कंगना राणावत-एकता कपूरचा 'लॉकअप' शो प्रदर्शनापूर्वीच एवढा चर्चेत असण्याचं कारण काय?

रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (11:40 IST)
टीव्हीच्या इतिहासातील सर्वांत वादग्रस्त शो म्हणून बिग बॉसकडं पाहिलं जातं. आता ओटीटीवर बिग बॉससारखीच पार्श्वभूमी असलेला, पण त्यापेक्षा कित्येकपट अधिक वादग्रस्त असा शो येत आहे. त्याचं नाव आहे, 'लॉकअप: बेड जेल अत्याचार खेल.'
 
'टीव्ही क्वीन' म्हणून ओळख असलेली प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक एकता कपूरनं हा शो तयार केला आहे. तर हा शो होस्ट करत आहे कायम चर्चत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत.
 
या शोमधील कंटेस्टंटची निवडही कंगनानं स्वतःच केली आहे. शोची घोषणा झाली तेव्हा कंगना म्हणाली होती की, तिच्यावर गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक एफआयआर झाल्या आहेत आणि तिनं अनेकदा पोलीस ठाण्यातही चकरा मारल्या आहे.
 
दुसरीकडं एकता कपूरनं या शोमधील कंटेंटसाठी ती जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच या शोमुळं तिच्यावरही अनेक एफआयआर होतील, असं वाटत असल्याचं एकतानं म्हटलं आहे.
 
कसा आहे शोचा फॉरमॅट?
'लॉकअप' नावाच्या या शोमध्ये 16 स्पर्धक असतील. त्या सर्वांना 72 दिवसांसाठी एका ठिकाणी बंद ठेवलं जाईल. त्यांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागेल. जवळपास प्रत्येक पायरीवर त्यांना काही टास्क करावे लागतील.
 
कंगना या शोमध्ये जेलरच्या भूमिकेत असेल आणि ती 16 कैद्यांकडून टास्क करून घेताना दिसेल. एकता कपूरनं सांगितलं की, प्रेक्षक त्यांच्या आवडीच्या स्पर्धकाला वोट करू शकतील. पण 50 टक्के पॉवर कंगनाकडे असेल.
शोमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धकांना जीवनातील काही रहस्यांचा खुलासा करावा लागेल. कंगनानं तयार केलेल्या तुरुंगात अनेक आठवड्यांसाठी होस्टचे अत्याचार सहन करत राहावं लागेल.
 
शोमध्ये कोण राहील आणि कोण नाही, त्याचा निर्णय प्रेक्षक घेतील. सर्वांत कमी मतं मिळणाऱ्या स्पर्धकांना बाहेर जावं लागेल. पण कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही याचा अधिकार कंगनाकडेही असेल.
 
हा शो ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्सप्लेअर आणि ऑल्ट बालाजीवर प्रदर्शित होईल. 'बिग बॉस' प्रमाणेच प्रेक्षकांना 'लॉकअप'मध्ये स्पर्धकांना 24 तास लाईव्ह पाहता येईल.
 
करण जोहरने आणलं होतं 'बिग बॉस ओटीटी'
ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत भारतीय दर्शकांमध्ये दिवसेंदिवस आवड निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ओटीटीवर आता वेब शो बरोबरच मोठे चित्रपटही प्रदर्शित होत आहेत.
 
ओटीटी कंटेंटचा विचार करता यात नेहमी काहीतरी नवं पाहायला मिळत असतं. ओटीटीची वाढती मागणी पाहता, करण जोहरनं काही महिन्यांपूर्वी 'बिग बॉस ओटीटी' हा शो आणला होता. त्यालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. त्यानंतर आता एकता कपूर ओटीटीवर हा शो आणत आहेत.
 
रिलीज होण्यापूर्वीच प्रचंड वादात आणि चर्चेत असलेला हा शो आहे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे शोचा फॉरमॅट आणि स्पर्धक. या शोमध्ये बहुतांश स्पर्धक हे वादाशी जोडले गेलेले असे आहेत.
 
कोण आहेत स्पर्धक?
हा शो सुरू होण्यापूर्वीच स्पर्धकांबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यात समोर आलेलं पहिलं नाव म्हणजे पूनम पांडे हे आहे. पूनम पांडे एक मॉडेल आहे.
 
2011 मध्ये पूनम पांडेनं भारतानं वर्ल्डकप जिंकल्यास चीअर करण्यासाठी स्ट्रीप करणार असं म्हटलं होतं. पण बीसीसीआयनं परवानगी नाकारल्यानं तसं झालं नाही. पूनम पांडे यांना बोल्डनेससाठी ओळखलं जातं.
 
अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान करणं किंवा अश्लील व्हीडिओ तयार करणं हे पूनम पांडेसाठी नवं नाही. 2020 मध्ये पूनम पांडेच्या लग्नानंतर 12 दिवसांत त्यांच्या पतील अटक झाली होती. पूनम यांनी पतीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानं त्यांना अटक झाली होती. आता त्याच पूनम पांडेला कंगनाच्या जेलमध्ये कैदी बनून राहावं लागणार आहे.
 
जीवनातील रहस्य उघड होणार
शोच्या स्पर्धकांपैकी समोर आलेलं आणखी एक नाव म्हणजे निशा रावल. निशा अभिनेत्री अशून अनेक टीव्ही शोमध्ये झळकल्या आहेत. पती करण मेहरा बरोबरच्या वादामुळं निशा गेल्यावर्षी चर्चेत आली होती.
 
करण मेहराही अभिनेते असून लोकप्रिय शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये ते प्रमुख भूमिकेत होते. निशा आणि करण यांच्यातील वादाच्या अनेक बातम्या माध्यमात चर्चेत होत्या.
 
तिसरे स्पर्धक आहेत स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी. त्यांच्याशीही संबंधित अनेक वाद आहे. अनेक धमक्यांमुळं त्यांचे 12 शो हे 2 महिन्यांमध्ये रद्द करण्यात आले होते. कॉमेडीमुळं त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं.
 
खासगी आयुष्यात वादग्रस्त किंवा गुंतागुंतीचं जीवन असलेल्या अशा अनेक हस्ती 'लॉकअप'मध्ये झळकणार आहे. सर्वांसमोर ते जीवनातील काही उघड करताना दिसतील.
 
खेळाडूही होणार सहभागी
स्पर्धकांचा उल्लेख करायचा झाल्यास केवळ मनोरंजन क्षेत्राशी संबंधितच नावांचा यात समावेश नाही. लॉकअपमध्ये काही क्रीडापटूही दिसणार आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे बबिता फोगाट.
 
फोगाट बहिणींच्या जीवनावर तयार करण्यात आलेला दंगल चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. त्याच बबिता आता प्रत्यक्षात या शोच्या इतर स्पर्धकांबरोबर 'दंगल' करताना दिसणार आहेत.
 
पहिलवान बबिता फोगाटनं 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महिला कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकत भारताला मोठं यश मिळवून दिलं होतं.
 
त्यांनी 2018 राष्ट्रकुल स्पर्धा, 2010 राष्ट्रकुल स्पर्धा यात रौप्य पदकाची कमाई केली होती. तर 2012 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझमेडल जिंकलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.
 
बबिता फोगाटनं सोशल मीडियावर याबाबत माहिती शेअर केली आहे. मी 'लॉक अप' सारख्या शोमध्ये सहभागी होऊन अत्यंत आनंदी आहे. कारण मी कधीही 24 तास लाईव्ह असेल असा शो केलेला नाही, असं बबिता म्हणाल्या.
 
"माझं व्यक्तिमत्त्व नेमकं कसं आहे, हे लोकांना या शोच्या माध्यमातून समजेल. लोक आधी मला दंगल चित्रपटासाठी ओळखत होते. आता माझी खरी ओळख माझी आवड-नावड याबाबत लोकांना समजेल. म्हणजेच मी कशी व्यक्ती आहे," हे लोकांच्या लक्षात येईल.
 
तरुण प्रेक्षक लक्ष्य
"चित्रपट आणि ओटीटीचं समीक्षण करणारे सोनुप सहदेवन यांनी या शोची अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत होते," असं म्हटलं आहे. ऑल्ट बालाजीला मोठ्या शोची गरज होती. कारण त्यांची झलक दिसून येईल असा मोठा शो त्यांच्या नावावर नाही, असंही ते म्हणाले.
 
बहुतांश शो हे बोल्ड असतात त्यात त्यांच्या गंदी बात सारख्या शोचा समावेश होतो. काही शो वगळता बहुतांश बोल्ड कंटेंट असलेलेच आहेत. ऑल्ट बालाजीनं नवं काहीही आणलेलं नाही.
 
ऑल्ट बालाजीच्या प्रेक्षकांचा विचार करता तरुणांवर त्यांचं लक्ष केंद्रीत आहे. त्यांचे शो त्यांच्यासाठीच असतात. ते कुटुंबाबरोबर पाहता येतील असे नसतात. कुटुंबाला एकता कपूर यांचे टीव्ही शो पाहू शकतात, पण ऑल्ट बालाजीचे नाही.
 
त्यात या शोची टॅगलाईनच 'कपड़े सबके उतरेंगे' असं असल्याचं कंगना राणावत सांगत आहे. त्यामुळं यात किती वाद होतील, हे शो सुरू झाल्यानंतरच लक्षात येईल.
 
ओटीटीवर हिट फ्लॉपचा फंडा नाही
ओटीटीमध्ये हिट किंवा फ्लॉप हे कसं ठरवलं जातं याबाबत सोनुप म्हणाले की, ओटीटीमध्ये हिट किंवा फ्लॉप असं नसतं. एक तर सगळं काही हिट असतं किंवा सगळं काही फ्लॉप असतं.
 
शो कसा चालतोय हे कळण्यासाठी बॉक्स आफिस किंवा टीआरपी रेटिंग असं काही नसतं. हा शो ऑल्ट बालाजीबरोबरच एमएक्स प्लेअरवरही येणार आहे. एमएक्स प्लेअरवर तर सर्वकाही फ्रीमध्येच दिसतं.
 
दोघांचा करारही आहे. त्यामुळं ऑल्ट बालाजीचे सब्सक्रायबर वाढतील आणि ऑल्ट बालाजीचे इतर शोदेखील लोक पाहतील. इतर ओटीटी प्लॅटफॉर्मच्या तुलनेत शो किती जणांपर्यंत पोहोचतो हे महत्त्वाचं असेल. कारण एमएक्स प्लेअर इतरांच्या तुलनेत मोफत आहे. त्याचा फायदा दोघांनाही होईल, कारण प्रेक्षक या शोबरोबर जोडले जातील.
 
कंगनाला घेणं एकतासाठी फायद्याचं
कंगनाला घेणं एकतासाठी फायद्याची गोष्ट असेल. त्याचं पहिलं कारण म्हणजे तिला शो साठी होस्ट करायला ए लिस्ट कलाकार मिळाला आहे.
 
दुसरी बाब म्हणजे कंगनाचं व्यक्तिमत्त्व वादग्रस्त आहे. या शोच्या प्रेस कॉन्फरन्समध्येही वाद निर्माण झाले होते. तेव्हापासूनच हा शो आणि कंगना चर्चेत आहे.
 
कंगना शोमध्येही बरंच काही बोलेल आणि अनेक वाद होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण नेमक्या गोष्टी या शो सुरू झाल्यानंतरच लक्षात येतील.
 
लॉकअप शो 27 फेब्रुवारीपासून एमएक्स प्लेअर आणि ऑल्ट बालाजीवर प्रसारित होईल. या शोमधील 16 पैकी फक्त चारच नावांचा खुालासा झाला आहे. इतर 12 स्पर्धकांचं अद्याप गुलदस्त्यामध्ये आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती