30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरण करा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना उद्दीष्ट
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (09:04 IST)
कोरोनाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सुरुवातीपासून सांगितलं जात आहे. महाराष्ट्र सरकारनंही आता 100 टक्के लसीकरणासाठी प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात लसीकरणाला वेग यावा म्हणून 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिला डोस घेणाऱ्यांचं प्रमाण 100 टक्के करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना तसं उद्दिष्टंच ठरवून देण्यात आलं आहे.
सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नाही. लस घेणाऱ्यांचा संसर्गाची शक्यता कमी आणि संसर्ग झाला तरी जीवाला धोका कमी आहे.
लसीच्या आतापर्यंतच्या वापरावरून हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळं टाळाटाळ न करता नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.