आता संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे बंद

सोमवार, 20 एप्रिल 2020 (16:10 IST)
मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत. या शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे. मध्यरात्रीपासून म्हणजेच २० तारखेपासून मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे बंद राहणार आहे. पुढील सात दिवसात शहरात कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. केवळ  जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त सकाळी १० ते १२ उघडी राहणार आहेत. पुण्यात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जाणार असून जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. असा आदेशच पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे. 
 
देशात कोरोनाचा वाढत जाणारा धोका लक्षात घेता ३ मे पर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र त्यापुर्वी आपल्या राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोन भागात उद्योग व्यवसायासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्यापासून काही प्रमाणात मुभा दिली आहे. मात्र ज्या भागात बाधित रुग्ण आढळत आहे. अशांना मुभा देण्यात आली नाही. मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक रूग्ण असल्याने पुणे संपूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय कुठल्याच कारणासाठी बाहेर पडू नये, असं पोलिसांनी आवाहन केलंय.
 
पुणे महापालिकेचे क्षेत्र, पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्र, संपूर्ण हवेली तालुका, शिरुर आणि वेल्हे तालुक्यांचा काही भाग आणि बारामती नगर परिषदेची संपूर्ण हद्द संक्रमणशील क्षेत्र  म्हणून जाहीर करण्यात आलंय. या संक्रमणशील क्षेत्राला २७ एप्रिलपर्यंत सील करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील कोणाही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही आणि बाहेरच्या भागात राहणाऱ्या कोणा व्यक्तीलाही या परिसरात येता येणार नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती