मुंबई : पावसाळ्यात काही रोग व साथी उद्भवतात, त्यांची काही लक्षणे आणि कोविडची लक्षणे एकसारखी असतात त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील कोविडची लक्षणे वेळीच ओळखावीत तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत किंवा नाही ते बारकाईने पाहावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) आयोजित केलेल्या कोरोना संदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना बोलत होते. कोविडच्या लढाईत आता डॉक्टर्सदेखील मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरले आहेत त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रथम त्यांचे आभारही मानले. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीही आपले विचार मांडले.