बाळाला पारंपरिक पद्धतीने मालिश करणं फायद्याचं की धोकादायक?

सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (12:31 IST)
- कमला थियागराजन
ऑक्टोबरच्या एका सायंकाळी रेणू सक्सेना बेंगळुरूमध्ये त्यांच्या नवजात मुलीला रुग्णालयातून घरी घेऊन आल्या. आपलं बाळ किती नाजूक आहे, तिच्या शरिरातील नसा दिसतील एवढं तिचं शरिर पारदर्शक आहे हे त्यांच्या लक्षात आलं.
 
त्यांची मुलगी 36 व्या आठवड्यात म्हणजे लवकर जन्माला (प्रिमॅच्युअर) आली होती. जन्माच्या वेळी तिचं वजन केवळ 2.4 किलो एवढंच होतं. त्यावेळी सक्सेना यांच्या कुटुंबीयांनी नवजात मुलांच्या वाढीसाठी जुन्या काळापासून चालत आलेला एक उपाय लगेचच सुरू करण्यास सांगितलं.
 
तो उपाय म्हणजे बाळाची रोजची मालिश. मात्र, डॉक्टरांनी अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला. बाळाचं थोडं वजन वाढल्यानंतर मालिश सुरू करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
 
रेणू सक्सेना यांनी डॉक्टरचा ऐकलं आणि मालिश सुरू करण्यासाठी दोन आठवडे थांबण्याचं ठरवलं. पण या काळात त्यांच्या मुलीचं वजन अवघं 100 ग्रॅम वाढलं. तसंच बाळ व्यवस्थित झोपतही नव्हतं. त्यानंतर सक्सेना यांनी एका नर्सची नेमणूक केली आणि पारंपरिक पद्धतीनं मालिश कशाप्रकारे करायची हे त्यांच्याकडून शिकून घेतलं. त्यामुळं अनेक फायदे झाले. बाळ शांत झोपू लागलं आणि बाळाचं वजनही वाढलं.
 
दक्षिण आशियात प्रचलित बाळाच्या मालिशला विशेष प्रकारची ओळख किंवा यश मिळालेलं नाही. मात्र सक्सेना यांच्या बाळाच्या प्रकृतीतील सुधारणा आणि त्यांच्या अनुभवानुसार, अगदी वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांसाठीही हे फायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं. या मालिशसंदर्भात झालेल्या अभ्यासांवरूनही काही तथ्यं समोर आली आहेत.
 
त्यानुसार अशा मालिशमुळं बाळांचं वजन वाढतं, कोणत्याही प्रकारच्या जीवाणुंचा संसर्ग होण्यापासून त्यांचा बचाव होतो आणि यामुळं नवजात बाळांच्या मृत्यूचं प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. मात्र, अशा प्रकारची मालिश करण्याची तयारी असलेल्या पालकांनी आधी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ते बाळासाठी सुरक्षित आणि योग्य आहे का, हे जाणून घ्यावं.
 
ज्या कुटुंबांमध्ये पिढीजात हे चालत आलेलं आहे, त्यांनी निरीक्षणावरून याचे निष्कर्ष काढले आहेत. जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या रेणू सक्सेना या मूळच्या उत्तर प्रदेशच्या आहेत. याठिकाणी प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघांचीही मालिश करण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्यांच्या सासरीदेखील अनेक पिढ्यांपासून ही परंपरा आहे.
 
"मी आईचं तिसरं अपत्य होते. तरीही माझ्या जन्मानंतरही आई कशाप्रकारे अगदी लवकर तंदुरुस्त झाली आणि माझीही वाढ कशी झपाट्यानं होत गेली हे मला आई सांगायची. घरी आल्यानंतर रोज मालिश सुरू केल्यानं झपाट्यानं तब्येत सुधारल्याचं आई सांगायची," असं सक्सेना म्हणाल्या.
 
नारळ किंवा बदामाचं गरम तेल घेऊन त्याची बाळाच्या त्वचेवर रोज अर्धा तास मालिश कशी करायची आणि त्यानंतर गरम पाण्याने बाळाला अंघोळ कशी घालायची, हे त्यांना नर्सने शिकवले.
"आम्ही बाळाच्या पोटावर हार्ट शेपच्या आकाराने हळुवार मालिश करायला सुरुवात केली. त्यात हळू हळू वाढ करत शरिराच्या इतर भागांचीही मालिश सुरू केली."
 
"त्यानंतर आम्ही हळूवार काही व्यायाम सुरू केले. पायाचे पंजे कपाळाला टेकवण्यासारख्या बाबींचा त्यात समावेश होता. त्यामुळं बाळाच्या पोटात असलेले गॅस बाहेर पडण्यात मदत व्हायची," असं त्या म्हणाल्या.
 
संशोधकांच्या मते, नवजात बाळांची मालिश केल्यास आरोग्याच्या दृष्टीनं त्यांना मिळणारे फायदे हे प्रौढत्वापर्यंत टिकून राहतात.
 
"त्वचा हा आपल्या शरिरातील सर्वात मोठा अवयव आहे. पण एकूण आरोग्याची काळजी घेताना आपण त्वचेला कमी महत्व देतो, असं मत स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन येथील प्राध्यापक गॅरी डार्मस्टाफ यांनी मांडलं.
 
गॅरी यांनी भारत आणि बांगलादेशमधील प्रवासादरम्यान अनेक कुटुंबांमध्ये आई किंवा आजी बाळाची मालिश करायला बराच वेळ देत असल्याचं पाहिलं. ही पद्धत अनेक शतकांपासून चालत आलेली असल्याचं समजल्यानं मला कुतुहूल वाटलं आणि मी त्यावर अभ्यास सुरू केला, असं ते सांगतात.
 
प्राचीन काळापासून चालत आलेल्या या पद्धतीमुळं बाळांचे प्राणदेखील वाचू शकतात, असं मत डार्मस्टाफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2008 मध्ये एका अभ्यासाद्वारे मांडलं. त्यासाठी त्यांनी बांगलादेशातील एका रुग्णालयात वेळेपूर्वी जन्मलेल्या 497 बाळांच्या प्रकृतीचा अभ्यास केला.
 
"आम्हाला संसर्ग होण्याचं प्रमाण 40% आणि मृत्यूचं प्रमाण 25-50% एवढं घटलेलं आढळून आलं आणि हे अत्यंत उत्तम निकाल होते, असं ते म्हणाले.
 
नियमितपणे मालिश केल्याने बाळाचे मायक्रोबायोम तयार होण्यास मदत होते. मायक्रोबायोम म्हणजे त्वचा आणि आतड्यांत असणारा जीवाणूंचा (बॅक्टेरिया) एक थर. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात या मायक्रोबायोमचा मोलाचा वाटा असतो. रोगाचे संसर्ग होण्यात तो प्रभावी अडथळा ठरत असतो, असं स्वतंत्र अभ्यासावरून डार्मस्टाफ यांच्या टीमच्या असं लक्षात आलं.
 
"तेलाने मालिश करण्यात आलेल्या कुपोषित मुलांमध्ये निर्माण झालेले मायक्रोबायोम अधिक वैविध्यपूर्ण होते. तेलामुळं त्वचेच्या जीवाणू प्रवेश रोखण्याच्या गुणधर्मात वाढ होते. त्यामुळं संसर्ग पसरवणारे जीवाणू सहजपणे त्वचेतून रक्तात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळं जीवघेण्या आजारांच्या संसर्गापासून बचाव होतो," असं डार्मस्टाफ यांनी सांगितलं.
 
अभ्यासातून समोर आलेली ही तथ्यं नवजात आणि विशेषतः वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांच्या दृष्टीनं महत्त्वाचे होती. "वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांमध्ये त्वचेवरचा अडथळा निर्माण करणारा थर पूर्ण क्षमतेनं काम करत नसतो. त्यामुळं त्वचेद्वारे शरिरातील पाणी बाहेर पडते आणि त्यामुळं उष्णताही बाहेर पडत असते. त्यामुळं बाळ हायपोथर्मिक होण्याची शक्यता असते. शरिराचं तापमान खूप कमी होणं, हे जीवघेणं ठरू शकतं. "नवाजात बाळाची प्रचंड ऊर्जा खर्च होत असते (शरिरातील उष्णता बाहेर जात असताना त्याच्याशी संघर्ष सुरू असताना). प्रत्यक्षात याच ऊर्जेद्वारे च्या बाळाच्या शरिरातील इतर गोष्टींचा विकास होणं अपेक्षित असतं," असं ते म्हणतात.
 
डार्मस्टाफ यांच्या अद्याप प्रकाशित न झालेल्या एका संशोधनात त्यांनी त्यांच्या टीमसह उत्तर प्रदेशातील 26 हजार बाळांच्या आरोग्याचा अभ्यास केला. पण यात केवळ नवजात बाळांचाच समावेश नव्हता. यापैकी अर्ध्या बाळांची सूर्यफुलाच्या तेलानं तर अर्ध्या बाळांची मोहरीच्या तेलानं मालिश करण्यात आली. अभ्यासकांना सर्व बाळांची चांगली वाढ दिसून आली. "जन्माच्या वेळी योग्य वजन असलेल्या बाळांच्या मृत्यूदरात फारसा काही फरक पडला नाही. मात्र, जन्माच्यावेळी कमी वजन असलेल्या (1.5 किलोपेक्षा कमी), नवजात बाळांच्या मृत्यूचा धोका 52 टक्क्यांनी कमी झाल्याचं समोर आलं."
 
इतर संशोधकांनाही असेच फायदे आढळून आले. एका अभ्यासानुसार अशा प्रकाच्या मालिशमुळं वॅगस नर्व्ह (vagus nerve) सक्रिय होतं. हा लांब असा मज्जातंतू मेंदूपासून पोटापर्यंत जोडलेला असतो. पचन आणि पोषक तत्वांचं शोषण याच्याशी त्याचा संबंध असतो. यामुळं बाळांचं वजन वाढण्यास मदत होते. रोड नियमितपणे पोटावर हळूवार मालिश केल्यास बाळाचा मानसिक तणाव आणि वेदना कमी होतात. अनेक महिने रुग्णालयात एकटं राहावं लागणाऱ्या बाळासाठी ते अत्यंत गरजेचं असतं.
 
"आम्ही पालकांना त्यांच्या बाळाची अगदी जन्मापासून मालिश सुरू करण्याचा सल्ला देतो," असं युनिव्हर्सिटी ऑफ मियामी स्कूल ऑफ मेडिसीन येथील बालरोग, मानसशास्त्र आणि मानसोपचार या विषयांच्या प्राध्यापिका टिफनी फिल्ड यांनी सांगितलं. त्या नवजात बालकांच्या मालिशमधीलही तज्ज्ञ आहेत. त्यांनी विविध देशांमधल्या वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांच्या मालिशचा आणि त्याच्या फायद्यांचा अभ्यास केला आहे. त्या मालिश करण्याचा सल्लाही देतात. मात्र त्यासाठी योग्य पद्धतीनं मालिश करणं गरजेचं असल्याचंही त्या सांगतात.
 
"बाळाच्या त्वचेवर मध्यम दाब देत मालिश करावी. फार हळू मालिशचा प्रयत्न केल्यास बाळाला गुदगुल्या होऊ शकतात. अनेक बाळांना ते आवडत नाही, आणि त्याचा फायदाही होत नाही," असं त्या म्हणाल्या.
डार्मस्टाफ यांनीदेखील याबाबत सल्ला दिला आहे. "आपण विशेषतः नवजात बाळाची मालिश जास्त शक्तीचा वापर करून करता कामा नये. त्यामुळं त्वचेवरील अडथळा निर्माण करणाऱ्या थराचं नुकसान होऊन ते हानिकारक ठरू शकतं," असं ते म्हणाले.
 
तेलाची निवड करताना काळजी घ्यायला हवी. पिढीजात जे चालत आलं आहे, ते योग्यच असेल असंही नाही. 2013 मध्ये दक्षिण भारतात 194 बालकांचा अभ्यास करण्यात आला. या सर्वांची मालिश त्यांच्या आई करत होत्या. त्यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक महिला बाळांच्या कानात आणि डोळ्यातही तेल सोडत होत्या. मात्र, त्यामुळं संसर्ग होण्याचा इशारा अभ्यासक देतात. असे प्रकार टाळून योग्य तंत्राचा वापर व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती गरजेची असल्याचं, मंगलोरच्या जवळ असलेल्या कस्तुरबा मेडिकल कॉलेज येथील सहयोगी प्राध्यापक नितीन जोसेफ यांनी सांगितलं. या अभ्यासातील संशोधकांमध्ये त्यांचाही समावेश होता.
 
डार्मस्टाफ आणि त्यांचे सहकारी पीटर एम एलियास यांनी केलेल्या संशोधनानुसार सूर्यफुलांच्या बीया, खोबरे आणि तीळ यापासून सर्वाधिक लाभ मिळतात.
 
"या तेलांमध्ये लिनोलिक अॅसिडचं भरपूर प्रमाण असतं, आपल्या शरिरात हे अॅसिड तयार होऊ शकत नाही. शरिरावर असे रिसेप्टर्स असतात जे विशेषतः फॅटी अॅसिडला पकडून ठेवतात. त्यामुळं चयापचय होतं. तेलामधील फॅटी अॅसिडमुळं त्वचेची प्रतिकार क्षमता वाढते, हेही अभ्यासातून समोर आलं आहे. "
 
मात्र, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या मोहरीच्या तेलामध्ये इरुसिक अॅसिड असते. त्यामुळं त्वचेवर सूज आणि अडथळा निर्माण करणाऱ्या थराला हानी पोहोचण्याची शक्यता असते, असं डार्मस्टाफ सांगतात.
 
तसंच कुटुंबांसाठी रोजची ही मालिश म्हणजे दोन पिढ्यांमधलं नातं अधिक दृढ करण्याची संधीही असते.
 
पुण्यातील लेखिका असलेल्या प्रांजली भोंडे या समर नावाच्या त्यांच्या 14 महिन्यांच्या मुलाची दिवसातून दोन वेळा मालिश करतात. जन्मापासूनच त्यांनी याची सुरुवात केली आहे. सुरुवातीचे चार महिने त्यांच्या आईनं यात त्यांची मदत केली. त्या दोघींनाही बाळाची मालिश करायला आवडायचं. आता प्रांजली एकट्या मालिश करतात तेव्हा मुलाशी नजरेच्या माध्यमातून, गाणी गात संपर्क ठेवायला त्यांना आवडतं. "यामुळं आमचं नातं अधिक घट्ट होत आहे. तसंच रोज मालिश केल्यानं त्याची त्वचा आणि झोपेमध्ये सुधारणा झाल्याचं माझ्या लक्षात आलं," असं त्या म्हणाल्या.
 
तेलाच्या मालिशमुळं कुटुंबातील ज्येष्ठांनादेखील फायदा होऊ शकतो. "वृद्ध लोकांनाही याचा फायदा होऊ शकतो का, याचा आम्ही अभ्यास करत आहोत. वाढत्या वयानुसार त्यांची त्वचादेखील नाजूक झालेली असते. तसंच कोरड्या त्वचेवर भेगा पडून जीवाणू आत जाण्यास मदत होऊ शकते. पण मालिशमुळं त्यांची त्वचा कोमल राहू शकते," असं डार्मस्टाफ म्हणाले.
 
रेणू सक्सेना यांनी त्यांच्या कुटुंबाची पिढीजात पद्धत वापरल्यानं मुलीबरोबरच त्यांनाही फायदा झाल्याचं सांगितलं. वयाच्या 40 व्या वर्षी प्रथमच आई बनल्यानं त्यांना गर्भधारणेवेळी मधुमेह झाला. त्यामुळं नियोजित सिझेरियनच्या माध्यमातून त्यांची प्रसुती करण्यात आली.
 
"मालिशनंतर ती चार तास शांतपणे झोपत होती. असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. त्यामुळं मलाही आराम करता आला. त्यामुळं नियमितपणे मालिश केल्यास ती निरोगी बालपणाची पहिली पायरी ठरू शकते, हे माझ्या लक्षात आलं," असं रेणू यांनी म्हटलं.
 
* या लेखातील संपूर्ण मजकूर हा केवळ माहितीस्तव दिलेला आहे. वैद्यकीय किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्याऐवजी या तंत्राचा वापर करू नये. बाळांची मालिश करण्याची इच्छा असणाऱ्यांनी त्याआधी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असं बीबीसी सूचवत आहे. कारण चुकीच्या पद्धतीनं मालिश केल्यानं आपल्या बाळासाठी ते धोकादायक ठरू शकतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती