टीम इंडिाचा हा सांघिक कामगिरीचा विजय

मंगळवार, 24 फेब्रुवारी 2015 (12:02 IST)
‘भारतीय संघाने सर्वच आघाडय़ांवर सरस कामगिरी केल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले. त्यामुळे हा सांघिक कामगिरीचा विजय आहे,’ अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विजयानंतर व्यक्त केली. 
 
या सामन्याबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘विजयापेक्षा भारतीय संघाने या सामन्यात केलेली कामगिरी महत्त्वाची आहे. सलग दुसर्‍या सामन्यामध्ये आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सरस खेळ केला. दक्षिण आफ्रिका हा आव्हानात्मक संघ आहे. गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षणमध्ये हा संघ अव्वल आहे. त्यांच्याविरुद्ध जिंकणे कठीण होते. हा संघ अत्यंत बलाढय़ आहे. या संघाला सहजासहजी हरविणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध विजय मिळवणे महत्त्वाचे आहे. आम्ही सामन्यासाठी तयार केलेल्या योजना मैदानावर राबवण्यात यशस्वी ठरत आहोत.’ भारतीय संघाने या सामन्यात अत्यंत ऐतिहासिक कामगिरी केली. शिखर धवनने शतक झळकावून सर्वाना सुखद धकका दिला. विराट कोहली आणि अजिंक्य राहाणे यांनी त्याला चांगली साथ दिली. 
 
विशेषत: राहाणेची खेळी आक्रमक अशी होती. त्याच्या या खेळीमुळे आम्हाला मोठे लक्ष्य आफ्रिकेला देता आले, असेही धोनीने नमूद केले. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळवलेल्या विजयाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाचे अभिनंदन केले आहे. ‘भारताने वर्ल्ड कपमध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेला हरवून मिळवलेल्या सलग दुसर्‍या विजयाबद्दल त्यांचे खूप अभिनंदन’, असा मजकूर राष्ट्रपतींनी ट्विट केला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून भारतीय संघाचे अभिनंदन करून पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.  

वेबदुनिया वर वाचा