ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने अँटीव्हायरल औषध फॅविपिरावीर लाँच केले

शनिवार, 20 जून 2020 (21:12 IST)
कोविड -१९ वरील उपचारासाठी फॅबीफ्लू या ब्रँडखाली भारतात अँटीव्हायरल औषध फॅविपिरावीर लाँच केले आहे. हे औषध कोविड-१९ च्या रूग्णांसाठी आहे. तसेच ज्या रूग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असतील अशा रूग्णांच्या उपचाराकरता हे औषध वापरले जाईल, असे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने सांगितले आहे.
 
या फार्मा कंपनीला औषध निर्मितीसाठी व बाजारपेठेत ते उपलब्ध करण्यासाठी  ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून  मान्यताही देण्यात आली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, कोविड -१९ च्या रुग्णांच्या उपचारांसाठी फॅबीफ्लू फॅविपिरावीर (Favipiravir) हे औषध म्हणून वापरता येईल.
 
ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ग्लेन सलधाना म्हणाले की, भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची घटना वेगाने वाढत आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेवर खूप दबाव आला आहे, मात्र अशावेळी ही मान्यता देण्यात आली असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती