कोरोनाने मृत्यू होणार्‍या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला

सोमवार, 19 एप्रिल 2021 (08:14 IST)
राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. मात्र रविवारी कोरोनाने मृत्यू होणार्‍या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. राज्यामध्ये रविवारी तब्बल 503 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृतांची ही सर्वाधिक संख्या ठरली आहे. यामध्ये अहमदनगरमध्ये सर्वाधिक 88 जणांचा तर मुंबईमध्ये 53 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५८ टक्के एवढा आहे.
 
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्यामध्ये कोरोना रुग्णांना खाटा, आयसीयू, ऑक्सिजन खाटा मिळणे अवघड झाले आहे. त्यातच रेमडेसीवीर इंजेक्शनच्या काळ्याबाजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढीचा दररोज नवनवीन विक्रम होत असताना रविवारी कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येने 500 चा आकडा ओलांडत राज्याला धक्का दिला आहे. राज्यामध्ये रविवारी झालेल्या 503 मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू अहमदनगरमध्ये 88 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल मुंबईमध्ये 53, पुणे 45, जळगाव 40, नागपूर 27, नांदेड 24, नंदूरबार 19, लातूर 19 यांचा समावेश आहे. अहमदनगरमधील परिस्थिती बिकट होत असून, काही दिवसांपासून सातत्याने नगरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्याचबरोबर नागपूरमध्येही कोरोनाने थैमान घातले असून, नागपूरमधील कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. तर मागील काही दिवसांपासून मुंबईमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी मृतांची संख्या 50 च्या आसपास कायम राहिली आहे. कोरोना मृतांच्या संख्येत होत असलेली वाढ राज्य सरकारच्या चिंतेत भर पाडणार आहे. नोंद झालेल्या एकूण ५०३ मृत्यूंपैकी २१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६५ मृत्यू, अहमदनगर ४५, जळगाव ३२, पुणे ३१, नागपूर ११, ठाणे ९, यवतमाळ ८, परभणी ६, नांदेड ५, नंदूरबार ४, औरंगाबाद ३, भंडारा २, नाशिक २ रायगड २, अकोला १, लातूर १ उस्मानाबाद १, सांगली १ आणि सोलापूर १ असे आहेत.
 
राज्यामध्ये रविवारी ६८,६३१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधितांची संख्या ३८,३९,३३८ तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६,७०,३८८ इतकी आहे. रविवारी ४५,६५४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले तर राज्यात आतापर्यंत ३१,०६,८२८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.९२ एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३८,५४,१८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,३९,३३८ (१६.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,७५,५१८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,५२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती