आता 'एस्परगिलोसिस' संसर्गाचा धोका, मुंबईत वाढत आहे Aspergillosis आजाराचे रुग्ण

गुरूवार, 27 मे 2021 (19:49 IST)
कोरोना विषाणूचीने संपूर्ण जगात थैमान मांडला आहे. देशात दुसरी लाट सुरु असून आता काळी बुरशी (Black Fungus), पांढरी बुरशी (White Fungus) आणि पिवळी बुरशी (Yellow Fungus) या आजारांनी डोके वर काढले आहे. अशा भीतीच्या वातावरणात एक भर अजून म्हणजे अ‍ॅस्परजिलोसिस (aspergillosis) आजार. मुंबईत अ‍ॅस्परजिलोसिस आजाराचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंता वाढत आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना रूग्ण किंवा कोरोनामधून बरे झालेल्या लोकांना अ‍ॅस्परजिलोसिसची लागण होत आहे. डायबिटीज असलेल्या ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे अशा व्यक्तींना या आजाराचा सर्वात जास्त धोका आहे. कारण रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्टिरॉइड्सचा वापर केला जात आहे.  यामुळे या रुग्णांना आता या नवीन आजाराचा सामना करावा लागत आहे. ऑक्सिजन पुरवठा हायड्रेट ठेवण्यासाठी निर्जंतुकीकरण नसलेल्या पाण्याचा उपयोग देखील याचे एक कारण असल्याचे समजते.
 
मुंबईच्या झेन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅस्परजिलोसिसची लागण झालेले दोन रुग्ण आढळले असून पोस्ट कोविड लंग फाइब्रोसिस आणि न्यूमोथॉरक्समुळे एका रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाच्या तपासण्या केल्यानंतर त्याला म्युकरमायकोसिस झाला नसल्याचे समोर आले. नंतर नेझल एंडोस्कोपीमध्ये अ‍ॅस्परजिलोसिसची लागण झाल्याचे समोर आले. 
 
अ‍ॅस्परजिलोसिस हा देखील Black Fungus सारखा बुरशीजन्य संसर्ग आहे. 
 
कोणाला अधिक धोका
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास
अनियंत्रित मधुमेह
अवयव प्रत्यारोपण
रक्ताचा कर्करोग 
तसंच स्टेरॉइड घेणाऱ्या व्यक्तींना अ‍ॅस्परजिलोसिसची लागण होण्याचा सर्वात जास्त धोका आहे. 
 
अ‍ॅस्परजिलोसिसचा संक्रमण लंग्सपासून सुरु होतो आणि हळूहळू तो रक्त प्रवाहातून इतर अवयवांमध्ये पसरत जातो. अ‍ॅस्परजिलोसिस आजाराच्या उपचारासाठी सध्या व्होरिकोनाझोल नावाच्या अँटी फंगल औषधाचा वापर केला जात आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती