कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ‘कोविड-केअर सेंटर’ सुरू करण्यास मान्यता

बुधवार, 28 एप्रिल 2021 (21:00 IST)
राज्यात  कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना रूग्णालयात, कोविड सेंटर मध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड उपचाराशी निगडीत विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन सेंटर, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन बेड, सॅच्युरेटेड, ऑक्सिजन मशीनचा पुरवठा अशा कोविड उपचाराशी निगडीत सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड-केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
 
सहकार व पणन मंत्री श्री. पाटील म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मागील वर्षाच्या वाढाव्याच्या २५% रक्कमेच्या मर्यादेत कोविड केअर सेंटर (Covid Care Center) सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यासाठी  रुपये १० लाखापर्यंतच्या भांडवली खर्चास मंजूरी  देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले असून रुपये १० लाखाच्या वरील प्रस्ताव प्राप्त झाल्यास अशा प्रस्तावाच्या भांडवली खर्चास मान्यता देण्याचे अधिकार पणन संचालक, यांना देण्यात आले आहेत.
 
कोविड केअर सेंटर (Covid Care Center) हे प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरू करण्यात यावे. सेंटरवरील विलगीकरण कक्षात बाजार समितीकडून Oxygen Concentrator तथा Oxygen Cylinder, बेड सुविधा उपलब्ध करून देणे व सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करावयाच्या मशीनचा पुरवठा करण्यात यावा. तसेच सेंटरवरील विलगीकरण कक्षात येणाऱ्या रूग्णांना बाजार समितीने दोन वेळेस जेवण व नास्ता व चहा यांची प्रामुख्याने व्यवस्था करावी.
 
कोविड केअर सेंटर (Covid Care Center) चालविताना राज्य शासनाने कोविड संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बंधनकारक राहील असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती