"नावझुद्दीन सिद्दीकी ची निवड मी दोन मिनिटांत केली." - संजय राऊत.

बुधवार, 16 जानेवारी 2019 (18:46 IST)
शिवसेना सुप्रीमो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाच्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला अठरा दशलक्षापेक्षा जास्त प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. बाळासाहेब ठाकरेसारख्या झंझावत्या व्यक्तिमत्वाच्या जीवनपटाचे शिवधनुष्य उचलणारे सुप्रसिद्ध पत्रकार आणि संसद सदस्य संजय राऊत पडद्यामागील गुपितं उलगडताना सांगतात की, "बाळासाहेबांच्या भूमिकेसाठीचे कास्टिंग केवळ दोन मिनिटांत झाले. एकदा मी प्रवास करीत असताना 'फ्रिकी अली' नावाचा चित्रपट पाहत होतो. नावझुद्दीन सिद्दीकी त्यात एका गोल्फ खेळाडूची भूमिका साकारत होते. 'ठाकरे' चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतल्यापासून नवाजुद्दीन सिद्दीकीचा चेहरा बाळासाहेबांसारखा दिसू शकतो. हे मला जाणवले."
 

हिंदुहृदयसम्राटांच्या भूमिकेसाठी निवड करण्यापूर्वी संजय राऊत यांना नवाजुद्दीनची शैली आणि हावभाव तपासून पहायचे होते. आणि त्याला पाहताक्षणी त्यांची खात्री पटली. संजय राऊत सांगतात की, "मी नवाजला एका हॉटेल मध्ये भेटण्यास बोलावले होते. तो समोरून चालत येत असताना त्याची शैली आणि हावभाव पाहून एका क्षणाचाही अवलंब न करता मी त्याला सांगितले की, मी बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' नामक चित्रपट बनवतो आहे आणि तू त्यात हिंदुहृदयसम्राटांची भूमिका साकारणार आहेस."
 

संजय राऊत प्रस्तुत व लिखित 'ठाकरे' येत्या २५ जानेवारी २०१९ ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित 'ठाकरे' या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केलेले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती