दिल्ली विधानसभा : काँग्रेसचा बेरोजगार भत्ता; भाजपची इलेक्ट्रिक स्कूटर

सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (11:18 IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. देशाची राजधानी आपल्या ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, दिल्लीच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी या पक्षांनी आपल्या   जाहीरनामतून अवाजवी आश्वासने दिली जात आहेत. यामध्ये काँग्रेसने पदवीधर तरुणांना बेरोजगार भत्ता देण्याते तर भाजपने गरीब कॉलेज तरुणींना इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनांमुळे देशभरात ही निवडणूकचर्चेचा विषय बनली आहे.
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यामध्ये जे पदवीधर बेरोजगार आहेत त्यांना प्रतिमहिना 5,000 रुपये तर जे पदव्युत्तर बेरोजगार आहेत त्यांना प्रतिमहिना 7,500 रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे वचन दिले आहे. तर भाजपनेही आपल्या जाहीरनाम्यातून गरीब कुटुंबातील ज्या विद्यार्थिनी महाविद्यालयात प्रवेश घेतील त्यांना मोफत इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचे वचन देण्यात आले आहे. तसेच 9 वी ते 12 वीच्या वर्गात शिकणार्‍या गरीब विद्यार्थिनींना मोफत सायकल दिली जाणार असल्याचे वचन देण्यात आले आहे.
 
दिल्लीतील सत्ताधारी सध्या आम आदमी पार्टीने (आप) आपल्या यापूर्वीच्या 10 ते 15 विविध लोककल्याणकारी योजनांचा नव्या जाहीरनाम्यात पुन्हा उल्लेख केला आहे. या योजनांची गॅरंटी आपने दिल्लीकरांना दिली आहे.
 
यामध्ये मोफत वीज, पाणी आणि वायफाय आणि काही मूलभूत सुविधांचा समावेश आहे. त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबातील एका व्यकतीसाठी रोजगार गॅरंटी कार्डही देण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती