पुण्यात उद्योजकांना कुठलीच सूट नाही ; पूर्वीचीच स्थिती कायम

बुधवार, 22 एप्रिल 2020 (08:42 IST)
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच काही औद्योगिक क्षेत्रांकरीता शिथिलता दिली आहे. परंतु पुण्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे ही शिथिलता पुणे महानगर क्षेत्रामध्ये म्हणजेच पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण तसेच एमआयडीसी क्षेत्रामध्ये रद्द करण्यात आलेली आहे. येथे कोणतीच सवलत देण्यात आलेली नाही. त्यामुळे दि. 17 एप्रिल पूर्वीचीच परिस्थिती कायम राहील, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 
या क्षेत्रामध्ये फक्त मेडीसीन, एलपीजी अशा सारख्याच अत्यावश्यक सेवांना ज्यांना दि.17 एप्रिल पूर्वी परवानगी देण्यात आली आहे. त्याच सेवा आता चालू राहतील. परंतु या उद्योगांच्या व्यवस्थापनाने त्यांच्या कामगारांना लॉकडाऊनच्या कालवधीमध्ये त्या उद्योगाच्या ठिकाणीच निवासाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना इतर ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर यांनी म्हटले आहे.
 
नागरिकांना आवाहन
त्याचप्रमाणे त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, कोवीड प्रार्दुभावापासून आपल्या व कुटूंबाच्या संरक्षणाकरीता प्रशासन, पोलीस विभाग,महसूल विभाग व इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. तसेच अनेक सामाजिक संस्थाही याकरीता समाजपयोगी काम करीत आहे. पुणे महानगर क्षेत्रामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आपल्या व कुटूंबियांच्या हिताकरिता आपण घराबाहेर पडू नका. कुटूंबातील ज्येष्ठ सदस्याला मधुमेह, रक्तदाब, किडणी विकार, ह्दयरोग इ. आजार असल्यास तसेच त्यांना किंवा इतर सदस्यांना फ्लू सदृक्ष आजाराची लक्षणे दिसल्यास त्याची ताबडतोब वैद्यकीय तपासणी करावी. आपणास आवश्यकता वाटेल तेव्हां तात्काळ वैद्यकीय अधिका-यांशी किंवा 108 क्रमांकावर रुग्णवाहीकेला संपर्क करावा. तसेच नियमीतपणे मास्कचा वापर करावा. बाहेरुन आल्यास एकदम कुटूंबांतील सदस्यांशी थेट संपर्क टाळावा,कोणत्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर पडू नये. आपण प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे सांगून प्रशासनास सहकार्य केल्यास आपण निश्चितच या संकटावर मात करु शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती