राज्यातील दैनंदिन नव्या रुग्णसंख्येतही घट

बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (09:24 IST)
पुणे शहर आणि जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे, तसेच राज्यातील दैनंदिन नव्या रुग्णसंख्येतही घट झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून सक्रिय म्हणजे, प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १०० किंवा त्याहून कमी असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.
 
मार्च २०२० मध्ये महाराष्ट्रात करोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सातत्याने महाराष्ट्र राज्यातील रुग्णसंख्येने विक्रमी उच्चांक नोंदवले. मागील आठवड्यापासून रुग्णसंख्येत दिलासादायक घट दिसून येत आहे. राज्यात दोन वेळा नीचांकी दैनंदिन नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून प्रत्यक्ष उपचाराधीन असलेल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट दिसत आहे. २० जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.
 
यांमध्ये प्रामुख्याने जळगाव, नंदूरबार, धुळे, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. भिवंडी, उस्मानाबाद, औरंगाबाद, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या ५०० पेक्षा कमी आहेत. उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १५,५५२ (एक नोव्हेंबरच्या अहवालाप्रमाणे) एवढी आहे.
 
राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, राज्यात सध्या १५,५५२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांपैकी सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांमध्ये आहेत. मात्र, सक्रिय रुग्णसंख्येत दिसत असलेली घट लक्षणीय आणि सकारात्मक आहे.
 
दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या घटली असल्याने सक्रिय रुग्णसंख्येत घट दिसत आहे. मात्र, दिवाळी आणि त्यानिमित्ताने होणारे पर्यटन आणि भेटीगाठी या काळात नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक खबरदारीपूर्ण वर्तन करणे अपेक्षित आहे. मुखपट्टी, वैयक्तिक स्वच्छता, हात धुणे, शारीरिक अंतर, गर्दी टाळणे या नियमांचा अवलंब केल्यास रुग्णसंख्येतील घट कायम राखणे शक्य असल्याचेही डॉ. आवटे यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती