IPL 2021: भारतातून ऑस्ट्रेलियात येण्यास बंदी, आता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू घरी कसे परतणार?

मंगळवार, 4 मे 2021 (17:51 IST)
इंडियन प्रीमिअर लीगचा चौदावा हंगाम स्थगित करण्यात आला आहे. मात्र यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अडचणीत सापडले आहेत.
 
भारतात दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ऑस्ट्रेलियाच्या सरकारने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली. 3 मे ते 14 मे या कालावधीसाठी ही बंदी लागू असेल. हा कालावधीही वाढवलाही जाऊ शकतो.
 
हा प्रतिबंध तोडल्यास किंवा नियमबाह्य पद्धतीने देशात शिरण्याचा प्रयत्न केल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास किंवा 50 लाख डॉलर्सचा दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका झाली. स्थानिकांनी ऑस्ट्रेलियाच्या सरकारवर वंशभेदाचा आरोपही केला.
 
यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियाचे डझनभर खेळाडू आहेत. सपोर्ट स्टाफमध्ये असणाऱ्यांची संख्या देखील बरीच आहे. याव्यतिरिक्त कॉमेंटेटर, अंपायर यांचाही समावेश आहे. भारताने आयपीएलचे उर्वरित सामने रद्द केल्यानंतर या सगळ्यांना मायदेशी कसं परतायचं असा प्रश्न आहे.
आम्ही हा निर्णय विचारपूर्वक घेतल्याचं ऑस्ट्रेलियाच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या सात दिवसात भारतातून ऑस्ट्रेलियात आलेले 139 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत असं त्यांनी सांगितलं.
मागच्या आठवड्यात भारतातली कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाच्या तीन क्रिकेटपटूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. यामध्ये राजस्थानकडून खेळणारा अँड्र्यू टाय आणि बेंगळुरू संघाचे केन रिचर्डसन आणि अॅडम झंपा यांचा समावेश होता.
 
हे तिघे मेलबर्नला पोहोचल्यानंतर नवे नियम लागू झाले. त्यामुळे त्यांना परतता आलं. हे तिघे कतारमार्गे ऑस्ट्रेलियाला पोहोचले होते. ऑस्ट्रेलियाने कोणत्याही देशाच्या मार्गे भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.
 
मायदेशी परतणाऱ्या स्थानिकांवर बंदी घालून त्यांना अपराधी ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतासंदर्भात ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या निर्णयावर भारतीय माणसं, मानवाधिकार संघटना यांनी विरोध केला आहे.
 
दरम्यान भारतात 9,000 ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांनी मायदेशी परतण्यासाठी आवेदन दिल्याचं सिनेटर मॅट कैनावन यांनी सांगितलं.
 
चार्टर्ड फ्लाईटचा पर्याय
"तुम्हाला घरी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी आमची," असं बीसीसीआयने म्हटलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं सरकार, इथला राजदूत बीसीसीआय, केंद्र सरकार यांच्यात समन्वय होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि विविध संघात कार्यरत सपोर्ट स्टाफमधली मंडळी यांना खास विमामाने नेलं जाऊ शकतं. कारण ते सगळे बायोबबलमध्ये होते. त्यांच्यापैकी कुणाचीही टेस्ट पॉझिटिव्ह आलेली नाही. मायदेशी परतल्यानंतर त्यांना कठोर क्वारंटाईनमध्ये राहायला लागू शकतं.
 
अन्य देशात राहावे लागेल
ऑस्ट्रेलियाच्या सरकारन नमतं न घेतल्यास, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू युएई, युके अशा तटस्थ देशात जाऊन राहू शकतात. तिथे ठराविक वेळ व्यतीत केल्यानंतर ते मायदेशी परतू शकतात. मात्र तटस्थ देशात किती काळ घालवणं अनिवार्य आहे याबाबत धोरण स्पष्ट नाही.
 
यंदाच्या हंगामात सहभागी झालेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू
स्टीव्हन स्मिथ, जेसन बेहनड्रॉफ, मार्कस स्टॉइनस, पॅट कमिन्स, बेन कटिंग, ख्रिस लिन, नॅथन कोल्टिअर नील, मॉइझेस हेन्रिक, रिले मेरडिथ, झाय रिचर्डसन, डॅन ख्रिस्तियन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, डेव्हिड वॉर्नर
यंदाच्या हंगामात सहभागी झालेली अन्य मंडळी
केव्हिन सिम्स, माईक हसी, टॉमी सिमसेक, अँड्य़ू लिपस, सायमन कॅटिच, डेमियन राईट, ट्रेव्हर बायलिस, टॉम मूडी, ब्रॅड हॅडिन, डेव्हिड हसी, वेन बेंटले, अॅडम ग्रिफिथ, पॉल रायफेल, मॅथ्यू हेडन, लिसा स्थळेकर, मेल जोन्स, ब्रेट ली

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती