि वृक्षांचं आयुष्य वाढतं.
 
आज हजारो ई-पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध आहेत. प्रकाशन सोपे आहे. एका साहित्यिकाची कृती फारंच कमी वेळात लाखो लोकांपर्यंत पोहोचते... अगदी सात समुद्रा पलीकडे पण..! 
 
प्रत्येक साहित्यिकासाठी त्याची एकेक कृती जणू त्याच्या काळजाचा तुकडाच! रात्र रात्र जागून, एकेक शब्द विचारपूर्वक निवडून, शंभर वेळा संपादन करून...एक मनासारखी रचना तयार होते अन् मग तो ती रचना वाचकांसमोर ठेवतो. त्याची अपेक्षा काय? मनापासून मिळालेले कौतुकाचे फक्त दोन शब्द! 
पण एवढी मेहनत करून, परमार्थ आणि प्रपंच साधून, त्याच्या अतिव्यस्त दिनचर्येतून कसाबसा वेळ काढून जर तो साहित्य सेवा करत असला तर त्याला "फूल नाही फुलाची पाकळी" म्हणून थोडे प्रोत्साहन देणे आपले पण कर्तव्य आहेच नं?
 
हीच ती वेळ, साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याची.. त्यांच्या कृतीला वाव देण्याची आणि आपला साहित्यिक वारसा पुढे नेण्याची. आणि त्यासाठी खूप काही करायची गरज नाही.. कारण ई-पुस्तकांची किंमत फार जास्त नसते. एक सामान्य व्यक्ती ती पुस्तके सहज विकत घेऊ शकतो. 

जुन्याकाळी साहित्यिकांना राजाश्रय मिळायचे, त्यांच्या कलेची भरभरून स्तुतीतर व्हायचीच पण त्यांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदतही व्हायची. पण आता गेली ती राजेशाही! आता लोकतंत्रात प्रजा हीच राजा! 
तर चला, आपल्या मनाची श्रीमंती जपून मीच माझ्या मनाचा राजा असे म्हणत, आपल्या साहित्यिक मित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी ह्या मित्रदिना निमित्त एक पाऊल पुढे ठेवू या...! महिन्यातून किमान एक ई-पुस्तक वाचू या! 
 
पुन्हा एकदा जागतिक मित्रदिनाच्या शुभेच्छा!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती