राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के पार

शुक्रवार, 28 मे 2021 (07:41 IST)
राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के पार झाले आहे. गुरुवारी २४ तासांत राज्यात २१ हजार २७३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ लाख ७२ हजार १८०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९२ हजार २२५ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
गुरुवारी ३४ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५२ लाख ७६ हजार २०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३ टक्के एवढा आहे. राज्यात अजूनही ३ लाख १ हजार ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ४० लाख ८६ हजार ११० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख ७२ हजार १८० (१६.६४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख १८ हजार २७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९ हजार ९९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
दरम्यान गुरुवारी मुंबईत १ हजार २६६ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ८५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख २ हजार ५३२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार ७७८ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख ५७ हजार ३०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती