देशात शनिवारी पहिल्यांदाच एका दिवसात उच्चांकी २ हजारांहून अधिक जणांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार गेल्या एका दिवसात २ हजार २३३ कोरोनामुक्त नागरिकांना विविध राज्यातील रूग्णालयातून सुटी देण्यात आली. चिंताजनक बाब म्हणजे एका दिवसात ३ हजार ९७० नवीन संसर्गग्रस्तांची भर पडली आहे. तर, १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक संसर्गग्रस्त दिल्ली, तामिळनाडू, गुजरात तसेच महाराष्ट्रात आढळून आले आहेत. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा त्यामुळे ८५ हजार ९४० झाला आहे.
आतापर्यंत ३० हजार १५३ जणांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर २ हजार ७५२ रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुक्तीचा दर वेगाने वाढत आहे. सध्या हा दर ३५ टक्क्यांच्या घरात आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आतापर्यंत देशात २१.३४ लाख वैद्यकीय तपासण्या केल्या आहेत.
कोरोना संसर्गासंबंधी देशातील पाच मोठ्या राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. या राज्यातील कोरोनामुक्त तसेच कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या प्रमाणाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास पश्चिम बंगाल मधील स्थिती बिकट असल्याचे दिसून येत आहे. दर एका कोरोनाबाधितांच्या मृत्यू मागे ३.६ रूग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे दिसून आले आहे. तर, महाराष्ट्रात दर एका कोरोनाबाधितांच्या मृत्यू मागे हे प्रमाण ५.९ एवढे आहे. गुजरातमध्ये ६.४, पंजाबमध्ये ७ तर मध्य प्रदेशात हे प्रमाण ९.२ एवढे आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार पश्चिम बंगालमध्ये कोरोना संसर्गाचा मृत्यूदरही सर्वाधिक आहे. देशातील सर्वात जास्त मृत्यूदर ९.१४ पश्चिम बंगालमध्ये नोंदवण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ समुहाच्या बैठकीत संसर्गग्रस्तांना योग्य सुविधा उपलब्ध करवून देण्याचे निर्देश त्यामुळे राज्याला देण्यात आले होते. बंगाल खालोखाल मेघालयात ७.६९, पॉडिचेरी ७.६९, गुजरात ६.१०, मध्य प्रदेश ५.२० , हिमाचल प्रदेश ३.९५, महाराष्ट्रात ३.६७, तर कर्नाटक मध्ये ३.४१ मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे.