राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मृत्युदरापेक्षा राज्यातील मृत्युदर अधिक

गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (08:56 IST)
मृत्युदर एक टक्याखाली यावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली असली तरी राज्यातील मृत्युदर हा सध्या २.६० टक्के एवढा आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मृत्युदरापेक्षा राज्यातील मृत्युदर अधिक आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६,१५९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ६५ जणांचा मृत्यू झाला.
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर सरासरी मृत्युदर २.३६ टक्के असून, देशाचा मृत्युदर १.४६ टक्के आहे.  गेल्या २४ तासात पुणे शहर ४१८, पिंपरी-चिंचवड २२९, सोलापूर जिल्हा २४८, नागपूर शहर २३५ नवे रुग्ण आढळले.
 
ठाणे जिल्ह्य़ातील रुग्णसंख्येत वाढ
ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात ७९९ नवे करोना रुग्ण आढळले असून सर्वच शहरातील रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २ लाख २० हजार ७९८ इतकी झाली आहे. तर, दिवसभरात १५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्य़ातील एकूण मृतांची संख्या ५ हजार ६३४ इतकी झाली आहे.
 
गेल्या पंधरवडय़ापासून जिल्ह्य़ात ६०० हून कमी रुग्ण आढळून येत होते. मात्र, बुधवारी रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. या नव्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील २०४, ठाणे १९४, नवी मुंबई १८०, ठाणे ग्रामीण ६७, मीरा-भाईंदर ५१, बदलापूर ४३, अंबरनाथ २३, उल्हासनगर १९ आणि भिवंडीतील १३ रुग्णांचा समावेश आहे.
 
* मुंबईत बुधवारी ११४४ रुग्णांची नोंद झाली असून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा खाली आहे.
 
* आतापर्यंत २ लाख ५३ हजाराहून अधिक म्हणजेच ९१ टक्केरुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तसेच रुग्णांच्या संख्येतून बुधवारी देखील २३६५ दुबार रुग्णांची नावे वगळली आहेत. सध्या ११,१०१ रुग्ण उपचाराधीन आहेत. मृतांचा एकूण आकडा १०,७२३ वर गेला आहे.
 
* मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.३४ टक्कय़ांपर्यंत वाढला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २०६ दिवसापर्यंत घसरला आहे. गेल्या आठवडय़ात हा कालावधी ३२० दिवसांपर्यंत गेला होता. बुधवारी १६,६०० चाचण्या करण्यात आल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती