अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांना 1 जूनपासून घरीच मिळणार लस

शनिवार, 29 मे 2021 (21:32 IST)
शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील 18 ते 44 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी महापालिका स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करणार आहे. हे विद्यार्थी या केंद्रात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेऊ शकणार आहेत. त्याचबरोबर अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांना 1 जूनपासून घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. यासाठी ‘मी जबाबदार’ अँपवर नोंदणी करणे गरजेचे असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
 
पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक विद्यार्थी इंग्लंड, अमेरिका,ऑस्ट्रेलिया, युरोप, रशियासह विविध देशात उच्च शिक्षणासाठी जात असतात. अनेक विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. परंतु, परदेशात जाणारे विद्यार्थी कोरोना प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. ‘कोविशिल्ड’ लस घेतलेली असेल तर विमानप्रवासाला परवानगी मिळत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यासाठी परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची मागणी केली जात होती.
 
त्यानुसार शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील 18 ते 44 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी महापालिका स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करणार आहे. हे विद्यार्थी या केंद्रात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेऊ शकणार आहेत.
 
दापोडी येथील आनंदवन कुष्ठरोग वसाहतीमध्ये आज (शनिवार) पासून कुष्ठरोग बाधितांचे लसीकरण सुरू केले आहे. जे लाभार्थी लसीकरण केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत. अशा वयोवृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना, त्यांच्या घरी जाऊन 1 जून पासून लस देण्यात येणार आहे; मात्र, त्यासाठी ‘मी जबाबदार ‘ या अँपवर नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती