विविध राजकीय पक्षांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

शुक्रवार, 8 मे 2020 (09:06 IST)
राज्यात कोविड-१९ च्या फैलावामुळे उद्भवलेल्या परिस्थिती विषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
 
त्यांनी कोरोना विषयक लढ्यात राज्य शासनाबरोबर आहोत असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वांना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची सरकार गांभीर्याने दखल घेईल.
 
एकजुटीने आपण या संकटातून बाहेर पडू  असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कोरोना फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मालेगाव आणि औरंगाबाद येथे प्रतिबंधित क्षेत्रात अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे, तेथील लोक प्रतिनिधीनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली.
 
ज्या शेतकऱ्यांना आपल्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पीक कर्ज मिळावं म्हणून रिझर्व्ह बँकेशी तसंच कापूस खरेदीसंदर्भात केंद्रसरकारशी चर्चा सुरु आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
 
२५ हजार मेट्रिक टन ज्वारी आणि १५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. अर्थव्यवस्था रुळावर आणताना क्षेत्रनिहाय तज्ञांचे गट करावेत आणि गटनिहाय विविध उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
प्रतिबंधित क्षेत्रात बंदोबस्त वाढवावा तसंच जिथे लॉकडाऊनचं पालन होत नसेल तिथे राज्य राखीव दल तैनात करावं असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुचवलं.
 
यापुढं राज्यात परतणाऱ्या परराज्यातल्या कामगारांच्या तपासणीची व्यवस्था आणि स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी तसेच यापुढे लॉकडाऊन करतांना आगाऊ सूचना द्यावी असंही राज ठाकरे म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती