कोल्हापूरात करोना निर्बंधात शिथिलता, दुकाने झाली सुरू

सोमवार, 5 जुलै 2021 (15:18 IST)
कोल्हापूर शहरातील करोना निर्बंधात शिथिलता मिळाली असून दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी सकाळी पहिल्याच दिवशी दुकाने उघडताच ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात रस्तोरस्ती गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. इचलकरंजीसह अन्य शहरांमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी दिली नसल्याने व्यापारी वर्गांमध्ये वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्णांची आणि मृत्यूची संख्या वाढत चालली होती.कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद होती. तीन महिन्यापासून दुकाने बंद असल्याने व्यापारी आक्रमक झाले होते.त्यांनी दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी यासाठी गेले महिनाभर आंदोलन छेडले होते.
 
रविवारी झालेल्या बैठकीत आपण काहीही झालं तरी दुकानं उघडणारच असा आक्रमक पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी शासनाने सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसात कोल्हापूर शहरातील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेत सुरू करण्यास परवानगी दिल्याचे घोषित केले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती