क्रिकेट वर्ल्ड कप IND vs NZ : टीम इंडियासाठी न्यूझीलंडचा पेपर सर्वात अवघड का आहे?
रविवार, 22 ऑक्टोबर 2023 (12:37 IST)
तो दिवस होता 10 जुलै 2019. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक यांच्यातील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामना. एकदिवसीय सामना दोन दिवस खेळला जाण्याचा दुर्मीळ प्रकार त्या दिवशी घडला.
उपांत्य फेरीतील सामन्यातील ती एकमेव दुर्मीळ घटना नव्हती. न्यूझीलंडनं दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात 3 बाद 5 अशी धक्कादायक झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल ही टॉप ऑर्डर 19 बॉलमध्ये परतली होती.
धक्कादायक सुरूवातीनंतरही भारतीय टीमनं संघर्ष केला. रविंद्र जाडेजा आणि महेंद्र सिंह धोनी यांच्या भागीदारीनं टीम इंडियानं मॅचमध्ये कमबॅक केलं होतं.
जाडेजा बाद झाला पण धोनी मैदानात होता. बॉल आणि धावा यांच्यातील अंतर मोठं होतं धोनी है तो मुमकीन है हा प्रत्येक भारतीय चाहत्यांचा विश्वास त्यापेक्षाही मोठा होता.
भारताच्या इनिंगमधील 49 वी ओव्हर निर्णायक ठरली. लॉकी फर्ग्युसनच्या त्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर षटकार लगावला. या षटकारासह भारतीयांच्या विजयाच्या अपेक्षाही उंचावर होत्या.
महेंद्रसिंह धोनी आणि भुवनेश्वर कुमार जोडीनं त्या बॉलवर पहिली धाव पूर्ण केली. धोनी दुसरी धाव पूर्ण करणार इतक्यात....मार्टीन गुप्टीलचा थेट थ्रो स्टंपवर आदळला.
गुप्टीलचा थ्रो स्टंपवर आदळला तेव्हा धोनीची बॅट क्रिझपासून अगदी इंचभर अंतरावर होती. धोनी बाद झाला आणि टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न धुळीला मिळालं.
क्रिकेट विश्वातील एका सर्वोत्तम फिनिशरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा त्या थ्रो मुळे शेवट झाला.
20 वर्षांचं वर्चस्व
आज (22 ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड या टीम 2023 च्या विश्वचषकातील सामना खेळण्यासाठी धरमशालामध्ये आमने-सामने येणार आहेत. त्यावेळी हा इतिहास प्रत्येक भारतीय चाहत्याला आठवणार आहे.
आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड टीम इंडियाला नेहमीच त्रासदायक ठरलंय. या स्पर्धेत भारतानं न्यूझीलंड विरुद्धचा शेवटचा विजय 2003 साली मिळवलाय.
भारतानं हा विजय मिळवला होता त्यावेळी महेंद्रसिंह धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नव्हतं. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे कुमारवयात होते.
हा 20 वर्षांचा इतिहास बदलण्याचं मोठं आव्हान यजमानांवर आहे.
टीम इंडियात 2 बदल होणार ?
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. अष्टपैलू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे हा सामना खेळू शकणार नाही.
हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते. त्याचबरोबर या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या शार्दूल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीची निवड होऊ शकते.
हार्दिक खेळणार नसला तरी भारताचे अन्य प्रमुख खेळाडू फॉर्मात आहेत. कर्णधार रोहित शर्मा प्रत्येक सामन्यात धडाकेबाज सुरूवात करून देतोय.
रोहितनं रचलेल्या विजयाच्या पायावर विजयाचा कळस चढवण्याचं काम विराट कोहली करतोय. या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी स्पर्धेत शतक झळकावलं असून ते न्यूझीलंड विरुद्धचा इतिहास बदलण्यासाठी सर्वोत्तम खेळ खेळण्यासाठी सज्ज आहेत.
शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यांनी देखील उपयुक्त कामगिरी केलीय. जसप्रीत बुमरा, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव हे गोलंदाजही फॉर्मात असल्यानं भारतीय संघ या स्पर्धेत अद्याप अपराजित आहे.
न्यूझीलंडचं तगडं आव्हान
न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे आत्तापर्यंत फक्त एकच सामना खेळलाय. तो भारताविरुद्धही मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे.
विल्यमसनच्या अनुपस्थितीमध्ये टॉम लॅथमनं संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळलीय. डेव्हॉन कॉनवे आणि राचिन रविंद्र ही जोडी भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरु शकते.
नवोदित सलामीवीर विल यंगनं अफगाणिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावलंय. तर ग्लेन फिलिप्समध्ये कमी बॉलमध्ये वेगानं धावा काढण्याची क्षमता आहे.
ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन असा वैविध्यपूर्ण मारा भारतीय फलंदांजासाठी आजवर त्रासदायक ठरलाय.
विशेषत: बोल्टच्या सुरुवातीच्या स्पेलला भारतीय फलंदाजांना जपून खेळावं लागेल. रोहित शर्माच्या आक्रमक खेळाची ही मोठी परीक्षा असेल.
या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत मिचेल सँटनर आघाडीवर असून जमलेली जोडी फोडण्याचं त्याचं कौशल्य यापूर्वी अनेकदा सिद्ध झालंय.
कुणाची मालिका खंडित होणार?
भारत आणि न्यूझीलंड यांनी विश्वचषकात जबरदस्त सुरूवात केलीय. भारतानं ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा पराभव केलाय. तर न्यूझीलंडनं इंग्लंड, नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यावर विजय मिळवलाय.
आता या दोन्हीपैकी एकाची विजयी मालिका पाचव्या सामन्यात खंडित होईल पण त्यापूर्वी क्रिकेट फॅन्सना ब्लॉकब्लास्टर रविवारची मेजवानी मिळणार हे निश्चित.